देवकीनंदन जिंदल निष्ठावान, समर्पित, आणि कार्यकुशल नेतृत्वाचा आदर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018   
Total Views |
 
 
 
विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष देवकीनंदन जिंदल यांनी आज वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. सदैव हसतमुख, उत्साही, कार्यतत्पर राहणा-या देवकीनंदन जिंदल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सतीश सिन्नरकर यांनी त्यांची घेतलेली मुलाखत संक्षेपाने देत आहोत.
 
आपण मूळचे हरियाणाचे. एकूणच तुमचे बालपण कसे गेले?
 
मी हरियाणातील भिवानीचा. १९४२ साली माझा जन्म एका मोठ्या कुटुंबात झाला. इथेच आमचा दीडशे वर्षांपासूनचा कपड्यांचा फार जुना व्यवसाय चालतो. १९५९ साली मी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालो, पण पुढचं शिक्षण मात्र मला थांबवावं लागलं. माझे वडील आणि त्यांच्या भावांमध्ये संपत्तीच्या वाटण्या झाल्या आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काहीशी खालावली. तरीही माझ्या आजोबांची इच्छा होती की, मी पुढे शिकावं. पण, त्यावेळी मला माझ्या वडिलांसोबत राहणं जास्त महत्त्वाचं वाटलं आणि मी शिक्षण सोडून व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केलं. पुढच्याच वर्षी १९६० मध्ये माझा विवाह झाला आणि माझ्यावरील जबाबदारी आणखीन वाढली. पुढे दोन-तीन वर्षं वडिलांसोबत दुकानात मी काम केले. पण, व्यवसायात म्हणावी तशी प्रगती काही होत नव्हती. ५ भाऊ आणि ३ बहिणी असा आमचा परिवार होता. कुटुंबातला ज्येष्ठ पुत्र या नात्याने साहजिकच भावंडांची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा मला वाटले की, माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी मला इथून दूर जाऊन व्यवसाय करायला हवा.
 
मुंबईला माझे मामा राहायचे. १९६३ साली मग मी मुंबई गाठली आणि त्यांच्या लोखंडाच्या व्यवसायात काम करण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तर इथल्या व्यापार-व्यवहाराशी मी पूर्णत: अपरिचित होतो. त्यामुळे मुंबईलाही मला विशेष अशा व्यावसायिक प्रगतीची संधी मिळाली नाही. त्यानंतर मी माझा स्वतंत्र कपड्याचा व्यवसाय एका छोट्याशा खोलीत सुरु केला. माझ्या जीवनातला तो सगळ्यात अवघड काळ होता. सात-आठ वर्षं भरपूर समस्यांचा मला सामना करावा लागला आणि या काळात व्यवसायात सगळे आलबेल नसल्याने मी सदैव चिंताग्रस्त असायचो. माझी पत्नी आणि मुलं गावाला असायची आणि मी इथे मायानगरी मुंबईत ‘स्ट्रगल’ करत होतो. माझ्या जीवनातले ते दिवस मी कधीही विसरु शकणार नाही. ढाब्यावर जेवण ठरलेले, आम्ही दोन-तीन जणं एका खोलीत राहायचो आणि मग सकाळी त्याच खोलीला ऑफिस बनवायचो, हाच आमचा दैनंदिन कार्यक्रम होता. या काळात इतक्या अडचणींचा सामना करावा लागला की, देव करो अशी परिस्थिती शत्रूवरही न येवो. १९७१ मध्ये आमचे भाग्य जणू उजळले आणि हळूहळू व्यवसायवाढीने गती धरली. त्यानंतर कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. आज आम्ही सर्व भाऊ मिळून मुंबई आणि दिल्लीहून व्यवसाय करतो आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित सुरु आहे.
 
 
तुम्ही मालाडमध्ये रामलीलेला प्रारंभ केलात आणि गेल्या ३६ वर्षांपासून ही परंपरा निरंतर सुरु आहे. तेव्हा, या आयोजनामागील प्रेरणेविषयी काय सांगाल?
 
लहानपणापासूनच मला रामलीला पाहण्याची खूप इच्छा होती. आमच्या गावातला रामलीलेचा कार्यक्रमही अगदी धुमधडाक्यात व्हायचा. पण, तिथे खूप गर्दी असल्याने मला मात्र जायला भीती वाटायची. मग मी स्काऊटचा गणवेश घालून जायचो. त्यामुळे मला मैदानाच्या मधोमध उभं राहून रामलीला बघायला मिळायची आणि मी स्वंयसेवक म्हणूनही काम करायचो.
 
इथे मुंबईला आल्यावर एक वर्ष मी मालाड पूर्वेकडील रामलीला पाहिली आणि तिथून मला प्रेरणा मिळाली आणि विचार केला की, मग आपण मालाड पश्चिमेला रामलीलेचे आयोजन का नाही करत? यासंदर्भात मी माझ्या मित्रांशी चर्चा केली आणि राधेश्यामजी बेरिवालसारख्या लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिले आणि १९८२ साली श्रीरामलीला प्रचार समितीची स्थापना झाली. दिल्लीतील माझे भावजी गौरीशंकरजी गुप्ता रामलीलेमध्ये सहभागी व्हायचे, त्यांची मग मी भेट घेतली. त्यांनी माझी भेट मुरादाबादच्या सोती यांच्याबरोबर घालून दिली, जे एक वेगळ्या प्रकारची रामलीला सादर करायचे आणि त्याचे दिग्दर्शनही स्वत:च करायचे. मुंबईमध्ये रामलीला सादर करायला ते लगेच तयार झाले आणि त्यांनी फक्त प्रवासखर्चाची मागणी केली. अशाप्रकारे १९८२ साली सोती यांच्या सहयोगाने केवळ ३१ हजार रुपयांमध्ये आमची पहिली रामलीला सुरु झाली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट रामलीलेचा पुरस्कारही आम्हाला मिळाला आणि आज संपूर्ण देशात ज्या तीन रामलीला सर्वोत्कृष्ट मानल्या जातात, त्यामध्ये आमच्या रामलीलेचे नाव आवर्जून घेतले जाते.

 
 
 
आपण विश्व हिंदू परिषदेच्या संपर्कात कसे आलात?
रामलीलेच्या निमित्ताने डॉ. श्याम अग्रवाल, सुरेश भगेरिया, किशोर रामुका, वीरेंद्र याज्ञिक असे अनेक लोक माझ्या संपर्कात आले. एकदा त्यांनी आचार्य धर्मेंद्र यांची कथा करण्याचे योजिले, ज्याचा उपयोग केशवसृष्टी प्रकल्पाला आर्थिक सहाय्यता प्राप्त करण्यासाठी होणार होता. त्या सर्वांच्या आग्रहाखातर मी आयोजनाचे अध्यक्षपदही स्वीकारले. ती कथा खूप यशस्वी ठरली. एकदा रामलीला पाहायला आलेले विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष रमेश मेहता यांनी अचानक मंचावर घोषणा केली की, विश्व हिंदू परिषदेच्या मुंबईतील मार्वे आणि ओशिवरा जिल्ह्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी देवकीनंदन जिंदल यांच्यावर सोपवत आहे. मी नकार दिला, पण माझे ऐकणार तरी कोण? पुढे पाच-सहा वर्षे केले आणि या काळात मला अनेकांचे सहकार्य लाभले. असेच एकदा रमेश मेहता, व्यकंटेश आबदेव हे महानुभाव आमच्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितले की, आम्ही तुम्हाला कोकण प्रांताच्या अध्यक्षपदाची जबाबादारी सोपवित आहोत आणि हे दायित्व त्यांनी मला दिले. प्रांताध्यक्ष म्हणून काम करताना दीपक गायकडवाड, संदीप तोंडापूरकर, अरुण हांडा, व्यकंटेश आबदेव, रामचंद्र रामुका, राजू आपटे अशा अनेक सक्षम कार्यकर्त्यांचे मला संपूर्ण सहकार्य लाभले. डॉ. श्याम, सुरेशजी आणि विमलजींसारख्या अनेकांचे मला निरंतर मार्गदर्शन लाभले आणि मी कृतकृत्य झालो.
 
रामलीला मंचाच्या भवितव्याविषयी आपल्याला काय वाटते?
मी असे ठरविले होते की, २५ वर्षांनंतर मी कोणत्याही पदावर कार्यरत राहणार नाही. नवीन लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. आज गेले ११ वर्षं मी एक विश्वस्त म्हणून काम पाहतो आहे. सुसंस्कार आणि मर्यादा हा रामलेलीचा वारसा आहे. तो लोकांपर्यंत पोहोचवायला हवा. आम्ही हा मंच सर्वांसाठी खुला ठेवला आहे. हा कोणत्याही प्रकारचा राजकीय आखाडा नाही. सगळ्यांचे आम्ही स्वागत करतो आणि सगळ्यांचे आम्हाला सहकार्यही लाभते. सर्व धर्मीय लोक या रामलीलेत सहभागी होतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात. हीच परंपरा पुढे चालू राहो, अशी आशा करतो. वर्षभरही आम्ही सेवाकार्य आणि धार्मिक कार्यांमध्ये सक्रीय असतो. भगवान श्रीराम हे माझे आराध्य दैवत आहे. त्यांच्या आदेशानुसारच चालण्यातच माझ्या जीवनाचे यश आहे, असे मी मानतो.
 
कोकण प्रांताच्या कार्यवृद्धीविषयी आपले काय विचार आहेत?
 
याकरिता आमच्या बैठका, प्रवास, संपर्क चालू असायचा. सर्वांशी विचारविमर्श करुनच मग कार्यविस्ताराचा निर्णय घेतला जायचा. हे टीमवर्क आहे. हे कुणा एका व्यक्तीचे काम नाही. बजरंग दल, दुर्गावाहिनी आदींसारखे आयाम निश्चितच प्रगती करत आहेत आणि त्यामागे समर्पित कार्यकर्त्यांचे कष्ट, त्याग आणि समर्पण आहे. देशाचे भविष्य म्हणूनच देदिप्यमान आहे, असे मी मानतो. देशभरात विहिंपचे ४४ प्रांत आहेत. यामध्ये जे सगळ्यात अग्रेसर प्रांत आहेत, त्यामध्ये कोकण प्रांताचा समावेश आहे, असे आमच्या राष्ट्रीय नेत्यांना वाटते. यामुळे आमचा उत्साह वाढतो. येथील कार्यपद्धतीवर आमचे केंद्रीय नेतृत्व समाधानी आहे. मी विशेषत्वाने रामचंद्र रामुका यांचा उल्लेख करेन, कारण ते आपला संपूर्ण वेळ संघटनेच्या कार्यासाठी देतात आणि कामामध्ये सदैव अग्रेसर असतात.
 

आजच्या तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
मी तरुणपिढीला सांगू इच्छितो की, जर तुम्हाला तुमचे जीवन यशस्वी करायचे असेल तर रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद आणि चांगले सामाजिक कार्य करणा-या धार्मिक संघटनांच्या संपर्कात या. तिथे कार्य करा, आपले योगदान द्या. यातून तुम्हाला संदेश मिळेल की, आपले जीवन आराम करण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आहे, कर्म करण्यासाठी आहे.
 
(अनुवाद : विजय कुलकर्णी)
 
आज अमृत महोत्सवाचे आयोजन
 
विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांताचे सन्मानीय अध्यक्ष देवकीनंदन जिंदल यांच्या ७५ व्या जन्मजयंतीनिमित्त अमृत महोत्सवाचे आयोजन आज, रविवार, दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, विष्णू ग्राऊंड, बांगूर नगर, गोरेगाव (प) येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महामंडलेश्वर पूज्य स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज, वात्सल्यमूर्ती प. पू. दीदी मॉं (साध्वी ऋतुंभराजी) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, तर विशेष अतिथी म्हणून विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीणभाई तोगडिया उपस्थित राहणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@