जगविख्यात ‘नासा’ ही सूर्याच्या प्रेमात!
 महा एमटीबी  23-Jan-2018
 
 
 
 
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ २०१८ मध्येच जगातील पहिली सौर मोहीम करणार आहे. सूर्यावरील परिस्थिती कशी असेल, त्यातील भौतिक, रासायनिक बदल कसे होत असतील? असे अनेकानेक प्रश्न मानवाच्या अजूनही उत्सुकतेचा विषय ठरतात. त्याचे नेमके उत्तर शोधण्यासाठीच ही मोहीम आहे.
 
 
‘नासा’ने या मोहिमेला ‘द पार्कर सोलार प्रोब’ असे नाव दिले आहे. हे नाव सुप्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ ‘युजीन पार्कर’ यांना समर्पित करीत दिले गेले आहे. ‘नासा’ने पहिल्यांदाच अशा मोहिमेला व्यक्तीचे नाव दिले आहे. यापूर्वी कोणत्याही व्यक्तीच्या नावाने मोहीम केलेली नाही.
 
 
‘द पार्कर सोलार प्रोब’ हे सूर्याच्या पृष्ठभागाच्या अत्यंत जवळ जाणार आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे. सूर्याच्या उष्णतेच्या दृष्टिने सर्वच प्रावधान यात केले जाणार आहे. या मोहिमेत ‘नासा’चे काही शास्त्रज्ञदेखील जाणार आहे. चक्क सूर्यावर जाणारी ही पहिलीच माणसे असतील. ३१ जुलै, २०१८ रोजी हे अंतराळ यान प्रक्षेपित होईल. त्या आधी २० दिवस याची तयारी पूर्ण केली जाईल. ही मोहीम जगासाठी उत्सुकतेची ठरणार असून, बर्‍याच अंशी यात अनेक बाबतीत अनिश्चिततादेखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले असून, मानवजातीला यातून खूप काही मिळू शकणार आहे.
 
 
या मोहिमेत सूर्याच्या वातावरणातील विद्युतभारित कण पृथ्वीकडे कसे येतात आणि त्यांच्यामुळे होणार्‍या सौर वादळाचे काय परिणाम होतील, त्यापासून होणारे नुकसान कसे कमी करता येईल याचा अभ्यास करण्यात येणार आहे. आजवर ग्रहांचा अभ्यास करण्यात येत होता. आता एखाद्या तार्‍याच्या जवळ जावून तेथील वातावरणाचा अभ्यास करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
 
सूर्याचा त्रिमितीय अभ्यास
 
‘नासा’ने सूर्याचा त्रिमितीय अभ्यास करण्याचीही योजना आखली आहे. त्याला ‘स्टेरिओ मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये सूर्याचा सर्वंकष अभ्यास करून त्याच्यापासून निघणारे किरण, विद्युतभारित कण, त्याचे वातावरण यांची निरीक्षणे नोंदवण्यात येणार आहेत. यासाठी दोन स्पेसक्राफ्ट वापरण्यात येणार आहेत.