सूर्यचिकित्सा आणि आयुर्वेद!
 महा एमटीबी  23-Jan-2018
 
 
 
आयुर्वेदाने मनुष्याला या सृष्टीचे एक छोटासे प्रतीक मानले आहे. सृष्टीचे नियमन, संचालन ज्याप्रमाणे सूर्य, चंद्र व वायु करीत असतो त्याचप्रमाणे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या शरीरात पित्त,कफ व वात शरीर यंत्रणेचे संचालन करीत असतात.
 
वेदांमध्ये सूर्याच्या स्तुती संबंधी अनेक सूत्रे आली आहेत.
 
सूर्यं आत्मा जगतस्तस्थुषश्च ऋग्वेद १/११५/१, यजु, अथर्ववेद.
प्रश्नोपनिषदात सूर्याला समस्त सृष्टीचा प्राण म्हटले आहे.
 
प्राणः प्रजानाम तर मत्स्यपुराणात म्हटले आहे की, समस्त सृष्टीचे आरोग्य भास्करावर म्हणजेच सूर्यावर अवलंबून आहे.
 
आरोग्यं भास्करादिच्छेत्
 
अन्य एका मंत्रात म्हटले आहे की, सूर्य मनुष्य, प्राणी व वनस्पतीसृष्टीला मृत्यूपासून दूर ठेवतो.
 
सविता नः सुवतु सर्वतातिं सविता नो रासतां दीर्घमायुः ऋक् १०/३६/१४
 
जीवन हे सूर्यापासून मिळते (Life comes from ­pollo) ही जशी ग्रीकांची कल्पना होती त्याचप्रमाणे वेदकालीन आर्यांची देखील होती हे यावरून स्पष्ट होते.
 
सूर्यस्त्वधिपतिमृत्योरुदायच्छतु रश्मिभिः अथर्व ५/३०/१५
सूर्याच्या ७ किरणांनी सात प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते.
अधुक्षत् पिप्युषीमिषम् ऊर्जं सप्तपदीमरिः| सूर्यस्य सप्त रश्मिभिः || ऋक् ८/७२/१६
 
सूर्यकिरण चिकित्सा (Heliotherapy) भारतात वेदकाळापासून केली जायची. सूर्यकिरण स्नान हे पूर्वीपासून सुरू होते. सकाळचे कोवळे ऊन हे आरोग्यकारक आहे याची भारतीयांना फार पूर्वीपासून जाणीव होती. भारत वर्षांत सूर्यकिरणांचे दुर्भिक्ष कधीच नव्हते व नसते. आरोग्याला आवश्यक असे सूर्यकिरण सर्वांनाच मिळत. त्यामुळे सूर्यकिरणांच्या अभावामुळे होणारे रोग सहसा भारतात कमी आढळत. कारण घरात, दारात सर्वत्र भरपूर सूर्यप्रकाश असे. यामुळे वेगळी अशी सूर्यकिरण चिकित्सा त्यांना घ्यावी लागत नसे. परंतु आज आपण जी जीवनशैली आत्मसात केली आहे त्यामध्ये सतत बंद खोल्यांमध्ये, एसीमध्ये राहू लागल्यामुळे आपण सुद्धा सूर्यकिरणांच्या उपयुक्त गुणांना मुकू लागलो आहोत. त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणारे व फुकट मिळणारे vitamin D दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कृत्रिम vitamin D आपण घेऊ लागलो आहोत. त्या अनुषंगाने होणार्‍या विविध आजारांना बळी पडत आहोत.
 
उदय पावणारा सूर्य हा कृमींचा नाश करतो.
 
‘उद्यन्नदित्यः कृमीन् हन्ति|
 
सूर्याच्या प्रकाशात अतिनील म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट व इन्फ्रारेड किरणांचा प्रचंड साठा असतो.
 
म्हणूनच पूर्वी रोग्यांचे कपडे निर्जंतुक करण्यासाठी कडक उन्हात वाळत घालण्याची पद्धत होती व आहे. धान्य त्याचप्रमाणे पापड इत्यादी वाळवण कडक उन्हात वाळविण्यामागे त्यांना केवळ कोरडे करणे एवढाच उद्देश नसून ते निर्जंतुक होणेदेखील महत्त्वाचे असते. सूर्यप्रकाशात पांडू, हृदयरोग यांचा नाश करण्याची शक्ती आहे. नवजात बालकांना शरीराला तेलाने हलकीशी मालीश करून सकाळच्या कोवळ्या उन्हात उघडे ठेवण्याची फार जुनी पद्धत आहे. या मुळे नवजात बालकांना होणारा कावीळ (Physiological Joundis) आपोआप कमी व्हायचा. यालाच आज आपण Photo Therapy किंवा बाळाला पेटीत ठेवणे असे म्हणतो.
 
आयुर्वेदात श्वेतकुष्ठ (Leucoderma) या व्याधीच्या चिकित्सेत सूर्यप्रकाशाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे.
 
श्वित्रे .त्वं पित्वाडभ्यक्तःतनुर्यथाबलं सूर्यपादसंतापम् ||
 
श्वेतकुष्ठपीडित भाग सूर्यकिरणात उघडा करून बसलेले असता तो लवकर बरा होतो, ही गोष्ट पूर्वीपासून आयुर्वेदाचार्यांना माहीत होती.
 
सूर्यकिरणातील अल्ट्राव्हॉयलेट म्हणजेच नीललोहितातित किरण हे त्वचेखालील कृष्णद्रव्य म्हणजेच मेलेनिन निर्माण करणार्‍या पेशींना उत्तेजित करतात. जेणेकरून त्वचेचा पांढरा झालेला वर्ण पुन्हा कृष्णवर्णात म्हणजेच त्वचेच्या वर्णात परिवर्तित होऊ लागतो. हे फार पूर्वीपासून भारतीयांना ज्ञात होते.
 

 
 
सूर्यकिरणातील जे उष्णता उत्पादक किरण आहेत त्यांचाही चिकित्सेत उपयोग आयुर्वेदाने केलेला आहे. यालाच त्यांनी तापस्वेद, सूर्यतापस्वेद, आतपस्वेद असे पर्यायी शब्द वापरले आहेत. सूर्याद्वारे शरीराला शेक देणे, स्वेदन करणे हा सर्वथा आयुर्वेदीय चिकित्सा आविष्कार आहे.
 
भारतीय हे सूर्योपासक आहेत. सूर्याला देव मानून त्याची परंपरागत पूजा केली जाते. सूर्य गायत्री मंत्राचा जप त्याचप्रमाणे प्रातःसंध्या व सायंसंध्या ह्या सूर्याच्या उपासना आहेत. सूर्योदय व सूर्यास्ताच्यावेळी केले जाणारे अग्निहोत्र हे अनेक शक्तींचे स्रोत व अनेक आजारांवरील उपाय म्हणून परिचित आहे.
 
सूर्यनमस्काराचा महिमा सर्वांना परिचित आहेच. सूर्यनमस्काराचे आरोग्याला होणारे फायदे सर्वज्ञात आहे.
 
अकाल - मृत्युहरणं सर्व - व्याधीविनाशनम्|
सूर्य - पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्||
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने
जन्मांतर - सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते||
 
आरोग्याचा आणि सूर्याचा असलेला निकटचा संबंध पाहता ऋग्वेदात म्हटलं आहे की.
 
नः सूर्यस्य संदृशे मा युयोथाः | ऋक्. २/३३/१
 
सूर्यप्रकाशाचा आम्हाला कधीच वियोग न घडो. हे किती यथार्थ आहे याची जाणीव सर्वांनाच आहे.
 
- डॉ. सुभाष वडोदकर