पालकमंत्र्यांनी पिळले अधिकाऱ्यांचे कान
 महा एमटीबी  16-Jan-2018


अकोला :
जनता दरबार हा सर्व सामन्य नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी भरवला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी आणि विभागप्रमुखांनी या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे असून अधिकाऱ्यांनी जनता दरबारास या पुढे दांडी मारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जनता दरबारामध्ये ते बोलत होते.

दर सोमवारी होणा-या जनता दरबाराला सामान्य नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून आजच्या (१५ जाने) जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १०४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु काही विभागांचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारी संबंधी आश्वस्त करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील जनता दरबारासाठी सर्व विभाग प्रमुखाने उपस्थित राहावे, असे आदेश त्यांनी दिले.

तसेच यापुढे व्यक्तीगत लाभाच्या योजनांसह सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच यावर्षीचा लक्षांक, केलेली पुर्तता यासंबंधीचे सर्व माहिती विभागप्रमुखांनी बैठकीला येतांना सोबत आणावी असेही ते म्हणाले. व यापुढे जनता दरबारापुर्वी एका खात्याचा आढावा घेण्यात येईल. पुढील जनता दरबारा पुर्वी जिल्हा परिषदेतील योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे तरी संबंधीत जिल्हा परिषदतील संबंधीत विभागाच्या विविध अधिका-यांनी आपल्या विभागाची परिपुर्ण माहिती बैठकीत येतांना सोबत आणावी. अत्यंत निकडीची परिस्थितीत जनता दरबारात उपस्थित राहण्यास अडचण असल्यासच वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच सुट्टी घ्यावी व आपल्या जागी आपला प्रतिनिधी पाठवावा, असेही ते यावेळी म्हणाले.