रायगड जिल्ह्यात लोकसहभागातून बांधले २ हजार ८०४ वनराई बंधारे
 महा एमटीबी  13-Jan-2018
 
 
 
 

 
लोकसहभागाने शासनाचे वाचले १५ कोटी ४२ लाख
 
 
पेण: पाणी हे जीवन आहे आणि पाणी वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रायगड जिल्हा परिषदेने जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये २ हजार ८०४ वनराई बंधारे बांधून १२६.१८ घन मीटर पाण्याचा जलसाठा साठविला आहे. तर या लोकसहभागातून बांधलेल्या वनराई बंधार्‍यामुळे शासनाच्या १५ कोटी ४२ लाख ५ हजार रुपयांची बचत झाली आहे. लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या या बंधार्‍यासाठी ४२ हजार ७० जणांचे हातभार लागले आहेत. वनराई बंधारे बांधल्याने परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून ग्रामस्थांना आपल्या रोजच्या जीवनात लागणारे पाणी वापरण्यास मिळणार आहे.
 
 
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात लोकसहभागातून हे वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
 
 
रायगड जिल्हातील पेण खारेपाट, महाद, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, खालापूर, पनवेल, अलिबाग या तालुक्यात जानेवारीपासून काही भागात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत असतात. यासाठी जिल्हा परिषदेने पाणी टंचाई पासून वाचण्यासाठी 'पाणी आडवा, पाणी साठवा' हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात केली.
 
 
यासाठी गावातील ग्रामस्थ, शाळेतील मुले, शासकीय अधिकारी, एनसीसी, तरुण मुले, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात २ हजार ८०४ वनराई बंधारे बांधले आहेत.
 
शासनाचे वाचले १५ कोटी
लोकसहभागातून हे बंधारे बांधले असल्याने यामध्ये सर्वांचा हातभार लागला. त्यामुळे या बंधार्‍यावर शासनाचा होणारा १५ कोटी ४२ लाख ५ हजारांचा खर्च वाचला आहे. जिल्ह्यात बांधलेल्या बंधार्‍यामुळे १२६.१८ घनमीटर पाण्याचा जलसाठा साठला आहे असे डॉ. अभय यावलकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले.
वनराई बंधार्‍याचे फायदे
या बंधाऱ्यांमुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकला पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर कुटिरोद्योग (वीट भट्टी, मस्त्यबीज) यांनाही मुबलक पाणी मिळणार असून घरगुती वापरासाठी, पशुधन, पक्षी यांना पिण्यासाठी याचा वापर स्थानिक ग्रामस्थ करू शकतात. तर महत्त्वाचे म्हणजे या वनराईमुळे बंधार्‍याने भूजल पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश साळुंखे यांनी सांगितले.