गुणात्मक कार्य महत्त्वाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
आपल्याकडे प्रथम क्रमांकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच आकड्यांनाही तितकेच महत्त्व आहे. म्हणून नेत्यांकडून प्रगतीचा लेखाजोखा मांडताना आकडेवारीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात होत असतो. साधारणतः ‘गुणात्मक विरुद्ध संख्यात्मक’ असे द्वंद्व आपल्याला नेहमी पाहायला मिळते.
 
आताही स्वच्छता सर्वेक्षणात आपल्याला जास्त गुणांकन मिळवण्यासाठी व स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी राज्यातल्या महानगरपालिकांची चढाओढ दिसत आहे. स्वच्छतेचे अॅप डाऊनलोड करून नागरिकांनी आपल्या तक्रारी तिथे नोंदवाव्या व त्यावर तत्पर कारवाई होईल, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात येत आहे. प्रथम एखाद्या तक्रारीसाठी एका अॅपची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या फेसबुक आणि ट्विटर असताना अॅप निर्मितीची गरज नव्हती. आपल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरचा प्रभावी वापर आपल्या कार्यासाठी केला. या अॅपमध्ये ज्या ज्या सुविधा देण्यात आल्या आहेत, त्या फेसबुक आणि ट्विटरवर आहेत. फोटो टाकणे, लोकेशन शेअर करणे सारख्या मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव या दोन्ही समाजमाध्यमांमध्ये आहे. ‘डिजिटल डिव्हाईड’ जर शासकीय कर्मचार्‍यांमध्येच असेल, तर या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांचे प्रश्न कसे काय सुटतील? बर्‍याच वेळेला अॅपवर तक्रार करूनही साफसफाई झाली नसल्याची तक्रार अॅपच्या वापरकर्त्यांनी केली आहे.
 
अॅपसारखे साधन वापरण्यापेक्षा पालिकेने घंटागाडीच्या फेर्‍या वाढवाव्यात. बर्‍याच ठिकाणी कचरा न उचलल्याने कचरा वाढत जातो. ओला-सुका कचरा वेगळा ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून केले जाते, पण घंटागाडीत सर्व कचरा एकत्रच केला जातो मग कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात काय हासील ? साधारणतः आकडेवारी आणि सत्य परिस्थितीत बर्‍याच वेळेला तफावत आढळते. सरकारदरबारी स्वच्छतेत पालिकेचा प्रथम क्रमांक आलाही असेल, पण काही ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. याचे कारण आपण गुणात्मक कार्यापेक्षा संख्यात्मक कार्याला अधिक महत्त्व देतो. आकडेवारी ऐकून आपला अहं सुखावतो. आकडेवारी चांगली नसली तरी समाधानकारक असल्याचे आपणच आपल्याला समजावतो, जे अत्यंत चुकीचे आहे. ’स्वच्छता असे जिथे जिथे, लक्ष्मी वसे तिथे तिथे,’ असे म्हटले जाते. त्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने योग्य कार्य केले पाहिजे. अॅप हे फक्त साधन आहे, साध्य नव्हे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष झाले तर संख्यात्मकदृष्ट्या आपण पुढे जाऊ पण मूळ हेतू बाजूला राहून गुणात्मकदृष्ट्या मागे राहू.
 
 
- तुषार ओव्हाळ
 
@@AUTHORINFO_V1@@