अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटावर मात
 महा एमटीबी  23-Jan-2018

 
पृथ्वीसाठी सूर्य हा मोठा ऊर्जेचा स्त्रोत अनादी अनंत काळापासून ठरलेला आहे. सौर ऊर्जेसह अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जैन इरिगेशनने अपारंपरिक ऊर्जेत केलेल्या कार्याची ओळख ‘तरुण भारत’च्या वाचकांसाठी करून देत आहोत...
 
 
मानवाचा जसजसा विकास होवू लागला तस-तशी त्याला जास्त ऊर्जेची गरज भासू लागली. वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल स्वरूपाची ऊर्जा, कारखादारीसह अन्य कामांसाठी विजेच्या स्वरुपात मानवाने ऊर्जा निर्माण केली. वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या ऊर्जेचा वापर पाहता पेट्रोल, डिझेल, कोळसा, क्रुड ऑईलपासून निर्माण केलेल्या ऊर्जेस कुठेतरी मर्यादा येवू लागल्यात. खनिज तेलाचे साठे संपण्याचे वास्तव मानवास उमगू लागले. त्यातच पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसासह अन्य संसाधनापासून ऊर्जा तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडसारखा पर्यावरणाचा र्‍हास करणारा घटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला. यातून पर्यावरणपूरक मात्र शाश्वत ऊर्जचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न होवू लागलेत. या प्रयत्नांतूनच सौर ऊर्जचा शोध लागला. मुबलक व भरवशाची घरांघरांवर विद्युत ऊर्जा, उष्णता देणारी ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आणि शाश्वत अपारंपारिक स्त्रोत म्हणून समोर आली आहे. सौर ऊर्जेबरोबर, पवन ऊर्जा, घन कचर्‍यापासून इंधन निर्मिती, समुद्र लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून प्रत्येक कुटूंबीयांना त्याचा कळत- नकळत फायदा होत आहे. यामध्ये जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संशोधक नजरेतून ग्रीन एनर्जी प्रकल्प साकारण्यात आला. याव्दारे जैन सोलर, जैन ज्योत, जैन सोलर पंम्प, जैन बायोएनर्जी, जैन फोटोवोल्टिकच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जेचे मार्ग सर्वांना खुले झाले. ‘वेळ, काळ, परिस्थितीनुसार जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलविणे आणि देशाच्या उत्पादकतेमध्ये भर टाकताना समाज जीवनाला जास्त समृद्ध करता येईल. अशा पद्धतीने कार्य केले तर ही समाजाची खर्‍या अर्थाने सेवा होईल.’ असे श्रद्धेय मोठ्याभाऊंचे विचार होते. या विचारातून आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला हा फायदा व्हावा असे जैन ग्रीन एनर्जीचे सोलरवरील उत्पादने आहेत. भूमिपुत्रांना विकासाची गंगा पार करता यावी, यासाठी जैन सौर कृषी पंपाव्दारे शाश्वत शेतीचा मंत्र जैन इरिगेशनने शेतकर्‍यांना देवून परिवर्तनाचा अध्यायच रचला आहे.
 
 
सौर ऊर्जेचा देश म्हणून भारताची ओळख आहे. ३६५ दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सर्व देशवासीयांनी समाजभिमुख होवून लक्ष द्यायला पाहिजे. दर दिवशी सूर्याकडून १ चौ.मी. क्षेत्रफळावर १ किलोवॅट प्रतितास एवढी विद्युत ऊर्जा मिळत असते. या ऊर्जेपासून १०० वॅटचा एक दिवा दहा तास चालू शकतो एवढी क्षमता त्याच्यात असते. वीजनिर्मितीकरिता, अन्न शिजविण्यासाठी, पाणी गरम करण्याकरीता, वेगवेगळे पदार्थ वाळविण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळ्या कामांकरिता या क्षेत्रफळावर पडणार्‍या सौर ऊर्जेचा वापर आपण करू शकतो. जगात सर्वात जास्त सौर ऊर्जेची उपकरणे वापरण्यात भारत अग्रेसर आहे. तरी ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसू लागले आहेत त्या तुलनेने समाजात सौर ऊर्जेविषयीची जागरूकता, त्या विषयीच्या उपाय योजना करण्याबाबत समाजात अनास्था दिसून येत आहे.
 

 
 
देशाच्या ग्रामीण भागात ६५ टक्के जनता राहते. १८ कोटी कुटुंबे अन्न शिजवण्यासाठी जंगलातील लाकूडफाटा वापरतात. लाकडाचे ज्वलन झाल्यानंतर निर्माण होणार्‍या धुरामुळे दर वर्षी सुमारे ५ लाख गृहिणींना जीव गमवावा लागतो. सुमारे ८ लाख कुटुंब अजूनही केरोसीनच्या दिव्यांचा वापर करतात. यातून करोडो टन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होतो. दिव्यांचा झगमगाट पर्यावरणाला हानी पोहचवत आहे.
 
 
ऊर्जेच्या पारंपरिक आणि अपारंपरिक साधनांचा काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या ऊर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. जैन सोलर कृषि पंम्प यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जैन सोलर, जैन ज्योत त्याच्या जोडीला आहेत. सूर्यचुल, सौर उष्णजल संयत्र, सौर फवारणी यंत्र, सौर सिंचन व्यवस्था, सौर गृह प्रकाश प्रणाली, जैव वायू संयत्र, पवन चक्की, कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी वापरतात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येवू शकते.
 
 
- देवेंद्र पाटील