घुबडाचे एक वेगळेच विश्‍व
 महा एमटीबी  02-Jan-2018
 

 
नो उल्लू बनाईंग....असे एका मोबाईल सेवा कंपनीच्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे. जी जाहिरात खूप प्रसिद्ध पण झाली. उल्लू अर्थात मूर्ख बनविणे. पाश्‍चिमात्य मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीला मूर्ख बनवणे म्हणजे उल्लू (घुबड) बनवणे होय. याचा अर्थ असा की मूर्ख व्यक्तीला घुबड समजले जाते, परंतु ही धारणा चुकीची आहे. घुबड हा सर्वांत बुद्धिमान निशाचर आहे. पण घुबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच असते. मात्र, घुबड प्रजातीदेखील लुप्त होत चालली आहे.
 
घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धन - संपत्तीचे प्रतिक मानले जाते. खरे तर बहुतेक लोक याला घाबरतात. या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते. मात्र तसे काही नसते. शिवाय ते लक्ष्मी देवीचे वाहन आहे मग ते अशुभ कसे असतील. घुबडाचे महत्त्वाचे रहस्य म्हणजे जेव्हा सर्व जग झोपते तेव्हा हा जागा असतो. त्याला आपली मान १७० अंश फिरवता येते. रात्री उडताना याच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही आणि त्याच्या पापण्या कधीही मिटत नाहीत.
 
घुबडे बहुधा एकाकी आणि निशाचर असतात. घुबडाच्या जवळजवळ २०० प्रजाती आहेत. घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातींनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे. अंटार्क्टिका, बहुतांश ग्रीनलँड आणि काही दूरस्थ बेटे वगळता घुबडे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात.
 
घुबड एक असा पक्षी आहे जो शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरू शकतो. तो असताना शेतात उंदीर, साप, विंचू येऊ शकत नाहीत. त्याशिवाय लहान मोठ्या किड्यांना खाणारा हा पक्षी आहे. भारतात जवळ जवळ ६० प्रजाती आणि उप-प्रजातींचे घुबड आढळतात.
 
घुबडांच्या जगभरात जवळपास २०० जाती आहेत. सर्वांत छोटे घुबड एल्फ आऊल आहे. ज्याची उंची ५ ते ६ इंच असते आणि सर्वांत उंच घुबड ग्रेट ग्रे आऊल आहे. ज्याची उंची ३२ इंचपर्यंत असू शकते. घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना गोल नसून ट्यूबसारखी असते. ज्यामुळे ते एखाद्या दुर्बिणीप्रमाणे दूरपर्यंत बघू शकतात. घुबडाला तीन पापण्या असतात त्यातील एक झोपण्यासाठी आणि एक डोळ्याला साफ ठेवण्यासाठी असते. मोठ्या डोळ्यांमुळे ते रात्रीसुद्धा स्पष्ट बघू शकतात परंतु जवळचे मात्र त्यांना धूसर दिसते. घुबड डोळे हलवू शकत नाहीत म्हणून आजूबाजूला बघण्याकरिता पूर्ण डोके हलवितात. घुबडाच्या मानेत चौदा मणके असतात. ज्यामुळे घुबड त्याची मान २७० अंशामध्ये फिरवू शकतो.
 
घुबडांची ऐकण्याची क्षमता देखील अतिशय उत्तम असते. काही घुबडांचे कान असमान असतात आणि डोक्यावर वेगवेगळ्या अंतरावर असतात ज्यामुळे ध्वनीलहरींमधील थोडासा फरकसुद्धा त्यांना सावजाचे अचूक ठिकाण ओळखण्यास मदत करतो. घुबडाच्या चेहर्‍याभोवती असलेली पिसेसुद्धा घुबडाला ध्वनीलहरींना दहापट मोठे करून कानापर्यंत पोहचवतात. घुबडाच्या पंखावरील पिसांची रचना अशी असते की उडताना त्याच्या पंखांचा अजिबात आवाज होत नाही.
 
काही घुबड त्यांच्यापेक्षा छोट्या जातीच्या घुबडांची शिकार करतात. बार्न आऊल त्याची शिकार अख्खी गिळतो आणि वर्षभरात सुमारे १००० उंदीर खातो. उंदीर हे घुबडांचे आवडते खाद्य असल्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा मित्र ही समजले जाते.
 
घुबडाचा चेहरा गोल, चपटा असतो आणि त्याची चोच लहान असली तरी खूप शक्तिशाली असते. तसेच घुबड सर्वांत आधी मोठ्या आणि शक्तिशाली पिल्लाला अन्न पुरवतो आणि लहान व कमजोर पिल्लांना शेवटी. पिल्ले मोठी झाल्यावर उडून जवळपासच्या झाडावर राहायला जातात तिथेही काहीवेळा पालक अन्न पुरवतात. दिवसा घुबड आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे स्वतःला बदलतात आणि आराम करतात. घुबड स्वतःच्या रक्षणासाठी खूप भयावह आवाज काढू शकतात. घुबडाच्या पायाला पुढे दोन व मागे दोन धारधार नख्या असतात. ज्यामुळे त्यांना शिकार जखडून ठेवण्यास मदत होते. मादी घुबड नरापेक्षा मोठी असते आणि जास्त आक्रमक असते. तसेच मादी ही नरापेक्षा जास्त आकर्षक रंगाची असते व तिचा आवाजही नर घुबडापेक्षा मोठा असतो आणि एक मैलापर्यंत ऐकता येऊ शकतो.
 
 

 
 
काही परिचित घुबडांपैकी-
 
गव्हाणी घुबड - गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. गव्हाणी घुबड पक्षी हा साधारण ३६ सें. मी. आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. याचे डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहऱ्याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. या पक्ष्यांचा वीणीचा निश्‍चित काळ नाही. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना असते. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची, गोलसर ४ ते ७ अंडी देते. त्यांचे उंदीर, घुशी, सरडे, पाली हे मुख्य खाद्य आहे.
 
पिंगळा घुबड - पिंगळा हा भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे. पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्ष्याएवढा (२१ सें. मी.) असतो. याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. या ठिपक्यांवरूनच याला ठिपकेवाले घुबड असेही म्हणतात. याचे डोके गोल-वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढऱ्या रेषा असतात. याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर डोळे पिवळे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. सर्व घुबडांप्रमाणेच पिंगळासुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतानाही तो क्षणात त्याच्यामागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो. याच्या रंग आणि आकारावरून किमान तीन उपजाती आहेत. पिंगळा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च-एप्रिल हा काळ पिंगळा पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडे-कपारीत, छताजवळ मिळेल त्या साधनांनी बनविलेले असते. किंवा त्याचे वास्तव्य दुसर्‍या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या तयार घरट्यात असते. मादी एकावेळी ३ ते ४ पांढुरक्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात. पिंगळा हा निशाचर पक्षी असल्याने तो रात्रीच्या वेळी बेडूक, लहान पक्षी, पाली, उंदीर आणि लहान प्राण्यांची छोटी पिले यांची शिकार करतो.
 
रानपिंगळा - रानपिंगळा हा पक्षी महाराष्ट्र राज्यात व बाजूच्या मध्य प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे. पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २०० ते ३०० एवढ्याच संख्येने आढळला.
 
हुमा घुबड - हुमा घुबड हे साधारण ५८ सें. मी. (२३ इं.) उंचीचे, पिसांची शिंगे असलेले मोठे घुबड आहे. याचा मुख्य रंग धुरकट-राखाडी असून याचे डोळे मोठे, पिवळ्या रंगाचे असतात. हुमा घुबड बसल्यावर याच्या डोक्यावरील पिसे शिंगासारखी वर, एकमेकांजवळ येतात. भारतात सर्वत्र आढळणारा हा पक्षी विशेषतः पठारी भागात, माणसाच्या वस्तीजवळ, पाण्याजवळ, जुन्या चिंच वृक्षांवर, आमरायात वगैरे राहणे पसंत करतो. हुमा घुबडाची एकदा जोडी जमली की कित्येक वर्षे एकाच ठिकाणी राहते. भारताशिवाय बांगलादेश, चीन, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड या देशातही आढळून येतो. नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ हुमा घुबडाचा वीणीचा काळ असून मादी एकावेळी २ ते ३ पांढऱ्या रंगाची अंडी देते. सहसा पाण्याजवळच्या उंच झाडावर, काटक्यांच्या मदतीने हुमा घुबड आपले घरटे बांधतात. लहान सस्तन प्राणी, पक्षी, पाली, सरडे, मोठे कीटक हे हुमा घुबडाचे प्रमुख अन्न आहे.
 
 
 - पूजा सराफ