निर्मल वारी : एक अनुभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

महाराष्ट्रात दरवर्षी नित्यनेमाने विविध यात्रा भरत असतात. या यात्रांना हजारो भाविक उपस्थित राहतात. त्यांचा भक्तिभाव बावनकशी असतो. मात्र, मोठ्या संख्येने लोक येत असल्याने यात्रा स्थळ आणि यात्रामार्गावर अनेक समस्या उद्भवू शकतात. अस्वच्छता ही त्यातील मोठी समस्या. निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा भरते, त्या त्र्यंबकेश्वर आणि परिसरात वनवासी कल्याण आश्रमातर्फे प्रथमच निर्मल वारी उपक्रम राबविला. अनेक अर्थांनी हा उपक्रम यशस्वी ठरला. निर्मल वारी उपक्रमाअंतर्गत मोफत शौचालय पुरवणे व कचरा व्यवस्थापन करणे असा हा उपक्रम शासनातर्फे १२०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था नऊ ठिकाणी करण्यात आली होती, जेथे दिंड्या वास्तव्यास असतात. वनवासी कल्याण अंतर्गत तीन हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक या वारीत प्रबोधन कार्यासाठी सहभागी झाले होते. विविध सामाजिक, राजकीय, कला क्षेत्रातील मान्यवरांनी यंदाची वारी निर्मल वारी व्हावी यासाठी आवाहन केले. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचा समावेश होता. मराठी कलाकारांचादेखील यात सहभाग होता.
 
साधारणपणे एप्रिल २०१७ ला निर्मल वारीची माहिती संजय तुकाराम कुलकर्णी व नाशिकमधील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भरत केळकर यांच्याकडून मिळाली. स्वच्छतेचा, मलनिस्सारणाचा व काही ठराविक काळासाठी हा प्रोजेक्ट असल्यामुळे, सहजच यात सहभागी व्हायचे ठरवले. यासाठी नियमितपणे बैठकी व्हायला लागल्या. विविध क्षेत्रातील नवनवीन लोकांशी गाठीभेटी घडू लागल्या. सारं नवीन असल्यामुळं कशाचाही कशाशीही संबंध लागत नव्हता. शेवटी मे महिन्यात एक नवीन गोष्ट ठरली. ही निर्मल वारी जेथून सुरू झाली होती, त्या पुण्याच्या सेवा सहयोग या संस्थेच्या लोकांशी संपर्क झाला. त्यानुसार आमचा कार्यकर्त्यांचा ४० जणांचा समूह देहू-पंढरपूर या मार्गावरील यवत या ठिकाणी निर्मल वारी प्रत्यक्षात काय व कशी असते हे बघण्यासाठी गेला.
 
यवतला गेल्यावर मात्र प्रत्यक्ष वारी व त्याची संकल्पना अनुभवली व आपण नाशिकला श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्यावेळी निर्मल वारी करू शकू, असा विश्वास वाटला.
त्यानंतर नित्यनेमाने विविध बैठकींचा सपाटा लागला. विविध खाती झाली. खातेप्रमुख नेमले गेलेत. या सर्व काळात आणखी नवीन कार्यकर्ते जोडले गेले. त्र्यंबकेश्वरमध्ये दिंडी थांबण्याची सर्व ठिकाणे अभ्यासली गेली. तेथे अंदाजे किती वारकरी येतात, कोठून येतात, किती दिवस मुक्कामी असतात, स्वतःबरोबर त्यांची काय व्यवस्था असते, शौचालय व स्वच्छतेची काय काळजी घेतली जाते आदी विषयांवर अत्यंत सखोल अभ्यास व चर्चा झाल्यात. त्र्यंबकेश्वर नगरीच्या बर्‍याच नागरिकांकडून, पोलीस तसेच शासकीय यंत्रणेकडून, व्यावसायिकांकडून हा तपशील पुनश्च पडताळून घेतला गेला व याविषयीची अंतिम पत्रिका तयार झाली व त्या आधारे पुढील कामाचे नियोजन सुरू झाले.
 
जून ते नोव्हेंबर या महिन्यात ढोबळ नियोजन झाले. खरे सूक्ष्मनियोजन डिसेंबर महिन्यापासून सुरू झाले व त्या संदर्भात मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला शौचालयांचा शेवटचा आराखडा दिला गेला. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आदींबरोबर नित्यनेमाने सरकारकडून करण्यात येणार्‍या निधी, सोयी व सवलतींचा पाठपुरावा घेण्यात आला.
 
निर्मल वारीतील खातेप्रमुखांची अंतिम नेमणूक झाली. त्या खात्यांच्या कामाची विभागणी झाली. त्यासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली व निर्मल वारी ही संकल्पना सर्वांनी मिळून शेवटपर्यंत तडीस नेण्यासाठी चंग बांधला. शेवटी जानेवारी महिना आला व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. यासाठी लागणार्‍या खर्चासाठी समाजातील सर्व लोकांकडून हातभार लागण्यासाठी आर्थिक देणगीचे आवाहन केले गेले आणि त्याला विविध रूपाने देणग्या देऊन समाजाने या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. यात समाजाचा तन, मन व धनपूर्वक सहभाग वाखाणण्यालायकच होता.
 
दि. ८ व ९ जानेवारीला शौचालय बसविण्याचे काम सुरू झाले. तसेच मुख्य केंद्रीय कार्यालय, भोजनगृह, विश्रामगृह यासाठीचे मंडप घातले. १० जानेवारीला कार्यकर्त्यांचे आगमन सुरू झाले. सर्व कार्यकर्ते निर्मल वारी या प्रकल्पासाठी तयार व उत्तेजित झाले होते. विविध खात्यांनुसार नेमून दिलेली कामे करण्यास सुरुवात झाली. वारकरी त्र्यंबकेश्वर क्षेत्री पोहोचण्याची तारीख होती ११ जानेवारी. सर्वेक्षणानुसार १३ ठिकाणी एकंदरीत १२०० फिरत्या शौचालयांची मांडणी केली गेली. या ठिकाणाजवळ कार्यकर्त्यांसाठी विश्राम कक्ष (कापडी तंबू) उभारण्यात आले. त्र्यंबकेश्वरमध्ये शिरतानाच वार्‍यांच्या स्वागतावेळीच आरोग्याविषयी, स्वच्छतेविषयी व शौचालयांच्या वापराविषयी निर्मल वारीच्या कार्यकर्त्यांनी वारकर्‍यांना प्रबोधन करण्यास सुरुवात केली. आलेल्या प्रत्येक दिंडीला स्वच्छता, आरोग्य व शौचालयाचा वापर याचे महत्त्व कार्यकर्ते पटवून देत होते. माऊली शौचालयाचा वापर करा, स्वच्छता पाळा, कचरा कमी करा व तो इकडे तिकडे न टाकता कचराकुंडीतच टाका, असे विनम्र आवाहन सर्व कार्यकर्ते व इतरही करत होते. वारकर्‍यांनाही आपल्या आरोग्यासाठी कोणीतरी विचार करतो आहे व अशाप्रकारची सोय करत आहे, हे बघून खूप आनंद होत होता. ‘‘तुम्ही इतकी चांगली सोय केली आहे. आम्ही शौचालयाचा वापर करू व इतरांनाही तो करायला सांगू,’’ असे वारकरी बोलू लागले व प्रत्यक्षात इतरांनाही सांगू लागले.
 
या निर्मल वारीसाठी एकूण १,२४७ कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात तीन दिवस नावनोंदणी केली व सर्व जण स्वयंस्फूर्तीने कामास लागले. हरसूल, पेठ, सिन्नर, नाशिक इत्यादी ठिकाणांहून हे कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने आले. यात १० वर्षांपासून ते वयाच्या ७० वर्षांपर्यंत वयाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. १०-१२ तासांच्या कामाच्या वेळा त्यांना वाटून दिल्या होत्या. या वेळात त्यांनी वारकर्‍यांचे प्रबोधन करायचे, शौचालयाचा पुरेपूर वापर व्हावा व यासाठी त्यांची स्थिती उत्तम राहावी म्हणून शौचालयाच्या कंत्राटदाराकडून शौचालयांच्या स्वच्छतेचा पाठपुरावा करायचा, लोकांनी कचरा निर्धारित ठिकाणी टाकावा यासाठी आग्रह धरावा अशी कामे केलीत. अर्थातच, या सर्व कार्यकर्त्यांची नीट राहण्याची व्यवस्था व वेळेवर, उत्तमआणि पुरेसे खाण्याची व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा यात करण्यात आली होती. कार्यकर्त्यांची ने-आण, कार्यालयाचे रक्षण, त्यांचे मार्गदर्शन, महिलांसाठी निवासाची विशेष सोय आदी सर्व सेवांची सोय केली होती. वीज, पाणी, ध्वनिप्रक्षेपण, विश्रांती आदींसाठी लागणार्‍या सर्व व्यवस्था तिथे होत्या. वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, अग्निप्रतिबंधक यंत्रणा आदी अत्यावश्यक सेवा देखील उपलब्ध केल्या होत्या.
 
सरकारी अंदाजानुसार, किमान ५ लाख ते ६.५ लाख वारकरी यावर्षी आले होते. सर्वदूर चांगल्या प्रतिक्रिया दिसत होत्या. ‘‘या आधीच्या वर्षांपेक्षा यंदा स्वच्छता खूप चांगली आहे, शौचालयांची सोय उत्तमआहे, निर्मल वारीचे कार्यकर्ते छान प्रबोधन करताहेत,’’ अशा प्रतिक्रिया वारकर्‍यांमध्ये उमटल्या होत्या. दिंडीत स्वेच्छेने व अत्यंत आनंदाने कार्यकर्त्यांना प्रसाद देत होते व त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होते. बर्‍याच दिंड्यांना ‘‘तुम्ही पुढील वर्षी निर्मल वारीत काय सहभाग द्याल?’’ असा प्रश्न विचारला असता, ’’आम्ही पुढील वर्षी असे प्रबोधन करू, या कार्यकर्त्यांची भोजनाची व राहण्याची सोय आनंदाने करू,’’ असे आश्र्वासन दिले.
 
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही या स्तुत्य उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली. निर्मल वारीसाठी हवी ती मदत नित्यनेमाने करत राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनीही सर्वतोपरी मदतीचे आश्र्वासन दिले व बरीच मदतदेखील देऊ केली. अनेक मान्यवर यावेळी निर्मल वारीच्या कार्यालयात भेटी देऊन गेले. वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष जगदेवरावजी उराव, तसेच देहू-पंढरपूर मार्गावरील यवत या ठिकाणी भेटलेले देहू गावातील संत तुकारामांचे वंशज पू. शिवाजीराव मोरे महाराज (पश्र्चिम महाराष्ट्रासह संत संपर्कप्रमुख रा. स्व. संघ) हे आवर्जून यात आले होते व त्यांनीसुद्धा आपल्या नियोजनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
 
दि. १३ जानेवारीला वारकरी परत जायला निघाल्यानंतर, आपण वापरलेल्या सर्व जागांची स्वच्छता करून त्या सर्व जागा, जागामालकांना परत सोपवल्या. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या व नगरीतील लोकांनी रस्ते व बरीच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केलीत. या सर्व काळात बरेच नवनवीन कार्यकर्ते मिळाले, बर्‍याच कार्यकर्त्यांची क्षमता, नियोजन कौशल्य पुढे आले, तसेच कार्यकर्त्यांचे आपापसातील प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले.
 
आरोग्य व स्वच्छता यांचा संदेश व निर्मल वारीचे व्रत घेऊन सर्व वारकरी, कार्यकर्ते हळूहळू त्र्यंबकेश्वरमधून प्रस्थान करू लागले. डॉ. भरत केळकर व डॉ. मृणालिनी केळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह आणि वनवासी कल्याण आश्रमाचे क्षेत्रीय सह संघटनमंत्री संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, वारकर्‍यांमध्ये व सर्व कार्यकर्त्यांच्या सहवासात ही निर्मल वारी अत्यंत प्रेमाने, शांतीने व उत्साहात संपन्न झाली.
 
कुठल्याही चांगल्या कामाचे व्यवस्थित नियोजन झाले, त्याबद्दल पुरेशी जनजागृती झाली, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी त्यात सहभाग घेतला की, त्याबद्दल आत्मीयता जाणवू लागते, त्यावर श्रद्धा दृढ होते व आपसूकच समविचारी समाज जवळ येऊन छान विधायक कामे करू लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत व समर्थ भारत’ या एका नार्‍यामुळे समाजात होणारा हा स्वच्छतेबद्दलचा परिणाम हे याचे द्योतक आहे.
 
निर्मल वारी, स्वच्छ वारी, प्रांजळ वारी
 
स्वयंसेवकांचे मोफत प्रशिक्षण व विविध लोकेशन्सवर प्रबोधन या विषयासाठी रेणुका हॉल समोर कल्याण आश्रमाचे केंद्रीय कार्यालय उभे करण्यात आले. यावेळच्या वारीमधील वारकर्‍यांशी संपर्क साधण्याचा एक विशेष प्रयत्न झाला. शौचालय पुरवण्यामुळे एक विशेष समाधान त्यांनी व्यक्त केले. दिंडीत प्रामुख्याने शौचालयाचा अभाव या कारणाने लोक परत येण्यास नापसंती दर्शवत होते, जे यापुढे येण्यास आतुर असतील, हा त्यातील विशेष भाग दिंडीप्रमुखांनी प्रामुख्याने आपले मत ‘यंदाची वारी निर्मल वारी, स्वच्छ वारी, प्रांजळ वारी’ असे नोंदवले. रोज ८०० कार्यकर्ते सकाळ ते संध्याकाळ रोटेशनवर प्रबोधन करण्यासाठी केंद्रीय कार्यालयात हजेरी लावत होते. वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रीय प्रमुख जगदेवराव उराव यांची उपस्थिती होती. वनवासी कल्याण आश्रमाचे डॉ. भरत केळकर, संघ विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी व निर्मल वारीचे प्रचार प्रसिद्धीप्रमुख मीनल वाघ भोसले, भोजन व्यवस्थाप्रमुख सुजित जाजू सर व इस्कॉन, मृणालिनी केळकर, कार्यकर्ता, श्रीपाद दाबक, अनिरुद्ध कंठे, वैभव फेंडरे, लोकेशन टीम आर्चिस कुलकर्णी, सुनील सावंत, संजय पगारे, पूर्वा सावजी यांनी आपापल्या जबाबदार्‍या चोख सांभाळल्या. त्यामुळे निर्मल वारी नेहमीपेक्षा काही वेगळीच, उत्तमवारी ठरली.
- अभय फडके
@@AUTHORINFO_V1@@