आज मकर संक्रांत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
आज मकर संक्रांत. या सणाबद्दल आपण सगळ्यांनीच खूप ऐकलं आहे. दरवर्षी हर्षोल्लासात आपण हा सण साजरा करतो. या सणानिमित्त तिळगुळ घ्या गोड गोड बोलाचे आपण कितीतरी मॅसेजेस सकाळपासून फॉर्व्ड केले असतील. तुमच्या माझ्या किती तरी काकू मावशी आत्यांना या दिनानिमित्त हळदी कुंकवाची आमंत्रणं आली असतील. कपाटात जपून ठेवलेल्या काळ्या जरीच्या साड्या बाहेर निघाल्या असतील. नवीन पतंगा घरी आल्या असतील. लग्नानंतर पहिल्यांदाच ज्यांची संक्रांत आहे त्यांचे हलव्याचे दागिने तयारही झाले असतील. आणि लहान बाळांच्या लुटीची, बोरनाहणाची तयारीही झाली असणार.
 
 
 
पण या सणानिमित्त हे सगळं आपण का करतो? या मागे काय कारण? यादिवशी काळेच कपडे का घालायचे, या दिनानिमित्त तिळगुळच का? असे कितीतरी साधे साधे प्रश्न आपल्या मनात उपस्थित होत असतील नाही. आज याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. आपपण सगळ्यांनाच लहान असताना आजीने अनेकदा सांगितलं असेल की दृष्ट लागू नये म्हणून काळे कपडे, आपल्या स्वकीयांशी संबंध चांगले रहावेत म्हणून गोड गोड वड्या अशी आपल्या कडे प्रथा आहे. पण या मागचं कारण म्हणजे हिवाळा. आपल्या संस्कृतीतील सगळ्याच सणांच्या मागे ऋतुचक्र असतं. संक्रांतीचा सण हिवाळ्यात येतो, याकाळात शरीरात ऊष्णता निर्माण व्हावी यासाठी तिळ आणि गुळाच्या वड्या, लाडू केले जातात. तसंच काळ्या रंगामागेही हेच कारण आहे, त्यामुळे दृष्ट न लागण्यासोबतच ऊष्मा आत्मसात करणारा काळा रंग घातला की ऊब निर्माण होते. म्हणूनच या काळात तिळ गुळ आणि काळ्या रंगाला महत्व असतं.
 
 
आपली संस्कृती कृषी प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे याकाळात शेतात पिकलेलं अन्न म्हणजेच चणे, वाटाणे, गाजर याची ओटी भरल्या जाते. जुन्या काळी श्रीमंत गरीब असे भेदभाव न करता सर्व महिलांना हळदी कुंकवाला बोलवणं असायचं. याकाळात पौष्टिक अन्न पोटात जावं यासाठी या धान्याची ओटी भरल्या जायची. महिलांना मान सन्मान म्हणून छोटंसं का होईना पण वाण लुटल्या जायचं.
 
 
  
पतंग उत्सवाचंही तसंच आहे. उन्हाळ्यात गरम झळांनी पतंग खराब होवू शकते, पावसाळ्यात पावसाने पतंग फाटू शकते, मात्र हिवाळ्यात हवा स्वच्छ असते, त्यामुळे पतंग उत्सवासाठी हा सगळ्यात योग्य काळ आहे. आपल्या प्रत्येक सणामागे प्रथेमागे काहीतरी वैज्ञानिक कारण आहेच. या सणांमुळे आपण कुटुंब म्हणून, समाज म्हणून एकत्र तर येतोच पण सोबतच आपण निसर्गाच्याही जवळ जातो. त्यामुळे आजी आजोबांनी जशा या परंपरा जपल्या तशा आपणही जपूयात. नवीन रेशमाचं, फर असलेल ब्लँकेट कितीबी गरम असलं तरी खरी ऊब आजीच्या गोधडीतच येते नाही का? 
 
 
@@AUTHORINFO_V1@@