येत्या २० दिवसात होणार रायगड संवर्धनाच्या कामाला प्रारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
कोणताही गैरव्यवहार सहन करणार नाही : संभाजी राजे
 

पेण : रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ६०६ कोटी रुपये खर्च करून रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या २० दिवसांमध्येच या कामाला प्रत्यक्षात प्रारंभही करण्यात येणार आहे. या कामादरम्यान शासकीय अधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास तो प्रकार सहन करणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
 
 
संभाजीराजे यांनी किल्ले रायगडला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महाड शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. रायगड संवर्धन प्रकल्पासाठी राज्यशासनाने ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ११२ कोटी किल्ले रायगडावरील विविध अवशेषांचे संवर्धन करण्यासाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित निधीतून रायगड परिसरातील २१ गावांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असेल्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
संवर्धन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात किल्ले रायगडावर किमान साडेतीनशे ठिकाणी उत्खनन, नैसर्गिक स्वरूपातील पथ वे आणि रायगड रोपवे, कुशावर्त तलाव ते होळीचा माळ रस्ता ही तीन कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाचाड येथे राजमाता जिजाऊ राजवाडा परिसरात ८८ एकर जागा संपादीत करून तेथे पीपीपी तत्वावर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शिवकालीन सरदारांची माहिती, त्यांच्या वंशजांकडून मिळालेल्या ऐतिहासिक वस्तूंचेही जतन करण्यात येईल. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गडकोटाची जी छायाचित्रे काढली आहेत. ती या संग्रहालयात ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन आपण त्यांना केले असल्याचे राजे यांनी सांगितले. ज्यांच्याकडे कोणत्या शिवकालीन वस्तू असतील त्यांनीही त्या या संग्रहालयात ठेवण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहनदेखील खा. संभाजीराजे यांनी केले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@