नाना पालकर स्मृति समिती स्नेहमिलन
 महा एमटीबी  17-Jan-2018

नाना पालकर स्मृति समितीचे प्रेरणास्त्रोत नाना पालकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, तसेच संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे सर्व सभासद, देणगीदार आणि हितचिंतक यांचे स्नेहमिलन रविवार, दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत वसंतस्मृती, दादर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. डॉ. अशोकराव कुकडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विवेक घळसासी यांनी भूषविले. या अविस्मरणीय, हदयस्पर्शी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने...

 
’’पालकरांचं गीत आहे म्हणता, मी पालकरांना ओळखत नाही. हे गीत त्यांचं असू दे की नसू दे; माझ्यासाठी हे संघाचं गीत आहे बस्स..’’ तो स्वयंसेवक अगदी थेटपणे म्हणाला. त्याच्या पाठच्या कोंडाळ्यात पलीकडे दस्तुरखुद्द नाना उभे होते. त्यांनीही ते ऐकले. नाना त्याच्यासमोर आले आणि त्यांनी त्या स्वयंसेवकाचे चक्क पाय धरले आणि ते म्हणाले, ’’तू माझे डोळे उघडलेस. हे गीत संघाचेच आहे.’’ हे पाहून, हे ऐकून उपस्थित सगळे अवाक् झाले. ही घटना आजही आताही आठवते. केवढे मोठेपण? किती नम्रता आणि केवढी निष्ठा... हे सांगताना डॉ. अशोकराव कुकडेंचा स्वर दाटून आला. आवाजात हृदयाची संवेदना आर्तपणे प्रगट होत होती. कुकडेकाकाच नव्हेत, तर उपस्थित सर्वच श्रोतृसमुदाय नानांच्या आठवणींनी भावविभोर झाला होता. प्रसंग होता नाना पालकर स्मृति समितीच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच भगिनींनी पारंपरिक पद्धतीने स्वागत करत तिळगुळ वाटले. व्यासपीठावर शिस्तीनुसार केवळ प्रमुख चारजण बसले होते. प्रमुख अतिथी डॉ. अशोक कुकडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार विवेक घळसासी, नाना पालकर स्मृति समितीचे डॉ. हर्षद पुंजानी आणि अविनाश खरे. नाना पालकर स्मृति समितीचे स्नेहमिलन, त्यातही नाना पालकरांच्या स्मृतींचे स्मरण होणार होते. त्यामुळे श्रोतृवर्गात ज्यांना पाहून आपोआप मनात ओळी स्मरतील - ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असे अनेक मान्यवर, कर्मवीर उपस्थित होते. एखाद्या देवळात जावे आणि भक्तीने, निष्ठेने शांत चित्ताने चिंतन करावे, अशा तन्मयतेने संपूर्ण श्रोतावर्ग बसला होता. औपचारिक- अनौपचारिकतेच्या सोपस्कारात फार वेळ न दवडता कार्यक्रमाला सुरुवात झाली.
 
’जो तो वंदन करी उगवत्या...’ ही जगाची रीतच आहे. नाना पालकर स्मृति समितीच्या स्नेहसंमेलनात या जगरहाटीला दूर सारले होते. आज नाना पालकर स्मृति समितीमध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती संमिल्लित आहेत. पण, या संमेलनाच्या निमित्ताने समितीने अशा व्यक्तींचा सन्मान केला, ज्यांनी नाना पालकर स्मृति समितीच्या निर्मितीसाठी, विकासासाठी ’समिधा समहमजले’ म्हणत आयुष्य वेचले. या सर्व मान्यवर विभूतींपैकी आठ विभूतींचे ऋणनिर्देश म्हणून या ज्येष्ठांचे मनोगत असलेल्या सीडीचे प्रकाशन झाले. ही प्रकाशित झालेली सीडी म्हणजे नाना पालकर स्मृति समितीच्या अमृतवृक्षाच्या कल्पबिजाचे स्मरण करणारी गाथाच आहे. नाना पालकर स्मृति समितीच्या आजच्या अमोघ कार्याची सुरुवात ज्या सेवाव्रताच्या संकल्पनेतून झाली त्याचा उलगडा करणारी ही सीडी. या सीडीमध्ये डॉ. कमलाकर कुलकर्णी, डॉ. हर्षद पुंजानी, कृष्णाजी छत्रे, बाळासाहेब गोडबोले, रत्नाकर भागवत, उमेश नेरूरकर, अरविंद मादुस्कर या ज्येष्ठांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेे. सीडी प्रकाशनानंतर पुंजानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी नाना पालकर स्मृति समितीच्या एकंदर वाटचालीचा यथायोग्य आढावा घेतला होता. ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार होता’ म्हणत ध्येयशील जीवन जगणारे नाना पालकर आणि नाना पालकर स्मृति समितीचे सर्वच आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते. या सर्वांना गुंफणारा अमृतधागा म्हणजे संघविचारधारा. या देश आणि समाजाला जोडणार्‍या विचारधारेनेच नाना पालकरजी काय किंवा स्मृति समितीचे कार्यकर्ते काय, हे सर्वच विलक्षण सेवाधर्माच्या जाज्ज्वल्य भावनेने प्रेरित झालेले. या सर्वांचे फलित म्हणजे नाना पालकर स्मृति समिती म्हणता येईल. संघविचारधारेतून प्रेरित झालेल्या शाश्वत मानवी मूल्यांचे ज्यांनी अखंड आयुष्यात भगिरथी व्रत अंगिकारले आहे, असे डॉ. अशोकराव कुकडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कुकडेकाका हे नाना पालकरांच्या पावन स्मृतिसहवासाच्या आठवणी सांगणार होते. कुकडेकाकांनी बोलायला सुरुवात केली आणि संपूर्ण श्रोतावर्ग स्थल-कालाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिव्यक्त केलेल्या स्मृतिरंजनात मग्न झाला. कुकडेकाकांनी सुरुवातीलाच आपल्या बालस्वयंसेवक जीवनाची आठवण सांगितली. बालस्वयंसेवक असताना शाखेमध्ये काकांनी गीत गायले होते. त्यावेळी तिथे नाना पालकरही उपस्थित होते. त्यांनी बालस्वयंसेवक अशोक कुकडे या बालकाला शाबासकी देत म्हटले ‘‘झ्याक..!!!’’ ही आठवण सांगताना काका मिस्किलपणे म्हणाले,’’आपल्या परिवारात गीत किंवा बौद्धिक झाल्यावर सर्वचजण एकमेकांना शाबासकी देतात. त्यामुळे खरोखरच हे गीत मी छान गायले होते का? पण, कालांतराने खूप पुढे कळले की, शाखेत मी म्हटलेले गीत नाना पालकरांनीच लिहिले होते.’’ पुढे बौद्धिक वर्गाची आठवण सांगताना कुकडेकाका म्हणाले, ’’नाना बौद्धिक घेत होते. स्वयंसेवकाने कसे असावे? असे सांगताना नानांनी समर्पक उदाहरण दिले. नाना म्हणाले, स्वयंसेवकाने हनुमानासारखे असावे. हनुमानाचे रूप दोन स्वरूपात विराट आहे. एक वीर हनुमान आणि दास हनुमान. सेवा करताना, समर्पित निष्ठा जगणारा प्रभू श्री रामचंद्रांचा दास हनुमान. या दास हनुमानाचे समर्पण अमूल्य आणि शब्दातीत. पण, त्याचवेळी प्रत्यक्ष लंकेत जाऊन रावणाचा गर्वहरण करणारा महाबाहुबली पराक्रमी वीर हनुमानच होता. स्वयंसेवकांनंी समाजाची, देशाची सेवा करताना दास हनुमानाचा आदर्श ठेवावा आणि समाजविघातक देशविघातक अन्यायी कृत्यांविरोधात वीर हनुमानाची भूमिका स्वीकारावी.’’ काका त्यांच्या लहानपणीची आठवण सांगत नानांचे बौद्धिक मांडत होते. पण असे वाटत होते की, प्रत्यक्ष नानांच्या ‘स्मृती’ वास्तवात प्रकट होऊन सर्वांना आपल्या सामर्थ्याची, नम्रतेच्या शक्तीची जाणीव करून देत आहेत. काका एकामोगामाग एक नानांच्या आठवणी उलगडत होते. पुढे कुकडेकाकांनी महाविद्यालयीन जीवनाच्या प्रवासात नाना पालकरांची बैठक मेडिकल कॉलेजातील निवासी डॉक्टरांसोबत लावली होती. ती आठवण सांगताना काकांच्या चेहर्‍यावर तेज साकारले. ते तेज कसले होते? तर ते पुढच्या सांगितलेल्या आठवणीत कळाले. काका म्हणाले, ’’नाना जेमतेमदहावी शिकलेले. त्यामुळे उच्चशिक्षित निवासी डॉक्टरांसोबत त्यांची चर्चा कशाप्रकारे होईल, असे वाटले. पण, डॉक्टरांसोबतची बैठक संपली. डॉक्टरांनी कुकडेकाकांना विचारले, ‘‘अरे या माणसाने किती विषयात पीएचडी केली आहे रे.. सगळ्याच विषयात यांना हाय लेव्हलचे ज्ञान आहे. कसे काय रे?’’ हे सांगून काका म्हणाले, ‘‘एक प्रचारक जे जीवन जगतो, त्या जगण्यातून त्याचे अनुभवविश्व, ज्ञानाच्या कक्षा या विलक्षण चेतनामय बनतात. नेमके हे सांगताना कुकडेकाकांच्या चेहर्‍यावर तेज पसरले होते. हे तेज संघस्वयंसेवकाच्या त्यागमय निष्ठेच्या जीवनाविषयी कृतज्ञता, आनंद, समाधान व्यक्त करणारे होतेे. यात शंकाच नाही.’’ कुकडेकाका आठवणी सांगताना म्हणाले की, ‘‘हे केवळ स्मृतिरंजन नाही, तर ही नाना पालकरांच्या स्मृतींतून समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असणार्‍या व्यक्तींनंी, संस्थांनी कसे असावे याचा एक पाठ आहे.’’ काका म्हणाले, ’’आज संक्रांत आहे, माझ्यासाठी ही संक्रांत अविस्मरणीय आहे. कारण, आज नानांच्या स्मृतींना उजाळा देऊन आपण सर्वजण एका सेवाभावी विश्वाच्या संक्रमणात प्रवेश करीत आहोत. समाजात वेदना आहे, तर त्या वेदनेला समजून घेणारी सहवेदना, संवेदना असणे गरजेचे आहे. ती सहवेदना नाना पालकर स्मृति समितीने जपली आहे.’’ टाळ्यांच्या कडकडाटात कुकडेकाकांनी आपले मनोगत थांबवले.
 
काकांच्या मार्गदर्शनानंतर विवेक घळसासींनी आपले मनोगत मांडायला सुरुवात केली. अर्थात जगभरात रामायण, महाभारताचे सुरेल व्याख्यान करणार्‍या विवेक घळसासींनी ज्यावेळी विषयाला सुरुवात केली, त्यावेळी त्यांचे गद्य भाषण असतानाही, त्यांचा आवाज आणि त्या आवाजाद्वारे व्यक्त होणारे शब्द म्हणजे पद्य स्वरांचे सुरेल चांदणेच आहे की काय, असा भास होत होता. अतिशय मधुर आवाजात आणि विद्वत्ताप्रचुर शब्दांत विवेकजींनी नाना पालकर स्मृति समिती, समितीचे निष्ठावान कार्यकर्ते ते रा. स्व. संघ म्हणजे काय? ते महाभारत, रामायण या सर्वांना आपल्या खास शैलीत गुंफत संपूर्ण सभागृहाला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनात मनाला भिडणारे खूप काही होते. त्यातले एक विवेकजी म्हणाले, ’’मला खूपजण विचारतात की, संघ म्हणजे काय? मी त्यांना चार शब्दांत संघ सांगतो. संघ म्हणजे संघटन, सामर्थ्य, सेवा आणि समर्पण. आता या चार ’स’ मध्ये आणखी एक ’स’ जोडला गेला ते म्हणजे संघ म्हणजे कुकडेकाकांनी व्यक्त केलेली ‘सहवेदना’ होय. सहवेदना वेदनेला वेद बनवते. अत्यंत कमी शब्दांत विवेकजींनी संघ परिवाराच्या समर्पित जीवनाला आणि नाना पालकर स्मृति समितीच्या ध्येयशील जीवनाचा पट उलगडला होता.’’
 
मध्यंतरानंतर पुढे एक आगळावेगळा संगीत कार्यक्रमझाला. या गीत कार्यक्रमात नाना पालकरांच्या गीतांचे सुश्राव्य गायन होते. नानांनी रचलेले- ‘उचलतो म्हणुनी बेलभंडार’, ‘ऐका हो तुटले परदास्याचे बंध’, ‘अमुचे जग गाईल जयगान’, ‘यशाने दुमदुमवू त्रिभुवने’, ‘संघ हीच जीवनगाथा’ ही गीते विश्वास दामले, योगेश देशमुख, प्राजक्ता दाते, मृणाल पत्की यांनी सादर केली. सर्वच गीते मनाला स्पर्श करणारी होती. याच कार्यक्रमात अरुण करमरकर यांनी ‘ध्येयवेड हे अंतरात’ गीत गायले. या गीताचे स्वर अजूनही कानात घुमताहेत. कारण, गीत सुरू असताना शेजारी बसलेल्या नाना पालकर स्मृति समितीच्या अलका सावरकर यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. काय झाले विचारल्यावर सद्गदित स्वरात त्या म्हणाल्या, ’’हे गीत ऐकून वाटले नाना पालकरांसारखे इतके ध्येयनिष्ठ समर्पित जगणे आपल्याला जमू शकेल का?’’ असो, विषयांतर झाले असे वाटत असेल. पण कार्यक्रमातली ही घटना सांगितली कारण की, अलकाताईंना जे वैैयक्तिकरित्या ओळखतात, त्यांना सांगायलाच नको की, अलकाताईंचा हा विनय होता. कारण, त्याही समर्पित, सेवाभावी जीवन जगत आहेत. पण, तरीही आपण समाजकल्याणासाठी समर्पित जगणे जगावे, असा त्यांचा ध्यास आहे. हा जो ध्यास आहे, हा नाना पालकर स्मृति समितीच्या वास्तूत, कणाकणात अगदी प्रत्येक कार्यकर्त्यात आहे आणि तो संपर्कातील सर्वांनीच अनुभवलेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश खरे यांनी आभार व्यक्त केले आणि या कार्यक्रमाची गोड सांगता झाली. स्मृति समितीचे मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेले हे स्नेहमिलन फक्त नाना पालकर स्मृति समितीच्या शुभचिंतक, कार्यकर्त्यांचे स्नेहमिलन नव्हते, तर विवेक घळसासींच्या शब्दांचा आश्रय घेत म्हणावेसे वाटते की, ‘‘हे स्नेहमिलन संघटन, सामर्थ्य, सेवा, समर्पण आणि सहवेदना अंतरात आणि प्रत्यक्ष जीवनातही जागृत असलेल्या सर्वांचेच स्नेहमिलन होते...’’
 
- योगिता साळवी