आर्थिक विवंचना आणि तणावग्रस्त तरुणाई
 महा एमटीबी  23-Jan-2018

 
आजची तरुण पिढी ही स्वतःला चांगली जाणते. ते आत्मविश्वासाने भरलेले, स्वतंत्र आहेत. त्यांच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. आयुष्यात काम करण्याच्या संदर्भात त्यांचा दृष्टिकोन हा अधिक संतुलित आणि आधीच्या पिढीपेक्षा, अधिक चांगल्या तर्‍हेने त्यांचे ध्येय गाठण्याकडे आहे. आता जग टेक्नोसेव्ही झाले आहे, एका क्लिकवर सगळ्या गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. मात्र, आर्थिक चिंता आणि भौतिक गरजांची शाश्वतता यामुळे आपण असे करू शकत नाही, याचा ताण निर्माण होतो. यातूनच बरेचदा माणूस तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त होतो. अनेक तरुणांना वाटत असते की, आपण आपल्या अटींवर आयुष्य जगू शकतो आणि स्वत:च्या हिमतीवर पावले टाकत आपले भविष्य आपणच लिहू शकतो.
 
समाजात प्रामुख्याने दोन आर्थिक समूह आहेत. मात्र, पैशांच्या बाबतीत दोन्ही समान तणावाखाली आहेत. पहिल्या समूहात अशा व्यक्ती आहेत, ज्यांना माहीत आहे की, त्यांना काय हवे आहे आणि त्यांना जे हवे आहे ते मिळेलच, याची ते खात्री करून घेतात. ते त्यांच्या पालकांवर आर्थिकरित्या अवलंबून नसतात आणि भौतिक गरजांवर अविचारी पद्धतीने खर्च करत नाहीत. त्यांनी त्यांच्या जगण्याची एक विशिष्ट पद्धत अवलंबली आहे. ते खर्च करताना काहीसे कठोर निर्णय घेतात. तथापि, जेव्हा निवृत्तीच्या बचतीची वेळ येते, तेव्हा त्यांच्या क्षमतेवर दबाव येण्यासाठी सुरुवात होते. त्यांना चिंता वाटू लागते आणि अगदी मर्यादेच्या बाहेर जाऊन ते स्वतःला कामात झोकून देतात. बर्‍याच वेळा ते एक वा अधिक नोकरीमध्ये स्वतःला कार्यरत ठेवतात, जेणेकरून त्यांना जास्त पैसे मिळू शकतील. असे करण्यास सक्षमन ठरल्यास, मन तणावाच्या दिशेने जाऊ लागते.
 
याउलट तरुणांचा दुसरा असा समूह आहे, ज्यांचा खिसा कायम उघडा ठेवण्यात ते धन्यता मानतात. चांगली वेळ निघून जाईल याची भीतीही त्यांना वाटत नाही. महिन्याच्या शेवटी ज्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, ज्यामुळे चिंता वाढीला लागते, असा समूह हेच दर्शवितो की, खर्‍या आयुष्याला सामोरे जाण्यासाठी ते अजूनही तयार नाहीत. बर्‍याचदा भाड्याचे पैसे किंवा दैनंदिन खर्चापेक्षा ’नाईट आऊट’चा खर्च अधिक असतो. आयुष्याकडे योग्य तर्‍हेने न पाहता वाईट सवयी लावून त्यांचे आयुष्य वेगळ्या दिशेने आणि तणावाखाली जाऊन उदासीनतेला आमंत्रण देते.
 
सतत आपल्या समवयस्कांसोबत तुलना करणे आणि आयुष्यात सर्व चैनीच्या गोष्टी मिळायला हव्यात, या प्रयत्नांमुळे तरुणांमध्ये तणाव, चिंता निर्माण होऊन त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. मुले स्वभावाने आशावादी असतात. मात्र, बर्‍याचदा मोठ्या माणसांच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करतात. बदलत्या जीवनामुळे आजची पिढी ही वाढत्या संकटाला सामोरी जात आहे. १८ ते ३० या वयोगटातील पिढीचा यात समावेश असून, स्पर्धात्मक युगात अगदी लहानसहान गोष्टी मिळवण्यासाठीदेखील ही पिढी आटापिटा करत आहे. असे करण्यात अपयश आल्यास, कोणीही आतून तुटू शकतो आणि मानसिक तणावाखाली येऊ शकतो. अशावेळी त्यांना सांभाळण्याची सर्वात मोठी भूमिका ही पालक, शिक्षक, मित्र आणि अन्य सहकारी यांची आहे. चिन्हे आणि लक्षणे पाहून अशा शोकांतिकेतून त्यांना वाचवणे शक्य होऊ शकते. तरुण मुलांनी आपल्या प्रश्नांबद्दल खुल्या मनाने बोलायला हवे, ज्यामुळे त्यांना मदत करता येऊ शकते. पैशांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात पालक आणि अन्य प्रौढांशी बोलून हे अंतर भरून काढता येऊ शकते, पालकांचा अनुभवदेखील मदतशीर ठरू शकतो. आर्थिक घडी बसविण्यासाठी पालकांचा त्यांच्या मुलांना दिलेला सल्ला हा महत्त्वाचा ठरू शकतो, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव येणार नाही आणि अंधाराकडून उजेडाकडे जाणार्‍या रस्त्याचा मार्ग त्यांना खात्रीशीर मिळू शकेल.
 
 
- डॉ. पारूल टंक
 
(लेखिका फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड
येथे सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)