छंद माझा वेगळा...
 महा एमटीबी  19-Jan-2018जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही छंद असतात. ते असे छंद असतात, ज्यातून त्या व्यक्तीला मनापासून आनंद मिळतो. तो छंद किती मोठा किंवा किती लहान, यापेक्षा तो आपण किती मनापासून पूर्ण केलाय ते महत्त्वाचे असते. पण, कधी कधी त्या छंदांसाठी आवश्यक असलेले साहित्य आपल्याला मिळतेच असे नाही आणि मग आपली निराशा होते. अशावेळी लोकांच्या उपयोगी पडण्याचे काम करते ती म्हणजे ’हॉबीगिरी डॉट कॉम’ ही वेबसाईट. वसईला राहणार्‍या विनय निहलानी या युवकाने ही ई-कॉमर्स वेबसाईट चालू केली आहे. त्यावर अगदी सायकलिंगपासून ते अगदी गिर्यारोहणापर्यंतच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात.

विनय निहलानी हा मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. त्याने मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. त्यानंतर त्याने काही कंपन्यांमध्ये कामदेखील केले. मात्र, तिथे त्याचे मन रमेना. शिवाय घरचे वातावरणही नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे जास्त कल देणारे. त्यामुळे विनयनेदेखील स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच त्याला ङ्गोटोग्राङ्गीचा छंद आहेच. शाळेत असल्यापासूनच त्याला फोटोग्राफी वेड होते. त्यासाठी त्याने जुजबी प्रशिक्षणही घेतले. जिथे फोटोग्राफी हा फक्त छंद म्हणून सुरू होता, तिथे त्या छंदाचा उपयोग व्यवसायासाठी देखील करता येईल, असे त्याने ठरवले. मात्र, या व्यवसायात खूप स्पर्धा होती. फोटोग्राफी करताना विनयच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, फोटोग्राफी साहित्य विकायची आणि त्यासाठी ते साहित्य विकत घेणारे ग्राहक आणि साहित्य विकणारे व्यापारी यांना त्यानिमित्ताने त्याने एका व्यासपीठावर आणण्याचे ठरवले आणि तिथून सुरू झाली पहिली वेबसाईट 'फोटोगिरी डॉट कॉम.’ या वेबसाईटवर त्याने फोटोग्राफीला लागणारे सर्व साहित्य ई-कॉमर्सच्या माध्यमातून विकायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्याच्या या वेबसाईटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अगदी दीड महिन्यात त्याने फोटोग्राफी साठी लागणारे हजारो रुपयांचे साहित्य विकले. या वेबसाईटबद्दल सांगताना विनय सांगतो की, ’’फोटोगिरी डॉट कॉम"ला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. मग इतर छंदासाठी काही करता येईल का? अशी विचारणा व्हायला लागली. त्यातून मग ‘हॉबीगिरी डॉट कॉम’ सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मी कोणत्या-कोणत्या गोष्टी वेबसाईटवर विकणार आहे, त्याची यादी बनवली. त्या यादीत आधी फक्त दहाच छंद होते, मग हळूहळू ५०-६० ची यादी तयार झाली.’’
 
 
 


या वेबसाईट अगदी फोटोग्राफी , फुटबॉल, क्राफ्टिंग, क्रिकेट ते नृत्य व इतर सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. तसेच एकाच वस्तूसाठी वेगवेगळे पर्याय ही तिथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे आपल्या बजेटला अनुसरून आपल्या छंदासाठी निगडित साहित्य आपल्याला इथे मिळते. ’’हॉबीगिरी डॉट कॉममध्ये सर्वांच्या छंदासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी विकायला ठेवल्या आहेत. ग्राहक आणि व्यापार्‍यांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवतो. त्यामुळे ग्राहकाला नेमकं काय हवंय ते व्यापार्‍याला नेमकं समजतं आणि ग्राहकाला त्याच्या मनाप्रमाणे साहित्य मिळतं.’’ तसेच वेबसाईटला ‘बेस्ट फाईव्ह डिल’ही उपलब्ध आहे. त्यामध्ये इतर वेबसाईटच्या तुलनेने गोष्टी स्वस्तात मिळतात. अगदी डिझायनर टीशर्टपासून ते किचैन आणि ओपनरपर्यंत सर्व काही या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय आता परदेशी कंपन्यांचे साहित्यही विकले जाते. त्यांचे फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवरून प्रमोशनदेखील केले जाते. त्यामुळे खासकरून विविध छंद जोपासणारे अनेक जण वेबसाईटला भेट देतात. आपल्या आवडत्या गोष्टी खरेदी करतात. आता ‘हॉबीगिरी डॉट कॉम’ला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच ‘हॉबीगिरी’चे ऍप तयार करण्याचे कामसुरू आहे. विनय आणि त्याचा एक मित्र हे वेबसाईटचे कामपाहतात. या ऍपच्या माध्यमातून आता अशाच विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस या ‘हॉबीगिरी डॉट कॉम’वर उत्पादनांची संख्या वाढतेय. त्यामुळे ही वेबसाईट म्हणजे छंद जोपासणार्‍यांसाठी पर्वणीच ठरली आहे.
 

- पूजा सराफ