पद्मावतचा वाद कायम, दोन राज्यांचा अजूनही विरोध
 महा एमटीबी  22-Jan-2018

 
मुंबई : पद्मावत चित्रपटामागे लागलेले वादाचे चक्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेच न्यायालयाने 'सर्व राज्यांमध्ये पद्मावत एकाच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल तसेच त्यावर असलेली बंदी काढा.' असा आदेश दिल्यानंतर आता पुन्हा मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांनी पद्मावत वर बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायलय यावर उद्या सुनावणी करणार आहे.
 
याआधी देखील पद्मावत या चित्रपटावर विरोधाची झोड उठवण्यात आली होती. आधी चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. त्यानंतर देखील करणी सेनेचा विरोध काही थांबला नाही. राजस्थानसह गुजरात, मध्यप्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी देखील या चित्रपटावर बंदी घातली मात्र मागील आठवड्यात न्यायालयाने ही बंदी हटवण्याचा आदेश राज्यांना दिला.
 
४ राज्यांमध्ये या चित्रपटांवर बंदी घातल्यामुळे त्याविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान आता हा चित्रपट सर्व राज्यांमध्ये २५ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.