‘आपला मानूस” ची टीम पुणेकरांच्या भेटीला !
 महा एमटीबी  22-Jan-2018
 
 
 
 
पुणे २२ जानेवारी, २०१८ : वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की ! हा चित्रपट एका नाटकाच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्यालाजोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. आपला मानूस चित्रपटाच्या टीजरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहे.
आपल्या मराठी चित्रपटाचा पायंडा नेहमी नातेसंबंधांचा आणि परस्पर एकमेकांसोबतची ताकद काय असते याबद्दलचा असतो. या चित्रपटामध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण दांपत्याची कथा मांडली असून, या भूमिका साकारल्या आहेत, अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी. तसेच यात वडीलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखविलेली आहे. वडीलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो. ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबा विषयीच्या श्रध्दांवर प्रश्न उभे राहतात.
 
 
नाना पाटेकर म्हणाले,“नटसम्राट नंतर, मी काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पहात होतो, एखादे असे पात्र जे ऐकल्यानंतर मी सोडणार नाही आणि मारुती नागरगोजे मध्ये मला ते सापडले. ते एक क्लिष्ट पात्र आहे, मराठी सिनेमामध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याचे हावभाव आणि त्याच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण बनले आहे.”

 
 
सतीश राजवाडे म्हणाले, हा एकच धाटणीवर आधारित सिनेमा नाही, स्टोरी टेलिंग चा वेगळा वापर करून हा सिनेमा लिहिला आहे यामुळे दर १५  मिनिटांनी वेगळा जॉनर यामध्ये तुम्हाला दिसेल. नाना पाटेकर यांच्या सोबत काम करताना अनुभव सुंदर होता, प्रत्येक बाबीसाठी नाना तयार असतात प्रत्येक वेळी त्यांचा वेगळा अप्रोच असतो, तिघेही कलाकार परफॉमर आहेत, परस्पर नातेसंबधावर हा सिनेमा बोलतो.
इरावती हर्षे म्हणाल्या, भूमिकेबद्दल सांगण्यापेक्षा तुम्ही सिनेमात बघा, मी स्वतः ला भाग्यशाली समजते नाना पाटेकर यांच्या सोबत काम करता आले, नानांचे काम प्रेरणा देणारे आहे, त्यांच्याकडून शिकायला मिळालं. नाटकावर आधारित असला तरी हा सिनेमा त्या नाटकापेक्षा वेगळा अनुभव प्रेक्षकांना देणारा आहे.
 
या सहकार्याबद्दल बोलताना व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स मराठी आणि कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले, "गेल्या पाच वर्षात मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आपल्या नावीन्यपूर्ण कथाकथनाच्या आणि अनोख्या संकल्पनांनी अन्य कोणापेक्षाही अधिक प्रभाव टाकला आहे. ‘आपला मानूस’ ही २०१८  मधील व्हायकॉम १८ ची पहिली निर्मिती असेल. आपल्या प्रभावी अभिनय व संवाद कौशल्यांमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अष्टपैलू कलाकार नाना पाटेकर आणि जबरदस्त कथानकासह ‘आपला मानूस’संकटांशी झुंजणाऱ्या आणि आयुष्यात काहीतरी अनपेक्षितपणे अशुभ घडण्याच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबाचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न करेल. हा एक विवेकी चित्रपट असून प्रेक्षकांना तो भावेल, याची मला खात्री आहे."
वायाकॉम १८  मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत “आपला मानूस” या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्मस, वॉटरगेट प्रॉडक्शन्स आणि श्री गजानन चित्र यांनी केली असून सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट ९.०२.२०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.