समाज बाहुले आहे का?
 महा एमटीबी  22-Jan-2018

 
 
काही विशिष्ट लोक समाजाच्या भावनिक सलोख्याशी खेळत असतात. आता हे लोक म्हणजे ते कोण बाहेरून वगैरे आलेले लोक नाहीत बरं. तर या देशात राहणारे, या देशातल्याच सर्व सोयी सुविधा वापरणारे स्वत:चे, स्वत:च्या पोराबाळांचे आयुष्य झकासपणे सेट केलेले काही तथाकथित विचारवंत असतात. त्यापैकी काही लोकांचा त्यांच्या सोईनुसार अत्याचाराच्या संकल्पना बदलण्यातच जन्म जातो. उदाहरणार्थ सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होतो, म्हणत याच लोकांनी पुढे बोलायला सुरुवात केली. मुंबईतल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर अन्याय होतो. नंतर याच लोकांनी पुन्हा मोर्चा प्रकल्पग्रस्तांकडे वळवला पण जो बुंद से गयी वो हौदसे नही आती. सरदार सरोवराचे काम पूर्ण झाले होते. आता मग करायचे काय? तर काल-परवा मुंबई विक्रोळीजवळील पवई आयआयटीच्या एका कार्यक्रमात यांच्या महामहीम ताईंनी सूर आळवले. दलितांवर अत्याचार वाढू लागलेत. झाले. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त संपले, मुंबईतल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांचे प्रश्‍न संपले. आता त्यांना दलितांवर होणार्‍या अत्याचारात वाढ झाली आहे, असा साक्षात्कार झाला आहे. अर्थात त्यांना तसा तो साक्षात्कार विक्रोळीसारख्या ठिकाणी व्यक्त करणे हा योगायोग नाही.
 
 
३ जानेवारी रोजी झालेल्या ’बंद’मध्ये पवई आणि विक्रेाळी परिसरामध्ये भयानक हानी झाली होती. आता वातावरणातला तणाव निवळत पुन्हा सलोख्याचे वातावरण तयार होत आहे. हेच चित्र महाराष्ट्रभर आहे. हे सलोख्याचे वातावरण टिकवणे काळाची गरज आहे, पण स्वतःला प्रकल्पग्रस्तांचे मसिहा समजणार्‍यांना समाजामध्ये सलोखा हवा की तणाव हवा आहे? हे उघड गुपित आहे. याचे उत्तर आहे की, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ’’माझे लोक भोळे आहेत.’’ आज बाबासाहेबांचे विचार आठवण्याचे कारण की आजही सामाजिक न्यायाचा मुखवटा ठेऊन काही लबाड लोक खरंच भोळ्या समाजामध्ये संभ्रमाचे नासके बिज पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ३ जानेवारीनंतर या लोकांना दिवास्वप्न पडू लागली आहेत की, मुंबईमध्ये ते आपल्या नासक्या विचारांचे बेट विस्तारू शकतील. समाजात दुही पेरणार्‍यांचे दिवास्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि सावरकरांच्या महाराष्ट्रानेही एकत्र यायलाच हवे. समाजाला बाहुले बनविणार्‍यांना त्यांची जागा दाखवायला हवी. कारण कुणीही येऊन समाजाला हवे तसे नाचवत असेल तर ते थांबायला हवे.
 
 
समरस समाज
 
देशभर नव्या सकारात्मक गोष्टी घडत आहेत. नाईलाजाने नक्षली झालेल्या, विध्वंसक कृत्याकडे वळलेल्या काहींनी शस्त्रे खाली ठेवत समाजाचा भाग होण्याची मनापासून इच्छा प्रकट केली. अशांना समाजाच्या प्रवाहात पुन्हा आणणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खरंच स्तुत्य काम केले आहे. अशा सुधारित लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम आणि जीवनाला सकारात्मकतेचे वळण लावले आहे. बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना यापैकीच एक चांगली योजना.
 
 
या योजनेनुसार आत्मसमर्पण केलेले पूर्वीचे नक्षली मात्र आता समाजभान आलेले नागरिक यांना गडचिरोलीसारख्या क्षेत्रात एसटी वाहक म्हणून नोकरी मिळणार आहे. यवतमाळमध्ये तर वनवासी भगिनींनी एसटी चालविण्याचे प्रशिक्षणही घेतले. त्या एसटीवाहक होणार आहेत. ही खरंतर किती मोठी गोष्ट आहे. दुर्दैवाने समाजप्रवाहातून येनकेनप्रकारे दूर फेकले गेलेले हे वंचित बांधव नव्या आत्मविश्‍वासाने समाजात जगणार आहेत. ते प्रतिनिधित्व करणार आहेत, अशा भारताचे ज्यात सर्वांनाच खरोखर सामाजिक न्याय मिळत आहे आणि जे अंतरंगाने एकमेकांशी समरस आहेत.
 
 
शिक्षण नाही, संधी नाही आणि काही भविष्य नाही या खातेर्‍यातून बाहेर पडण्यासाठीचा हा एक छोटासा का होईना मार्ग आहे. अर्थात वंचित समाजासमोर आजही समस्या डोंगराएवढ्या आहेत. त्यांना कोणतेही सरकार असले तरी ते १०० टक्के पुरे पडू शकत नाही पण म्हणून सध्याचे सरकार हातावर हात ठेऊन बसले नाही. तर आपल्यापरीने त्यावर मार्ग काढण्याचा प्रेरणादायी प्रयत्न सरकारने केला. याबाबत सरकारचे अभिनंदन. आज नक्षलींचे उपरे विचार वनवासी क्षेत्रांतून हद्दपार होण्याची सुरुवात होत आहे. न्यायाचा आवाज उठविणारे अन्यायाची दहशत पसरवतात. याची अनुभूती समाजाला झाली आहे. त्यामुळे आपण स्थानिक असून आपल्याला स्थानिकांचे सहकार्य आहे, असा टेंभा मिरवणार्‍या नक्षली विचारधारेची बोलती बंद व्हायला आली आहे. न घर के ना घाटके अशा परिस्थितीतून नक्षलींचे कार्यक्षेत्र केंद्र बदलत जाणार, हे नक्कीच. दुर्गम जंगल ते ग्राम, ग्राम ते शहर असा त्यांचा प्रवास सुरू झाला आहेच. त्यात त्यांना समर्थन करत आगीत तेल ओतण्याचे काम काही विध्वंसक विदूषक करत असतातच. पण काल झाले ते आज होणार नाही. समाज जागा झाला आहे. मूळ राष्ट्रीय प्रवाहात सगळा समाज समरस होणार आहे.
 
 
- योगिता साळवी