लोकांच्या मनात सरकारविषयी खदखद : अजितदादा
 महा एमटीबी  19-Jan-2018

 
 
  
उदगीर : भाजप-सेनेच्या सरकारने मूठभर लोकांसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी म्हणतात की, कॅशलेस भारत करू. पण भाजीवाला, गिरणीवाला हे कॅशलेस व्यवहार कसा करणार? यावर भाजप-शिवसेनेचे लोक बोलायला तयार नाहीत. लोकांच्या मनात जी खदखद आहे, त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी आम्ही ‘हल्लाबोल’ आंदोलन केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. हल्लाबोल आंदोलनाच्या आजच्या चौथ्या दिवशी उदगीर येथे आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करत होते.
 
 
विचार करणाऱ्या लोकांना या देशात त्रास दिला जात आहे. त्यांना काय करावे, हे कळत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली आहे. हे असे वातावरण का तयार होत आहे? याच्या मागचा सूत्रधार कोण आहे? त्याचा सरकारने शोध घेतला पाहिजे असे पवार यावेळी म्हणाले. तसेच, या सरकारने राज्यावर भरमसाठ कर्ज करून ठेवले आहे. मराठवाड्यात रस्ते धड नाहीत. मग सरकारने या पैशाचे काय केले? सरकारची प्रत्येक योजना फसली आहे. मग यांनी योजनांची घोषणा का केली? याचे सरकारने उत्तर द्यावे, असा प्रश्न उपस्थित करत पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला.
 
 
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सभेत बोलताना म्हणाले की राजा उदार झाला आणि भोपळा मिळाला अशी मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची योजना आहे. या योजनेला कोणी नाव ठेऊ नये म्हणून योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. आम्हाला दीड लाखांची कर्जमाफी नको. आम्हाला संपूर्ण कर्जमाफी हवी आहे. संपूर्ण सातबारा कोरा पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदान फसवे आहे. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी, एसटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका संपावर गेल्या. आता या सरकारला संपावर पाठवण्याची वेळ आली आहे, असेही मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.