कच-यापासून सी.एन.जी. निर्मितीचा यशस्वी प्रयोग
 महा एमटीबी  22-Jan-2018

 
 
Ecopreneurship ही उद्योजकतेतली नव्याने उदयाला आलेली संकल्पना आहे ज्याला मराठीत ’पर्यावरणीय उद्योजकता’ (Environmental Entrepreneurship) असं म्हणता येईल. ज्यात पर्यावरण रक्षणही होईल आणि नफाही मिळेल, अशा उद्योगांच्या संधी शोधून त्यात खासगी उद्योजकांनी गुंतवणूक करणे म्हणजे Ecopreneurship. पुण्याचे संतोष गोंधळेकर हे असेच एक Ecopreneur आहेत, ज्यांनी स्वत: संशोधन करून  तयार करण्याच्या उद्योगात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे नव्या तंत्रज्ञानाने तयार केलेल्या सी.एन.जी.वर प्रत्यक्षात गाड्याही धावू लागल्या आहेत.
ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी असलेल्या संतोष गोंधळेकर जैविक कच-यापासून सी.एन.जी. वायूर यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. शेतात तयार होणा-या गवत, उसाची चिपाडे, पालापाचोळा इत्यादींपासून सी.एन.जी. कसा तयार करता येईल यावर गेली १०-१५ वर्षं त्यांचं सहकार्‍यांबरोबर संशोधन सुरू होतं. त्यांच्या या संशोधनाला १०० टक्के यश आलं आहे. संतोष गोंधळेकर यांनी २००८ साली सहकार्‍यांच्या बरोबरीने ’प्रायमूव्ह इंजिनिअरिंग प्रा.लि.’ ही कंपनी स्थापन केली. टाकाऊ शेतमाल आणि इतर जैविक कचरा एकत्र करून त्यावर जीवाणूंची प्रक्रिया करून त्यापासून सी.एन.जी.ची निर्मिती करण्याचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं. या वायूमध्ये ६० टक्के मिथेन आणि २० टक्के कार्बन डायॉक्साईड असून हा शून्य प्रदूषण करणारा आहे. जैविक सी.एन.जी. हा नैसर्गिक वायूसारखाच असतो आणि तो सिलिंडरमध्ये भरून स्कूटर, कार आणि बसमध्ये इंधन म्हणून वापरता येतो.
 
गेल्याच वर्षी पुण्याजवळील पिरंगुट येथे अशा पहिल्या जैविक सी.एन.जी. प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरी आणि मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गोंधळेकर यांच्या संशोधनानुसार भारतात दरवर्षी सुमारे ६०० दशलक्ष टन एवढा टाकाऊ शेतमाल तयार होतो. यातून सुमारे १०० दशलक्ष टन इतकी बायो-सी.एन.जी. निर्मिती शक्य आहे. भारताला ८० टक्के खनिज तेलाची आयात करावी लागते. इंधनाच्या आयातीवर भारताचे दरवर्षी सुमारे ५ लाख कोटी रुपये खर्च होतात. हेच पाच लाख कोटी भारतीय शेतकर्‍यांना मिळाले तर किती फायदा होईल या विचारातून गोंधळेकर यांचा हा प्रकल्प साकार झाला आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि नैसर्गिक वायूला १०० टक्के भारतीय आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करण्याचं गोंधळेकर यांचं ध्येय आहे.
 
बायो सी.एन.जी.चा पहिला प्रकल्प त्यांनी पुण्याजवळील पिरंगुट या गावी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला. या प्रकल्पामधून आज दिवसाला १०० किलो बायो सी.एन.जी.चे उत्पादन होतं. टाकाऊ शेतमाल शेतकर्‍यांकडून रु. ५०० ते रु. १५०० प्रति टन या दराने घेतला जातो. त्यापासून जैविक सी.एन.जी. ची निर्मिती करून तो रु. ५० प्रति किलो या दराने विकला जातो. ही किंमत पेट्रोलच्या निम्मी आहे. दिवसाला ५ टन बायो सी.एन.जी. निर्मितीक्षमता असलेल्या दोन प्रकल्पांचं काम नागपूर आणि गुजरातमध्ये सुरू आहे. एका प्रकल्पासाठी सुमारे २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे. बायो सी.एन.जी.च्या संशोधनाअगोदर त्यांनी गंगोत्री इको-टेक्नोलॉजी प्रा.लि. या कंपनीअंतर्गत बायोमासच्या कांड्या बनवून त्यापासून कृत्रिमरित्या गोबरगॅस बनविण्याचं तंत्र विकसित केलं. पुण्याजवळील अनेक हॉटेल्सना आणि उद्योगांना या कांड्या पुरवल्या जातात. या कांड्या जाळून इंधन मिळविण्यासाठी त्यांच्या कंपनीने विशिष्ट प्रकारच्या शेगड्या तयार केल्या आहेत. जैवकच-यापासून बनविलेल्या या कांड्या थेट जाळून वा त्यापासून गॅसनिर्मिती करून इंधन मिळवलं जातं. अशाप्रकारे त्यांनी चुलीसाठी आणि घरगुती गॅससाठीही उत्तम पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध केला आहे. मुंबईमध्ये घाटकोपर येथे त्यांनी अशाच प्रकारचा बायोमासच्या कांड्या बनविण्याचा उद्योग सुरू केला आहे. भारताच्या शाश्वत विकासात संतोष गोंधळेकर यांचं हे संशोधन मैलाचा दगड ठरेल, हे निश्चित.