रथसप्तमी- नवी ऊर्जा देणारा सण!
 महा एमटीबी  23-Jan-2018


भारतीय सणांमध्ये रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. आणि सूर्याचा रथ मकरवृत्ताकडून विषुववृत्ताकडे भरधाव धावू लागतो. जसजसा सुर्य विषुसूवृत्ताकडे सरकतो तसतसे त्याचे साम्राज्य विस्तारते. दिवस विस्तारतो, पृथ्वी तापू लागते. आणि शेवटाला तर होरपळून निघते. ‘ग्रीष्म ऋतूच्या भव्य कटाही मानव जीवन तडकत लाही’ ह्या ओळींचा प्रत्यय येतो. सूर्याच्या आणि निसर्गाच्या शक्तीपुढे मानव नतमस्तक होतो.
 
फार पुरातन काळापासून मानव निसर्गाच्या शक्तींची पूजा करत आला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचतत्त्वांनी सजीवसृष्टी साकारली हे मानवाला उमगण्याच्याही आधीपासून सूर्य हा रात्रीच्या अंधारातून सुटका करणारा म्हणून पुजनीय ठरला. आर्यांनी वेदोक्त सुक्तांमध्ये त्याची स्तुतीकवने रचली. जगातल्या सर्व संस्कृतीमध्ये सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
 
महाभारतात तर भीष्मांनी प्राणत्यागासाठी सूर्य मकर राशीत कधी प्रवेश तो त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली आणि रथसप्तमीच्या दुसर्‍या दिवशी आपल्या शरपंजरी असलेल्या देहातून प्राणत्याग केला. रथसप्तमीपासून पुढे कणाकणाने दिवस मोठा होतो. सूर्याचा हा प्रवास प्रगतीकडे नेणारे प्रतीक समजला जातो. म्हणूनच कोणतीही शुभकार्ये ह्या संक्रमण काळात करणे अधिक फलदायी ठरते. दानधर्मादी पुण्यकर्मेही ह्यादिवशी करतात.
 
 
ह्या दिवशी पृथ्वीवर जणू नव्या पर्वाला सुरुवात होते. शेतकर्‍यांसाठी सुगीच्या नव्या हंगामाचीही ही शुभ सुरुवात असते. त्यादिवशी सुर्योदयापूर्वी शुचिर्भूत होवून सूर्यनमस्कार घालण्याची फार जुनी परंपरा आहे. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. श्‍वासाच्या नियमसूनाने सूर्यनमस्कार केल्यास ते अधिक फलदायी ठरतात. अनेकजण सूर्यनमस्कार नियमित घालण्याचा प्रारंभ रथरप्तमीच्या दिवशीच करतात. आता तर विविध संस्थांतर्फे सूर्यनमस्कार अभियान राबवले जाते आणि सामुहिक सूर्यनमस्कारांची चांगली प्रथा पडल्याचे आनंददायी चित्र अनेक ठिकाणी दिसते.
 
 
भौगौलिकदृष्ट्याही सूर्याचे महत्त्व मोठे आहे. नवग्रहांमध्ये सूर्याला मध्यभागी स्थान आहे. सूर्य मध्यभागी असून इतर ग्रह आपापल्या कक्षेत त्याच्याभोवती फिरतात. खरं तर, वेदांमध्ये ह्याचा उल्लेख आहे. नवग्रह मंत्रामध्ये सूर्याचा उल्लेख असून आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर ते सत्य ठरले आहे. ज्योतिषशास्त्रातही सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही जन्मपत्रिकेत रवि सर्वात आधी ज्या ग्रहासोबत योग करतो त्या ग्रहाला अनुकूल नोकरी, व्यवसायाचा अंदाज बांधला जातो. सूर्य हा नोकरीत महत्त्वपूर्ण आणि मानाची पदे देणारा ग्रह मानला जातो. बलवान रवी जातकाला उत्तम सरकारी नोकरी मिळवून देतो असे ज्योतिषशास्त्र सांगते.
 

 
 
रत्नशास्त्रानुसार सूर्याचे रत्न माणिक आहे. माणिक हे लाल-डाळींबी रंगाचे, जड, पाणीदार आणि स्निग्ध दिसणारे सुंदर रत्न आहे. हे रत्न षटकोनाकृती रचनेचे असते. पैलू न पाडलेल्या माणिकरत्नाचा तार्‍यासारखा आकार दिसतो. माणिक हे ऍल्युमिनियम ऑक्साईह आहे. शिवाय त्यात अल्प प्रमाणात लोहाची ऑक्साइड्स असतात. त्यामुळेच त्याला लाल रंग प्राप्त होतो. हिर्‍याच्या खालोखाल काठिण्य (९) असणारे हे रत्न ब्रह्मदेशात मोठ्या प्रमाणावर सापडते. तिथल्या जुन्या खाणीतील माणकांची गुणवत्ता ही जगात सर्वात उत्कृष्ट मानली गेली आहे.
 
 
आयुर्वेदात माणकाचे खूप उपयोग सांगितले आहेत. आयुर्वेदाच्या ‘रस शास्त्र’ ग्रंथात माणकाचा उपयोग कसा करुन घ्यावा, त्याचे सविस्तर वर्णन आहे. माणकाचे भस्म करण्याचा विधीही ह्यात स्पष्ट केला आहे. हे माणिकभस्म कफ-वातशामक असून क्षयनाशक, बलवर्धक आणि आयुष्यवर्धक असते. हृदयरोगांवरही माणकाचा उपयोग फार पूर्वीपासून केला गेला आहे. रशियातल्या काही तज्ज्ञांनी तर माणिक रत्नाचा अफलातून प्रयोग केला. हृदयरोग असलेल्या १० रोग्यांना विशिष्ट बोटाला माणिकरत्न चिकटपट्टीने ८ दिवस बांधून ठेवले. नवव्या दिवशी आश्‍चर्यकारक परिणाम हाती आले. माणकाच्या वापराने त्यांना रोगमुक्त केले होते. आपल्या आयुर्वेदात रत्नचिकित्सापद्धती सांगितलेली आहे. पण त्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
रथसप्तमीचा सुमुहूर्त साधून नवनवे संकल्प केले जातील. बलोपासना केली जाईल आणि सृष्टीला जीवन देणारा सूर्य सर्वांना नवी ऊर्जा देईल, अशी आशा बाळगूया.
 
 
- संगीता दीपक अट्रावलकर