बोलीभाषांचेही संमेलन भरावे : लक्ष्मीकांत देशमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
१९३१ साली बडोद्याला अखिल मराठी साहित्य संमेलन पार पडले. तेव्हा तत्कालीन संमेलनाध्यक्ष न. चि. केळकरांनी या संमेलनाचे वर्णन ‘शारदोत्सव’ असे केले. बरेचदा या संमेलनांवर टीका झाली, वादही रंगले. पण, हा साहित्योत्सव तितक्याच उत्साहाने संपन्न होत गेला. यंदा ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत कामाचा दांडगा अनुभव पदरी असलेल्या देशमुखांनी चौफेर लिखाण केले. त्यांचे ‘प्रशासननामा’ हे प्रशासकीय कथालेखांचे पुस्तक आणि ‘बखर भारतीय प्रशासनाची’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. २१ व्या शतकात मराठी साहित्याची ओळख हरवत चालली आहे का? साहित्य संमेलनांची नेमकी गरज काय? या आणि अशा अनेक प्रश्नांवर लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘महा एमटीबी’ ला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास मते व्यक्त केली.
 
२१व्या शतकात मराठी साहित्याची ओळख हरवत चालली आहे का? कारण, आजही २० व्या शतकातील साहित्यच अधिक लोकप्रिय आहे.
सर्वप्रथम मराठी समाज हा भूतकाळात रमणारा आहे, असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर यांनी २० व्या शतकात लिहिलेली पुस्तके आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. प्रत्येक काळाच्या साहित्यात तत्कालीन घटनांचे प्रतिबिंब पडत असते. भारतात एकाच वेळी अनेक शतके नांदत आहेत. आपल्या देशात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर भिन्न भिन्न आहेत. आजही भारतात ‘इंडिया विरूद्ध भारत’ असा संघर्ष पाहायला मिळतो. त्यामुळे हे स्तर पाहता लेखन होणे अपेक्षित आहे. नव्या पद्धतीचं लिखाण चालू आहेच. जागतिकीकरणानंतर माणसांपेक्षा पैशाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचे पडसाद साहित्यात पडत आहे, अशा प्रकारचे लेखन मीही केलेले आहे. माझे पुढील पुस्तक ‘माणूस नावाचे एकाकी बेट’ हे बडोद्याच्या साहित्य संमेलनात प्रकाशित होईल. २१ व्या शतकातही चांगले लेखन होत आहे. परंतु, ते तितके प्रसिद्ध होत नाही आणि वाचलंही जात नाही, हे नक्की.
 
मराठी साहित्यातील क्षमता माध्यमांतरामध्ये वापरली जाते, असे आपल्याला वाटते का?
माध्यमांतरांचा ‘ट्रेंड’ हॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात रुजला आहे. परंतु, भारतात अजूनही हा ‘ट्रेंड’ रुजलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार पूर्वी प्र. के. अत्रे, खांडेकर यांनी अनेक चित्रपटांचे लेखन केले. खांडेकरांच्या सहा चित्रपट कथांचा संग्रह मेहता प्रकाशन संस्थेने प्रकाशितही केला. अलीकडे मराठी साहित्यकृतीवर आधारित काही चांगले चित्रपट प्रदर्शित झाले. उदा. ‘जोगवा’, ‘दुनियादारी.’ या चित्रपटांना चांगले यशही मिळाले. साहित्यातील कथेचे रुपांतर पटकथेत करणे हे आव्हानात्मक असून बर्‍याच वेळेला हे प्रयोग फसले आहेत. त्यासाठी निष्णांत पटकथाकाराची गरज आहे. अशा पटकथाकारांची गरज आहे, जो कादंबरीचा, कथेचा मूळ गाभा कायम ठेवून शब्दांना चित्रस्वरूपात मूर्त करेल. त्यामुळे चांगले पटकथाकार नसल्याने मराठी साहित्यातील क्षमता पूर्णत: वापरल्या जात नाही. त्यामुळे साहित्यातील शब्दांना मूर्त स्वरूप न दिल्याने काही चित्रपट अगदी शब्दबंबाळही झाले. त्यातच साहित्यकृतीत नव्याने काही पात्रांची भर घालून चित्रपट निर्माण करता येऊ शकतो हे ‘नटसम्राट’ने दाखवून दिले. त्यामध्ये विक्रम गोखले यांचे पात्र नव्याने समाविष्ट केले होते. मद्याच्या दृश्यांमुळे तो चित्रपट थोडा भडक झाला असला तरी मराठी साहित्यातील माध्यमांतराचे ‘नटसम्राट’ हे एक चांगले उदाहरण म्हणून निश्चितच सांगता येईल.
 
साहित्य संमेलनाच्या मराठी साहित्यातील योगदानाविषयी वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्याविषयी काय सांगाल?
निश्चितच साहित्य संमेलनाचे मराठी साहित्यात मोलाचे योगदान आहे. जी गोष्ट अनावश्यक आहे, ती गळून पडते. संमेलन हे साहित्याला पूरक आहे. १९३१ साली बडोद्याला साहित्य संमेलन पार पडले, त्याचे अध्यक्ष होते न. चि. केळकर. ते म्हणाले होते की, ‘‘हा ‘साहित्याचा शारदोत्सव’ आहे.’’ कारण, दरवर्षी नव्याने या संमेलनामुळे साहित्यात भर पडते. संमेलनामुळेच लेखक- वाचक संवाद घडून येतो. या संवादामुळे लेखकाला बळ मिळून त्याचे लेखन अधिक चांगले घडू शकते. माझेही हेच मत आहे. हा ‘शारदोत्सव’ आहे. वाचकांचा हा उत्सव आहे. या संमेलनांना वाचक चांगली गर्दी करतात. परिसंवादही पार पडतात. या संमेलनामुळे लेखक, वाचक, प्रकाशक हे सर्व एकत्र येतात आणि साहित्य संमेलनाध्यक्षही समाजाचा नेता होऊ शकतो, ही भावना वाढीस लागते.
 
मराठी साहित्य संमेलनाला जणू वादांची किनार लाभली आहे. तेव्हा, संमेलनामध्ये असे वाद उद्भवणे आपल्याला कितपत योग्य वाटते?
संमेलनात होणारे काही वाद हे नैतिक आहेत. एकदा विवेकानंद आश्रमात संमेलन घ्यायचे की नाही, यावर वाद झाला होता आणि श्याममानव यांनी त्यावर आवाज उठवला, ते योग्यच झाले. अशा वादांचे मी स्वागतच करतो. पण, काही वाद हे माध्यमनिर्मित असू शकतात.
 
साहित्यिक आपल्या साहित्यासोबतच समाजातील विविध घडामोडींवर भूमिका घेतात का? याकडे आपण कसे बघता?
लेखकाने विविध विषयांवर आपली भूमिका घेतलीच पाहिजे. बरेचसे लेखक तसे भूमिकाप्रधान आहेतही. पण, याचे नेमके प्रमाण काही मला सांगता येणार नाही. कारण, लेखक, कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून सामान्य माणसांची कथा सांगत असतो. त्यामुळे समाजातील ‘नाही रे’ वर्गाच्या बाजूने साहित्यिकाने उभे राहणे हे त्याचे नैतिक कर्त्यव्य आहे, असे मी मानतो.
 
 
 
साहित्यिकांनी घेतलेली भूमिका केवळ त्यांच्या वक्तव्यांतूनच व्यक्त झाली पाहिजे का? की ती त्यांच्या कलाकृतीतूनही प्रतिबिबिंत होणे आपल्याला आवश्यक वाटते?
लेखकाने आपल्या साहित्यातूनही व्यक्त होणे गरजेचे आहे. व्यवस्था ही सत्ता केंद्रित असते. त्या व्यवस्थेवर लेखकाने प्रहार करणे गरजेचे आहे. कलाकाराने आपल्या कलाकृतीतून व्यापक भूमिका घेतली पाहिजे. यामुळेच व्यवस्थेत काही सकारात्मक बदल घडतील. तसेच जाहीर सभा-समारंभातून आग्रही भूमिका मांडली पाहिजे. लेखनाचे स्वरूप हे कथानुरूप असतं. म्हणून भाषणातून थेट भूमिका घेणे स्वागतार्ह.
 
मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल आणि एकूणच भवितव्याबद्दल वेळोवेळी भीती व्यक्त केली जाते. ती तुम्हाला कितपत रास्त वाटते?
मराठी माणसाचं मराठी भाषेवर कमी प्रेम आहे असून आपण दांभिक आहोत. आपले आचरण मराठीला पूरक नसते. ज्या पालकांची आर्थिक क्षमता बरी आहे, ते आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात आणि मराठीच्या नावाने गळा काढतात. म्हणून माझी मागणी आहे की, प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरी भाषा म्हणून मराठी भाषा अनिवार्य करावी. जिथे दुसरी भाषा जर्मन, फ्रेंच आहे तिथे मराठी शिकायला काय अडचण आहे? यात सरकारने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे दक्षिणेतील राज्यांनी त्यांची भाषा अनिवार्य केली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषा अनिवार्य करावी. तेलंगणात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सीबीएसई शाळेत तेलुगु शिकवणार नसाल, तर या शाळा बंद करू. तेव्हा, महाराष्ट्र सरकारनेही अशी ठाम भूमिका घेतली पाहिजे. गुगलने एक भाषांतराचे तंत्र विकसित केले आहे. त्यात समोरचा माणूस इंग्रजीत बोलल्यानंतर आपल्याला मात्र मराठीत ऐकू येईल. हे तंत्र पुढील दहा वर्षांत विकसित होईल. समोरच्या माणसाशी संवाद साधण्यासाठी विशिष्ट भाषा आलीच पाहिजे, हा नियम आगामी काळात कालबाह्य होईल. गुगलने १२० भाषांवर काम करण्यास सुरूवात केली आहे, त्यात मराठी भाषेचाही समावेश आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा कशी होईल, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी मी मराठी विद्यापीठाची मागणी करणार आहे. भाषेच्या समृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात कोशनिर्मितीची गरज असते.
 

शासनाकडून मराठी विश्वकोशसारख्या प्रकल्पांना चालना देण्यात आली आहे. याविषयी तुम्ही समाधानी आहात का?
होय, ही अगदी स्वागतार्ह बाब आहे. तसंच मराठी भाषेत शब्दकोशांचे प्रमाणही कमी आहे. ऑक्सफोर्डसारखी संस्था दरवर्षी इतर भाषांतील शब्दांचा समावेश आपल्या कोशात करुन घेते. तसेच, प्रयत्न आपल्याकडे झाले पाहिजे. इतर शब्द आपल्या भाषेत सामावून घ्यायला हवे. त्या शब्दांसाठी सोपे आणि सुलभ शब्द मिळाले पाहिजे. हे काम खाजगी संस्था करू शकत नाही. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या धर्तीवर मराठी शब्दकोश निर्मिती मंडळ सुरू करण्याची त्यामुळे गरज आहे. तसेच आपल्याकडे भाषांतरासाठीही एक स्वतंत्र संस्था हवी. इंग्रजी आणि इतर भाषांमधील ज्ञान मराठी भाषेत आणण्यासाठी अशा संस्थेची नितांत गरज आहे. १९४१ साली जेव्हा सोलापूरला साहित्य संमेलन झाले, तेव्हा बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी एक सूचना मांडली होती. ते म्हणाले होते की, ‘‘इतर भाषांतील जे वैचारिक साहित्य आहे, ते मराठीत आले पाहिजे.’’ त्यांनी त्यावेळी यासंदर्भात एक उदाहरण दिले होते. ते म्हणाले होते, महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. परंतु, समुद्र ज्ञानावर एकही पुस्तक उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली होती. तसे मराठी भाषेत संदर्भग्रंथ उपलब्ध नाहीत. बरेच संदर्भग्रंथ इंग्रजी आणि इतर भाषेत उपलब्ध आहेत, ते मराठीत आणण्यासाठी भाषांतर केंद्राची गरज आहे. ही भूमिकाही मी माझ्या अध्यक्षीय भाषणात मांडणार आहे.
 
बोलीभाषांचे अस्तित्व नामशेष होत चालले आहे, असे आपल्याला वाटते का?
दुर्दैवाने बोली भाषा नामशेष होत आहे. त्यांचे अस्तित्व जपण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ऐरणी, वैदर्भीय, गोंड या ज्या आपल्या राज्यातील बोलीभाषा आहेत, त्यांचे अस्तित्व जपण्यासाठी या बोलीभाषेतील शब्द संदर्भग्रंथात वापरले पाहिजे. त्यातील म्हणी, वाक्‌प्रचार यांचे कोश निर्माण झाले पाहिजे. तसेच त्या त्या बोलीभाषांचे साहित्य संमेलनही आयोजित केले पाहिजे. आगरी भाषेचे संमेलन व्हावे, अशी सूचना मी केली होती. त्या बोलीभाषांच्या संमेलनात उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत प्रत्येक कथा, कविता ही बोलीभाषेत सादर होईल. त्याचे दस्तावेज तयार झाले की त्याचे साहित्यात रुपांतर होईल. आताच मारुती चितमपल्ली यांनी प्राणीकोश, वनकोश आणि पक्षीकोशासाठी बोलीभाषेतील शब्द वापरले आहेत. अशा प्रयत्नांमुळे मराठी भाषेला नवी शैली प्राप्त होईल. बोलीभाषेतील संस्थांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. बोलीभाषेतील एक संमेलन घेण्याचा माझा मानस आहे.
 
भाषांतरित साहित्याचे प्रमाण मराठीत हल्ली वाढले आहे. पण, ही प्रक्रिया एकतर्फी आहे. मराठी भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये भाषांतरित होण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी साहित्य स्तरावर कोणते प्रयत्न होणे गरजेचे आहे?
मराठीतील साहित्य हिंदी, इंग्रजीत भाषांतर होण्याचे प्रमाण घटले आहे, हे अगदी खरं आहे. आपले मराठीतील अभिजात साहित्य या भाषांत भाषांतरित न झाल्याने आपल्याला मानाचे पुरस्कार कमी मिळतात. कन्नड भाषेतील साहित्याला असे आठ पुरस्कार मिळाले आहेत, तर मराठीला केवळ चारच पुरस्कार मिळाले आहेत. कन्नड साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्य अधिक समृद्ध आहे. आपल्याकडील जी. ए. कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडेंसारख्या लेखकांचे साहित्य इतर भाषेत भाषांतरित झाले नाही. त्यामुळे आपल्याला पुरस्कार मिळाले नाही. मराठी साहित्याचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतर होण्यासाठी माझ्या दोन कल्पना आहेत. एक म्हणजे साहित्य अकादमी, जी साहित्याविषयी हिंदी आणि इंग्रजी भाषेत दोन नियतकालिकं प्रकाशित करते. याच धर्तीवर साहित्य आणि संस्कृती महामंडळाकडून एक नियतकालिक प्रकाशित करावे. त्या नियतकालिकात मराठी साहित्य हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतर केलले असेल. हे भाषांतर महाविद्यालय आणि विद्यापीठातील इंग्रजी आणि हिंदीच्या मराठी भाषिक प्राध्यापकांकडून करता येईल. आणि दुसरं असे की, हिंदी आणि इंग्रजी भाषांतरकारांसाठी एका कार्यशाळेच्या आयोजनाचा प्रस्तावही मी ठेवणार आहे. यावर आम्ही बरंच कामही केलं आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रकाशकांशी करार करून त्यांना निर्मिती खर्च देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी १० पुस्तकं प्रकाशित करून घ्यायची. वाचकांपर्यंत पुस्तकं पोहोचविण्याचे कार्य हे प्रकाशक करतील. यामुळे मराठी साहित्य इतर भाषिक वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या दोन भाषांत आपले साहित्य भाषांतरित झाले की, इतर भाषांमध्येही मराठी साहित्य आपोआप पोहोचेल, याची मला खात्री वाटते.
 
 
- तुषार ओव्हाळ  
@@AUTHORINFO_V1@@