‘स्कीईंग क्वीन’
 महा एमटीबी  20-Jan-2018
 

 
हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, आसाम आदी अनेक राज्यांमध्ये हिमालयीन साहसी खेळांच्या प्रशिक्षण संस्था आहेत. मात्र, बर्फावर होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेषत: हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा सहभाग इतका अल्प असतो की, एखाद-दुसराच खेळाडू त्यासाठी पात्र ठरतो. त्यामुळेच हिवाळी क्रीडा प्रकारांमधील आंतरराष्ट्रीय पदकांपासून भारत खूपच दूर समजला जातो. आंचल ठाकूर हिने हा दुष्काळ संपविला आहे. अवघ्या २१ वर्षांच्या आंचल ठाकूरने अतुलनीय कामगिरी बजावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिने तुर्कीमध्ये झालेल्या स्कीईंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्कीईंग महासंघाने आयोजित केली असल्यामुळे तिचे हे यश खरोखरीच कौतुकास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कीईंगमध्ये पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने स्लालोमप्रकारात हे पदक मिळवले.
 
आंचल ही मनालीजवळील बुरुआ या खेडेगावातील रहिवासी. तिचे वडील रोशन हे स्वत: स्कीईंगपटू असून ते भारतीय हिवाळी क्रीडा संघटनेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. भारताच्या अनेक ठिकाणी पर्यटन व्यवसायाचा एक भाग म्हणूनही स्कीईंग आयोजित केले जात असते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक असणारा अपेक्षेइतका नैपुण्यशोध घेतला जात नाही आणि समजा घेतला गेला तर त्या प्रमाणात या खेळाडूंचा विकास होत नाही. स्पर्धात्मक स्कीईंग व अन्य हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असणार्‍या जागतिक दर्जाच्या सुविधांचा अभाव, परदेशात प्रशिक्षण घेण्याबाबत असलेल्या आर्थिक मर्यादा, या खेळाविषयी राष्ट्रीय स्तरावर असलेले अज्ञान यामुळेच हिवाळी क्रीडा प्रकारांमधील खेळाडू उपेक्षितच राहिले आहेत. आंचल हिने कांस्यपदक मिळविल्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. ‘‘माझ्या कांस्यपदकामुळे आता तरी शासकीय स्तरावर हिवाळी क्रीडा प्रकारांकडे लक्ष दिले जाईल,’’ अशी तिने अपेक्षा व्यक्त केली आहे. स्कीईंगपटूंना वर्षाकाठी साहित्य, प्रशिक्षण, आहार, वैद्यकीय मदत आदी गोष्टींकरिता कमीत कमी सात ते दहा लाख रुपये खर्च येतो. आंचल हिला तुर्की येथील स्पर्धेसाठी झालेला बराचसा खर्च तिच्या वडिलांनीच केला. हिमाचल प्रदेश शासनाने तिला पाच लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे खेळाडू दीड-दोन वर्षे कॅनडा, अमेरिका किंवा युरोपियन देशांमध्ये सराव करीत असतात आणि भरपूर पदकेही मिळवितात.
 
आपल्या देशात बर्फाळ प्रदेशाची कमतरता नाही. जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे आंचल व तिचा भाऊ हिमांशू हे युरोपियन देशांमध्येच सराव करतात. हिमांशू याने सोची येथे २०१४ मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये शिवा केशवन या ज्येष्ठ खेळाडूसमवेत भाग घेतला होता. आंचल हिला या दोघांकडूनच स्कीईंगची प्रेरणा मिळाली आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून ती युरोपातच प्रशिक्षण घेत आहे. भारतात गुलमर्ग व औली येथे जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. या स्पर्धांपुरत्याच तेथे तात्पुरत्या सुविधा निर्माण केल्या जातात. अशा सुविधा कायमस्वरूपी तेथे ठेवल्या तर आंचल, हिमांशू, शिवा यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कीईंगपटू भारतात घडू शकतील. आंचलला आता हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यासाठी ती सराव करत आहे पण आता तरी भारतात स्कीईंगसाठी सोयीसुविधा व्हाव्यात, एवढी एकच मागणी तिने शासनाकडे केली आहे.
 
 
- तन्मय टिल्लू