क्रिकेट हाच जगण्याचा श्वास
 महा एमटीबी  23-Jan-2018
 
 
 
तीनच दिवसांपूर्वी अंध क्रिकेट संघाच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजय प्राप्त केला आणि तोही शारजाहच्या स्टेडियममध्ये. भारताने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानने ३०९ धावांचा डोंगर रचला. एक क्षण भारतीय संघाला वाटले असेल की, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा पाकिस्तानला संधी देण्याचा निर्णय चुकला तर नाही ना? पण, भारतीय संघाचे कर्णधार अजयकुमार रेड्डी मात्र निश्चिंत होते. देशाच्या आणीबाणीसाठी खेळायचे, हा विडा उचलून भारतीय संघाचे कर्णधार अजयकुमार रेड्डी प्रतिक्षेत होते ते केवळ विजयाच्या. भारतीय क्रिकेट संघाने संधी मिळताच पाकिस्तानला हरवत विश्वचषक पटकावला. क्रिकेट विश्वात भारत देशाचे नाव गौरवान्वित झाले. त्यानंतर विश्वचषक स्वीकारताना कर्णधार अजयकुमार रेड्डी संघाचा विश्वविजय देशाच्या सैनिकांना समर्पित करताना म्हणाले, ’’हा विजय देशासाठी लढणार्‍या आणि देशासाठी आयुष्य वेचणार्‍या सैनिकांना समर्पित आहे, त्यांच्यामुळेच देशात शांतता नांदत आहे.’’
 
 
क्रिकेटचा खेळ म्हटला की, अष्टावधान जरूरीचे! संयम, शिस्त आणि अपरिमित शारीरिक, मानसिक ऊर्जा अत्यंत गरजेची. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंशतः अंध असलेल्या व्यक्तीने क्रिकेटची आवड जोपासणे, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसणेे शब्दातीत असते. भारतीय अंध क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण जीवनकहाणी आहेच. त्यामध्ये संघाचे कर्णधार अजयकुमार रेड्डी यंाचीही जीवनकहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले अजय. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी सामान्यच. अशा परिस्थितीत किशोरवयात असताना अजयकुमारांच्या डोळ्यांना संसर्ग झाला. डाव्या डोळ्याने दिसणे पूर्ण बंद झाले, तर उजव्या डोळ्याने फक्त दोन मीटर अंतरापर्यंतचे दिसू लागले. समोर उभे आयुष्य होते. अजयकुमारांना त्यावेळी काय वाटले असेल तेच जाणो. शिक्षणासाठी ते नरसारावपेट इथल्या अंध शाळेत गेले. तिथे क्रिकेटची आवड आणि गोडी जास्तच वाढली. पण, शेतकरी वडिलांना अजयचे क्रिकेट खेळणे आवडले नाही. त्यांनी ठामविरोध केला. तरीही अजयकुमार हिंमत हरले नाहीत. इच्छा तिथे मार्ग असतोच.
 
 
अजयची ओळख अंध क्रिकेटर जी. नागेश्वर राव यांच्याशी झाली आणि तिथूनच मग एक क्रिकेटवीर म्हणून अजयचा प्रवास सुरू झाला. २००६ साली अजयकुमार आंध्र प्रदेशच्या क्रिकेट संघासाठी निवडले गेले. पुढे ४ वर्षांनंतर २०१० साली अजयकुमार अंध भारतीय क्रिकेट संघासाठी खेळू लागले. २०१० सालच्या इंग्लंडच्या सामन्यामध्ये त्यांना दोनदा सामनावीर म्हणून किताब मिळाला. सातत्यपूर्ण सराव, खेळाशी प्राणांतिक निष्ठा यामुळे अजयकुमार अंध भारतीय क्रिकेट संघाचे दोन वेळा उपकर्णधार झाले. अजयकुमार उपकर्णधार असताना भारतीय अंध क्रिकेट संघाने दोनदा विश्वचषक क्रिकेट सामना जिंकला होता. आता २०१८ सालच्या विश्वचषक स्पर्धेत अजयकुमार कर्णधार असताना संघाने विश्वचषक जिंकला. क्रिकेटबाबत बोलताना अजयकुमार म्हणतात, ’’क्रिकेट हेच माझे विश्व-आयुष्य आहे. त्यापलीकडे माझे जीवन नाही. गमतीसाठी, प्रसिद्धीसाठी अगदी पैशासाठीही खेळणारे आहेत. पण, जगण्याचा श्वास समजून देशासाठी क्रिकेट खेळणारे अजयकुमार खेळातील दीपस्तंभच आहेत.’’
 
- योगिता साळवी