केजरीवालांची मळमळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018   
Total Views |

भीमा-कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर परराज्यातील सावरणार्‍या आणि मेवानींसारख्या प्रकाशझोतात चमकू पाहणार्‍या राजकारण्यांचे महाराष्ट्र हे जणू ‘पोलिटिकल डेस्टिनेशन’च झाले आहे की काय, अशी शंका यावी. ‘चलो महाराष्ट्र’ म्हणत हे स्वार्थी, जातीयवादी राजकारणी महाराष्ट्राचे सामाजिक-राजकीय वातावरण बिघडवण्याची एकही नामी संधी सोडणारे नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी तर उकळत्या तेलाला अधिकच तापवले आणि अख्खा महाराष्ट्र त्यातून भडकलेल्या जाळपोळीत पोळून निघाला. आंबेडकरांनंतर मेवानी आणि इतरही कम्युनिस्टांनी महाराष्ट्राकडे कूच करत प्रकाश आंबेडकरांनी भडकावलेली आग कशी विझणार नाही, याचीच काळजी घेत विखारी बोलीने राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाणा डाव खेळला. मग या जातीय संघर्षाची ठिणगी लागून पेटत्या वणव्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही म्हणा कसे मागे राहतील! त्यांनीही लगेहात सिंदखेडराजा येथे आयोजित कार्यक्रमात भाजप आणि संघावर निशाणा साधला.
 
जेमतेम हजेरी असलेल्या ‘महाराष्ट्र संकल्प’ कार्यक्रमात केजरीवालांनी मुद्दाम करायचे म्हणून असे हे स्फोटक विधान केले. भाजप-संघाच्या कथित सहभागाचे पुरावे वगैरे द्या, असे केजरीवालांना विचारणेच हाच मुळी मूर्खपणा ठरेल. कारण, एखाद्यावर आरोपांचा धुरळा उडवताना हे दिल्लीचे मुख्यमंत्री जितकी गिधाडगती दाखवतात, ती पुरावे मागितल्यावर आणि न्यायालयात खेचल्यावर कासवगतीलाही लाजवते. त्यामुळे केजरीवालांनी यापूर्वी अनेकांवर केलेल्या निराधार आरोपबाजीच्या खटल्यांचा विचार करावा आणि मगच खरं तर तोंड उघडावे. पण हे ‘आप’वाले आदत से मजबूर. त्यामुळे तसे होणे नाही. त्यातही केजरीवालांचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधच काय? ‘आप’ची महाराष्ट्रात ताकद तरी किती? किमान एक तरी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचेही मनगटी बळ नसताना केजरीवालांनी महाराष्ट्रात येऊन दिल्लीगर्जना करण्यात काय हासील? जिजाऊंच्या भूमीत येऊन अशी समाजमन कलूषित करणारी विधाने करुन ‘आप’ची सत्ता येणार आहे का? तर साहजिकच नाही. तेव्हा, दुसर्‍या राज्यांत जाऊन स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवू पाहणार्‍या केजरीवालांनी सर्वप्रथमएक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून स्वत:ची प्रतीमा सुधारावी. दिल्लीत न केलेल्या कामाचे गोडवे महाराष्ट्रात गाऊनही इथे सत्तेच्या आसपासही त्यांना फिरकता येणार नाही, ही गाठ त्यांनी वेळीच बांधावी.
 
'खेहरी'खोट्याची खिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या आणि एकूणच न्यायालयातील प्रशासकीय कामकाजाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. हे कमी की काय म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश जगदीश सिंह खेहर यांनीही ‘‘हिंदुत्ववादी राजकारण देशहिताचे नाही. असे राजकारण केल्यास आपला देश महासत्ता होणे नाही,’’ अशी भविष्यवाणीच केली. इतकेच नाही तर इतर धर्मांच्या तत्वज्ञानावर चालणार्‍या देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी हिंदुत्ववादी राजकारण बाधक असल्याचेही खेहर म्हणाले. त्यामुळे माजी सरन्यायाधीशांसारखी मोठ्या पदावरुन निवृत्त झालेली व्यक्ती जेव्हा अशाप्रकारे हिंदुत्ववाद्यांवर टीका-टीप्पणी करण्यात धन्यता मानते, तेव्हाच शंकेची पाल कुठे तरी चुकचुकते. पण, खेहर यांचे ‘हिंदुत्ववादी राजकारणा’चे विचार एका दुसर्‍या वृत्ताने खरं तर आपसूकच खोडून काढले. ते म्हणजे, ‘गॅलप इंटरनॅशनल’ या एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश जगातील तीन अव्वल नेत्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. प्रथमक्रमांकावर जर्मनीच्या चॅन्सेलर ऍन्जेला मर्केल, दुसर्‍या क्रमांकावर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आणि तिसर्‍या क्रमांकावर नरेंद्र मोदी. त्यामुळे इथे ध्यानात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर मोदींनी २०१४ ते २०१८ हिंदुत्ववादी राजकारणाचे डावपेच खेळले असते, देशात अराजक माजवले असते, तर निश्चितच जगातील पहिल्या तीन अव्वल नेत्यांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले नसतेच. कौतुकास्पद बाब म्हणजे, मोदींनंतर जिनपिंग, पुतीन, थेरेसा मे, नेतान्याहू यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे हा अहवाल मोदींच्या व्यापक जनाधाराचीच एकप्रकारे साक्ष देणारा म्हणावा लागेल. पण मग खेहर असो किंवा इतर कोणी, त्यांनी पंतप्रधानांकडे अंगुलीनिर्देश करुन हिंदुत्ववाद्यांना बदनामकरण्याचा संतापजनक प्रकार त्वरित थांबवायला हवा. पण, जसजशा २०१९च्या निवडणुका दृष्टिक्षेपात दिसताहेत, तसतशी विरोधकांच्या पायाखालची जमीन खचत चालली आहे. कारण, मोदींसमोर टिकाव धरु शकेल, असा दुसरा कुणीही नेता सध्या तरी भारताच्या राजकीय क्षितिजावर नाहीच. त्यामुळे न्यायाधीश असो वा सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या व्यक्ती, त्यांनी आपण काय बोलतो, कोणाविषयी बोलतो याचा किमान एकदा तरी संदर्भपूर्ण विचार करावा आणि सामाजिक-राजकीय वातावरण अधिक कलूषित करण्याच्या या शर्यतीपासून देशहितासाठी किमान लांब राहावे.
 
 
- विजय कुलकर्णी 
@@AUTHORINFO_V1@@