गरिबांचा वैद्य
 महा एमटीबी  02-Jan-2018
 

 
 
 
’’उमा, जरा इकडे ये. तुम्हा सर्वांसाठी पाऊस सुरू होण्यापूर्वी मी स्त्रियांना रेनकोट व पुरुष कामगारांना छत्र्या देण्यासाठी आणल्या आहेत. त्या दे.’’ वैद्य खडीवाले त्यांच्याच औषध कारखान्यात काम करणार्‍या उमाला सांगत होते.
 
 
खडीवाले वैद्य माझे स्नेही होते. आम्ही दोघे बरोबरच भारतीय विमानदलात भरती झालो होतो. ट्रेनिंगचा कालखंड संपल्यानंतर आमची वेगवेगळ्या केंद्रांवर बदली झाली. पुन्हा मी निवृत्त होताना कानपूरला बरोबर होतो. माझा नऊ वर्षांचा रेग्युलर बाँड संपल्यानंतर मी मुंबईला जाणार होतो. त्याची १५ वर्षांची नोकरी होती. त्यानंतर त्याला पेन्शन वेतन मिळणार होते. वयाच्या ३६व्या वर्षी तो भारतीय विमानदलातून निवृत्त झाला. त्या वयात आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार त्याने अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तो ‘आयुर्वेद प्रवीण’ झाला. ती पदवी (डीएससी) पूर्ण झाल्यानंतर त्याने ‘हरी परशुराम औषधालय’ हे आयुर्वेद औषधविक्रीचे दुकान शनिवार पेठ (पुणे) येथे सुरू केले.
 
त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी सर्व आन्हिके आटोपून ७.१५ ला ते कारखान्यात यायचे ते सर्व कामगारांच्या अगोदर. कामगार उशिरा आलेले त्यांना चालायचे नाही. वेळेला व वक्तशीरपणाला ते महत्त्व देत. सुरुवातीला रागावून झाल्यावर कामाला सुरुवात करायची. मध्यंतरी कॉफी दिली जायची व बरोबर १ वाजता सर्व ४० कामगारांना गरमागरम जेवण दिले जायचे. तेही फ्रीमध्ये! जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती व लगेच काम सुरू!!
 
सर्व कामगार टाळाटाळ न करता भरपूर काम करायचे. कधी दूरगावाहून आलेला एखादा पेशंट जेवायला असायचा. त्यांना स्वतःला क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायला आवडत असे. त्यामुळे मॅच चालू असेल तर कॉमेंट्री चालू असे.
 
पत्नीचे नाव लक्ष्मी. नावाप्रमाणेच ती लक्ष्मीसारखी दिसायची. पुत्र विनायक. तोही आयुर्वेदाचा वैद्य. दुसरा निखिल. मुलगी अंजली. शनिवार पेठेतील औषधविक्रीचे दुकान व दवाखाना हे सांभाळत होते व औषध निर्मितीचा कारखाना प. य. वैद्य सांभाळीत होते. आयुर्वेदावर त्यांनी जवळजवळ १५० पुस्तके लिहिली आहेत.
 
संकटे व अपमृत्यू हे कोणालाही चुकले नाहीत. त्यांच्या दोन मुलींचे मृत्यू त्यांनी पाहिले. खचून गेले होते, पण आपल्यावर अवलंबून असणार्‍या ४० कामगारांचा संसार त्यांच्या डोळ्यांपुढे आला. त्यांनी स्वतःला सावरले. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे, उमा (कामगार स्त्री) तिला काय किंवा इतर स्त्रियांना ते आपली मुलगीच मानीत. त्यामुळे प्रसंगी रागावणे, पुन्हा प्रेमकरणे हे नित्याचेच झाले होते. कोणाच्याही घरी कार्य असले तर ते योग्य तो आहेर घेऊन जात.
 
थोर विचारवंत कै. नानाजी देशमुखांच्या आग्रहावरून बीड जिल्ह्यात त्यांनी आयुर्वेद चिकित्सा शिबीर घेतले. अशा जवळजवळ १०० शिबिरांचे आयोजन त्यांनी केले होते. च्यवनप्राश घरच्या घरी बनविण्याचे शिक्षणही त्यांनी शिबिरार्थींना दिले. नेत्रदानाच्या प्रचारासाठी त्यांनी पदयात्राही केल्या आहेत. स्वतः त्यांनी नेत्रदान केले होते. १९९१ साली आकुर्डी येथे निराधार अनाथ मुलांसाठी आधारकेंद्राची स्थापना केली होती.
 
ठाणे जिल्ह्यात देवबांध येथे श्रीराम मंदिराची स्थापना केली. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयुर्वेद वनस्पतींचे जतन व संवर्धन हा विषय चर्चिला जायचा. विश्ववैद्य संमेलनात आयुर्वेद विषयाचे संशोधन यासाठी एक व्यासपीठ उभारावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
स्वधनं निधनं श्रेयः |
परधर्मो भयावयः ।।
 
 
या न्यायाने हिंदू धर्मावर त्यांचे खूप प्रेम होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सकाळच्या शाखेत त्यांची हजेरी असायची. एक महिन्यापूर्वी घरात ते पाय घसरून पडतात काय व त्याची पुढे गुंतागुंत होते काय आणि गुरुवारी दुपारी टीव्ही वाहिन्यांवर ८५ वर्षे वयाचा हा हाडाचा सह्याद्री परलोकवासी झाला, ही बातमी येते काय? सारेच अघटित! अशावेळी ‘नियती’ नावाची कोणती तरी अज्ञात शक्ती माझ्या मित्राला, जो एरवी सहज शंभरी पार करू शकला असता, त्याला कसे काय हिरावून नेते, हे समजेनासे होते.
 
माझ्या या मित्राने सैन्यदलातील पेन्शनचा स्वीकार केला नव्हता. ‘‘देश माझा आहे. माझी एरवी प्राप्ती पुरेशी आहे. तेव्हा मला पेन्शन नको,’’ असे त्यांनी एअरफोर्सच्या पेन्शन खात्याला कळवले होते. केवढा हा विचार !
 
२०११ साली माझ्या पत्नीच्या निधनानंतर मी पुणे सोडले. तेथे असताना त्यांची बर्‍याच वेळा गाठ पडायची. मी मुद्दाम भेटायला जायचो. आता मुंबईला आल्यानंतर भेट होत नसे आणि आता भेटला तो दूरदर्शनच्या माध्यमातून धावणार्‍या अक्षरांच्या ओळीतून आणि आम्हाला तू मागे ठेवलेल्या पहिला राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार, आयुर्वेदभूषण पुरस्कार, गेल्याच महिन्यात शनिवारवाड्यावर झालेला जीवनगौरव पुरस्कार आणि अनेक आठवणी.
 
 
- रामचंद्र कुलकर्णी