सनई ना बोलते ना ऐकवते, ती भिडते काळजाला; पण 'यंटम' भिडेल का?
 महा एमटीबी  20-Jan-2018


 
ग्रामीण भाग, महाविद्यालयीन युवक-युवती, मुलगा गरीब, मुलगी त्यातल्या त्यात जरा चांगल्या घरातली, त्या दोघांमध्ये प्रेम आणि शेवट... जो तुम्हा आम्हाला माहित आहे. या अशा धर्तीवरचे अनेक चित्रपट आपण पहिले असतील, सैराटचा प्रभाव अजूनदेखील आपल्या मनातून उतरलेला नाहीये. तरीदेखील याच आशयाचे चित्रपट मराठी मध्ये येताना दिसतात. अर्थात त्यात थोडे फार बदल केलेले असतात, पण ते तितके प्रभावी ठरू शकतील का असा प्रश्न 'ट्रेलर' बघितल्यावर पडतो. असाच 'यंटम' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. सनई ना बोलते ना ऐकवते, ती भिडते काळजाला, असे काही प्रभावी संवाद यात आहेत खरे पण हा चित्रपट काळजाला भिडेल का याबाबत मात्र साशंकताच आहे.
 
 
रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर समीर आशा पाटील हा युवक याचा दिग्दर्शक आहे. वर जे नमूद केले आहे अगदी त्याच गोष्टी या चित्रपटात असाव्यात असा प्रथमदर्शी अंदाज आहे. एवढं काय, तर याचा शेवट काय असेल हे देखील ट्रेलर बघितल्यावर काहींच्या लक्षात येऊ शकते. इतक्या सगळ्या गोष्टींचा उलगडा ट्रेलर मधून करणं खरंच गरजेचं होत का, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
सयाजी शिंदे हे एकाच अनुभवी नाव या चित्रपटाच्या अभिनयाबाबत घेता येईल. बाकी सर्व कलाकार नवखे आहेत. यात वैभव कदम, अपूर्वा शेळगावकर, ऐश्वर्या पाटील, ऋषिकेश झगडे आदींचा उल्लेख करता येईल. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे २ फेब्रुवारी २०१८ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. आता तेव्हाच कळेल की 'यंटम' खरंच काळजाला भिडतो का नाही...