नवे संक्रमण
 महा एमटीबी  15-Jan-2018
 
 
 
 
मुंबई कल्याण परिसरात ७ नक्षली पकडले. ते नक्षली होते, त्यांचे धागेदोरे तेलंगणांच्या नक्षल्यांशी जुळत आहेत. तेलंगणाहून इथे मुंबईत नक्षली कारवाया करण्यास किंबहुना तशी सुरुवात करण्यास ते इथे आले होते का? नक्षलींना इथे मुंबईत थारा मिळण्याइतकी मुंबईमध्ये त्यांची वहिवाट स्थिरावली आहे का? मागील काही वर्षांपासूनची डाव्या विचारसरणीचे कारनामे पाहिले तर याला तरी उत्तर एकच आहे-होय. आता याला पुरावा काय म्हणत कित्येकांच्या भिवया वक्र होतील.
 
पण जरा कान आणि डोळे उघडे ठेवत समाजातल्या सर्वच स्तरातील घडामोडी पाहिल्या तर ते नक्कीच जाणवेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जिवीतपणी आणि पुढे आपल्या विचारसाहित्यातूनही काडीचीही किंमत डाव्या विचारसरणीला किंवा मार्क्सवाद्यांना दिली नव्हती. तरी हे डावे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतच राहतात मात्र विचार मांडतात माओचे, रक्तरंजित क्रांतीचे. त्याचे हे आंबेडकरांवरचे प्रेम म्हणजे पुतना मावशीची माया आहे. पण या पुतनेने समाजाच्या एका चळवळीत घुसण्याचा प्रयत्न केलेलाही दिसतो. असो ढाई अक्षर प्रेम का.. किंवा मोको कहा ढुंढे रे बंदे वगैरे दोह्यांतून शाश्‍वत मानवी मुल्य आणि प्रेरणेची शिकवण देणारे संत कबिरांचे दोहे हे सर्वांचे होते. पण कबिरांचे नाव घेऊन काही लोक कबिरांच्या दोह्यांमधून कबिरांनी मांडलेली समरता, न्यायाची भूमिका बाजूला काढून माओचे तत्वज्ञान लोकांमध्ये विषासारखे भिनवण्याचा प्रयत्न करतात.
 
देशातील थोरामोठ्यांचे विचार तोडून मोडून समाजात मांडण्याचे कुटिल कारस्थान ही मंडळी करतात. दुर्गम भागात राहणार्‍या भोळ्या भाबड्या अन्यायग्रस्त जनतेसाठी आम्ही हक्क मागतो. असे रॉबिनहूडच्या बापाच्या आवेशात ते सतत बोलतही असतात. पण हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. मुंबईमध्ये पकडले गेलेले हे नक्षली समाजात फुट पाडून देशाला खिळखिळे करून कोणत्या अंत्यज स्तरातील व्यक्तीला न्याय मिळवून देणार होते? याचे स्पष्टीकरण डाव्या विचारसरणीला प्रमाण मानून नक्षलींचे समर्थन करणारे तथाकथित विचारवंत देतील का? आज संक्रांतीला सर्वच जण एका नव्या संक्रमणात प्रवेश करत आहोत या निमित्ताने देशविघातक विचार मांडणार्‍यांना हद्दपार करून आजची संक्रात साजरी करू या.
 
-  योगिता साळवी