सूर्य... काही वैदिक संदर्भ!
 महा एमटीबी  23-Jan-2018

 
 
मत्स्य पुराणात म्हटले आहे की,
 
आरोग्यं भास्करादिच्छेध्दनमिच्छेध्दुताशनात्|
ऐश्‍वर्यमीश्वरादिच्छेज्ज्ञानमिच्छेज्जनार्दनात् ॥

सर्वांचे आरोग्य भास्कराच्या (सूर्य) इच्छेवर अवलंबून आहे. या विश्‍वामध्ये ज्या असंख्य सूर्यमाला, आकाशगंगा आहेत त्यांना जे प्रकाश ऊर्जा देतात त्या प्रत्येक तार्याला सूर्य म्हटले जाते. या सर्वांची अधिष्ठात्री देवता म्हणून हिंदू संस्कृतीत सूर्यनारायणाची पूजा केली जाते. सूर्य समस्त गृहमंडळांचा व त्यावरील सृष्टीचा संरक्षणकर्ता आहे. रामायणातील सुग्रीव व महाभारतातील कर्ण हे सूर्यतेजापासून निर्माण झाले, अशी आख्यायिका आहे. प्रत्येक दिवशी दर्शन घडते असा सूर्य ही पंचायतनातील देवता तेज तत्त्वाची अधिष्ठात्रा म्हणूनही ओळखली जाते. पृथ्वीवर असलेला अग्नी हे सूर्याचेच रूप समजले जाते.
 
 
ऋग्वेदामधील सौरसूक्ते, यजुर्वेद, अथर्ववेद यातील वेगवेगळी सूक्ते, तसेच सूर्य अथर्वशीर्ष उपनिषद, सूर्यतापिनी उपनिषद या प्राचीन रचनेवरून सूर्यदेवतेच्या पूजेचे प्राचीनत्त्व लक्षात येते.
 
 
सूर्यसाधनेसाठी विश्‍वामित्रप्रणित ‘गायत्रीमंत्र’ तसेच गुरुज्ञानवशिष्ठ सत्यसारायण ग्रंथातील सूर्यगीता हे ग्रंथ तत्त्वज्ञानदृष्ट्या प्रसिध्द आहेत. पौराणिक साहित्यात स्कंदपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, सौरपुराण व सांबपुराण ही सौरपुराणे म्हणून प्रसिध्द आहेत.
 
 
वेदांमध्ये आदित्य, सूर्य, पूषन, सवितृ अशा कित्येक नामकरणांमुळे या देवतेचे महात्म्य गायिलेले आहे. अथर्ववेदामध्ये सप्तसूर्याचा (अ. वे. १३-३-१०) उल्लेख असून, तैत्तिरीय अरण्यक मते, ते आरोग, भ्राज, पटर, पतंग, स्वर्णर, ज्योतिषीमत् विभास असे होत.
 
 
सूर्यकिरणांचे शास्त्रीय पृथ्थकरण सात रंगांमध्ये होऊन आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. हेच सातरंगी किरण व त्यांचा आरोग्यवरील परिणाम हे जगभर सर्वश्रूत आहेच. सप्तरंगी किरण म्हणजेच सूर्याच्या रथाचे सप्त अश्‍व नाहीत का? प्राचीन रोम शहरात ‘सूर्य उपचारगृहांची’ निर्मिती केलेली असायची. जेथे रोगी व्यक्तीला विनामूल्य सूर्यकिरण चिकित्सेने बरे केले जात असे. त्यामुळे रोममध्ये जवळजवळ ६०० वर्षे कोणत्याही डॉक्टरची गरज भासली नाही, असे रोमचे प्रसिध्द निसर्ग चिकित्सक डॉ. टिलनिका यांचे मत आहे.
 
 
आपण प्रवास जर असत्याकडून सत्याकडे केला तर अंधाराकडून प्रकाशात येऊ. त्यामुळे मृत्यूकडून मोक्षाकडे जाऊ. वाग्भट, चरक अशा सर्व आयुर्वेद विशारद ऋषीमुनींनी आरोग्यासाठी सूर्यसाधनेचा उपयोग सांगितला आहे. ऋग्वेदातील (१.५०.११-१३) ५० व्या सूक्तातील ११-१३ या ऋचा हृदयरोग, हरिमा (रक्तक्षय, कावीळ) हे रोग बरे करण्याबद्दलचा उल्लेख करतात. महर्षि याज्ञवल्क्य यांना शुक्ल यजुर्वेदाचे उपदेशक तसेच श्रीहनुमानाचे विद्या-गुरुसुद्धा सूर्यदेवांनाच मानले जाते.
 
 
जगात पारशी धर्मासहित कित्येक प्राचीन धर्म सूर्योपासक होते. ओरिसा भागात ‘सौर संप्रदाय’ थोडासा अस्तित्त्वात असून, सूर्याची निष्ठेने पूजा करणारे लोक आहेत. सूर्यमंदिरे जगभर वेगवेगळ्या स्वरुपात असली तरी कोणार्कच्या सूर्यमंदिरात १२ महिन्यांच्या शुक्ल व कृष्ण पक्षाच्या प्रतीकरुप सप्त अश्‍वांनीयुक्त अशा विशाल सूर्यरथाचे शिल्प कोरलेले आहे.
 
 
आपले पृथ्वीसहित सर्व ग्रह व उपग्रह सूर्यापासून निर्माण झालेले आहेत. हे सर्व सूर्याभोवती फिरत असतात आणि सूर्यामुळेच अस्तित्त्वात आहेत. पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी ही सूर्यकिरणांच्या शक्तीवरच जिवंत आहे. आपण जे अन्न घेतो ते अन्न म्हणजेच सूर्यकिरणांचे पृथक्करण करून वनस्पतीने जी सूर्यशक्ती खेचून घेतलेली असते ती शक्ती म्हणजेच आपले खरे अन्न आहे. ती वनस्पती खाणारे शाकाहारी प्राणी किंवा त्या शाकाहारी प्राण्यांना खाणार्या मांसाहारी प्राण्यांच्या मांसामधूनसुध्दा आपण घेतो ती ‘सूर्यशक्ती’च होय. हिमालयामध्ये हजारो फूट उंचीवर साधना करणारे हजारो ऋषीमुनी आजही फक्त सूर्यकिरणातील शक्तीवरच जगत आहेत. आपल्याला ही पृथक्करणाची माहिती नसल्यामुळे आपल्याला अन्नासाठी वनस्पतीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. ती प्रक्रिया आपल्याला समजली तर आपणही अन्न म्हणून फक्त सूर्यकिरणांचा उपयोग करू शकू. परंतु हिमालयातील ऋषी आपल्याला ही प्रक्रिया सांगणार नाहीत. त्यामुळे आपण सूर्योदयानंतर एक तास ते सूर्यास्ताअगोदर एक तास या वेळेतील सौम्य सूर्यकिरणांचा उपयोग करून घेऊन आपल्या वेगवेगळ्या व्याधी दूर करू शकतो. ताप, खोकल्यासारखे प्रासंगिक, कावीळ, क्षयासारखे, दुर्धर चर्मरोग असे असंख्य रोग सूर्यचिकित्सेने बरे होण्यास मदत होते. कृष्णपुत्र सांबाचा महारोग सूर्यकृपेनेच नष्ट झाला, तर महाकवी मयुराचा महारोग ‘सूर्यशतका’च्या रचनेने बरा झाला, अशी आख्यायिका आहे. बुध्दी आणि आरोग्याची देवता म्हणून सूर्याचे पूजन केले पाहिजे.
 
(संदर्भ - वेदान्ती सूक्ते)