कलामांच्या आदर्शांचा पाईक...
 महा एमटीबी  17-Jan-2018
 
 
 
 
प्रत्येकजण आयुष्यात काही ना काही बनविण्याचे स्वप्न अंगी बाळगतो. त्याचप्रमाणे पन्नाशीच्या पुढे वय असूनही संशोधक होण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द सज्जाद अहमद यांच्यात दिसून येते. कर्नाटकमधल्या कोलारमध्ये जन्मलेले अहमद हे बारावीपर्यंत येऊन शिक्षण सोडणारे एक ड्रॉपआऊट विद्यार्थी होते. त्यांचे वडील कोलारमध्ये एका वाहतूक कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. त्यानंतर ते बंगळुरुला स्थायिक झाले.
 
अहमद यांनी इलेक्ट्रिक वस्तू दुरूस्त करण्याचे दुकान थाटले. त्यात ते टीव्ही, रेडिओ, टेपरेकॉर्डर इ. गोष्टी दुरुस्त करत असत. हळूहळू त्यांनी त्यांचा उद्योग वाढवला. अहमद संगणकाची दुरुस्तीही करू लागले. अहमद यांचे समाजासाठी काहीतरी करण्याचे लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोठ्या संशोधनाचा विचार केला. सज्जाद अहमद यांच्याबद्दल विशेष गोष्ट म्हणजे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे त्यांचे आदर्श आहेत. अहमद यांना शाळेत असल्यापासूनच संशोधक बनविण्याची इच्छा होती. त्याबद्दल सांगताना अहमद यांनी सांगितले की, ’’शाळेतल्या पुस्तकांमध्ये वैज्ञानिकांची चित्रे पाहूनच मला वैज्ञानिक होण्याची इच्छा होती. पण, परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मला १५ व्या वर्षीच शाळा सोडावी लागली.’’ घरच्या आर्थिक बिकट परिस्थितीतही त्यांनी संशोधन करण्याची इच्छा जागृत ठेवली आणि २००२ मध्ये त्यांना संधी मिळाली. अहमद यांनी दोन चाकी वाहनामध्ये अशा प्रकारचे बदल केले की, ज्यामुळे हे वाहन विजेवर चालू शकेल. त्यानंतर त्यांनी याच मॉडेलची तीन चाकी आणि चार चाकी वाहने बनवली. अहमद यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये पाच तावदाने आहेत. या प्रत्येक तावदानाची क्षमता १०० व्हॅट आहे. वेगवेगळ्या उपकरणांनी ही कार बनली आहे. यामध्ये तावदानामुळे निर्माण झालेली ऊर्जा सहा बॅटरीच्या माध्यमातून मोटार चालवते. कारमध्ये लावण्यात आलेल्या प्रत्येक बॅटरीची क्षमता १२ व्होल्ट आणि १०० एम्पियर आहे.
 
देशात पहिल्यांदाच भरलेल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ) मध्ये येण्यासाठी तीन हजार किलोमीटरचे अंतर अहमद यांनी याच सोलार कारमधून पूर्ण केले होते. हा प्रवास अवघड होता. ज्यामध्ये त्यांनी विंध्य पर्वताचा टप्पा पार केला. बंगळुरू ते दिल्ली हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना ३० दिवस लागले. अहमद यांना या सोलार कारने तीन हजार किमीचे अंतर पार केले याचा खूप अभिमान वाटत होता. अहमद यांनी सांगितले की, ’’यात्रेच्या वेळेस बरेच असे प्रसंग आले, जिथे मला ही कार नाही चालू शकणार, असे वाटत होते. मात्र, कारने हा खडतर रस्ता पार केला.’’ तसेच या यात्रेच्या दरम्यान त्यांना कोणताही अडथळा किंवा थांब्याचा त्रास सहन करावा लागला नाही.
 
डॉ. कलाम यांच्या सन्मानार्थ कर्नाटक सरकारने २००६ मध्ये भरवलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या कार्यक्रमात अहमद यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आतापर्यंत अहमद यांनी देशभरातल्या वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. त्यासाठी त्यांनी जवळजवळ एक लाख दहा हजार किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी भविष्यातही असाच प्रवास करायचा अहमद यांचा मानस आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना त्यांचा चुलतभाऊ सलीम पाशा याची मदत लाभली. डॉ. कलाम यांनी ’व्हिजन २०२०’ मध्ये देशाचे कल्याण करण्याचे ध्येय व्यक्त केले होते. तेच पूर्ण करण्यासाठी अहमद हा प्रवास करत असल्याचे सांगतात. त्याचबरोबर लोकांना नवीन संकल्पना, तसेच संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करण्याचा अहमद यांचा संकल्प आहे. त्यांनी विज्ञानाच्या कक्षा रूंदावण्याचा घेतलेला वसा पूर्ण होवो त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा!
 
 
- पूजा सराफ