डोंबिवलीतील विवेकानंद सेवा मंडळाचे वैभव..
 महा एमटीबी  12-Jan-2018

 
 
 
८ हजारांवर ग्रंथांचा खजिना
पंचतत्त्वांच्या रूपाने ज्या सजीवांच्या जीवनाची सुरुवात होते त्यापैकी एक म्हणजे तेज म्हणजेच प्रकाश. संपूर्ण सजीव निर्जीव सृष्टी ज्या एका अव्यक्त बिंदूपासून निर्माण होते अगदी तेथपासून अंध:कार आणि तेज यांचा संबंध मानवी जीवनात येतो. तसं पाहिलं तर प्रकाश हे ऊर्जेचं एक स्वरूप आहे आणि त्यामुळेच त्यात परावर्तन आणि परिवर्तन या दोन्ही गोष्टी सचित्र समोर येतात. मानवी जीवन हे देखील परावर्तन आणि परिवर्तन याचेच द्योतक आहे. कदाचित म्हणूनच चराचर सृष्टीतील विकासाला प्रकाशाची उपमा नेहमी दिली जाते.
विवेकानंद सेवा मंडळाचे एकूणच उद्दिष्ट हे व्यक्तीनिर्माण आणि त्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती हे आहे. त्यासाठी मंडळाने गेल्या २५ वर्षांमध्ये अनेकानेक क्षेत्रांमध्ये सेवेचा अनुकूल आणि यशस्वी प्रयत्न केला आहे आणि भविष्यात देखील तो अविरत सुरु राहणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी आणि तेजस्वी विचारांच्या सहाय्याने मार्गक्रमण करणारे मंडळ आज विविध सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून समाजघटकांना सामर्थ्याने वाटचाल करण्याची प्रेरणा देत आहे. मानवी जीवनाचे ध्येय हे स्वतःला आणि समग्र समाजाला जीवनाच्या वाटेवर येणार्‍या अंध:कारापासून तेजाकडे नेण्याचे आहे आणि अगदी त्याच पद्धतीने विविध समाजांमध्ये शिक्षणाचा, जीवनाच्या मूल्यांचा, राष्ट्रकार्याचा तेजस्वी दीप प्रज्ज्वलित करण्याचा प्रयत्न आज मंडळाच्या माध्यमातून होत आहे.
 
अभियांत्रिकी ग्रंथालयापासून सुरु झालेला सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियंता बनण्याच्या प्रवासात सहाय्य करणारा आणि स्व-अर्थार्जनाकरिता नव्हे तर राष्ट्र आणि समाजनिर्मितीकरिता विद्यार्थी घडावे म्हणून निर्माण केलेला ग्रंथालय प्रकल्प हा मंडळाचा पहिला सेवा प्रकल्प. २०-२५ पुस्तकांपासून एका लहानशा गोदामातून सुरु केलेल्या ग्रंथालयात आज अभियांत्रिकीच्या विविध शाखांची ८००० हून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. आज डोंबिवलीमध्ये मंडळाची ज्ञानमंदिर ही स्व-वास्तू ग्रंथालयासह १२० विद्यार्थी क्षमतेच्या अभ्यासिकेसह उभी आहे. आज त्याच माध्यमातून घडलेले अभियंते, इतर उच्च विद्याशाखांमध्ये शिक्षण घेतलेले आणि घेणारे विद्यार्थी समाजातील विविध क्षेत्रात संस्थेने केलेल्या संस्कारांची आणि अनुकूल जडणघडणीची ऊर्जा आणि तेज आपापल्या कार्यक्षेत्रात रचनात्मक पद्धतीने पेरित आहेत.
 
मंडळ आज ग्रामविकास, शिक्षण, जलसंधारण, सामाजिक उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. शहरी भागात स्थापन झालेल्या संस्थेने ग्रामीण भाग आणि विशेषत्वाने वनवासी भागातदेखील आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार गेल्या २५ वर्षांत केला आणि त्या माध्यमातून तेथील शिक्षणापासून, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजाला जवळ केलं. या प्रवासात समाजानेही मंडळाच्या कार्याला सहृदयतेने आपलंस केलं.
 


 
 
शहापूर तालुक्यातील विहीगाव आणि वाडा तालुक्यातील खोडदे या वनवासी क्षेत्रातील गावांचा यामध्ये समावेश आहे. १९९४ मध्ये संपर्कात आलेलं आणि त्यानंतर मंडळाच्या ग्रामविकास प्रकल्पाची पायाभरणी ठरलेल्या विहिगावात आज विविध प्रकल्प आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘उमंग’ आणि ‘झेप’ हे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करणारे उपक्रम. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नात सुरु केलेली उटणे आणि सौंदर्याप्रसाधन उत्पादनांची निर्मिती हे महिला बचतगटांच्या माध्यमातून आणि मंडळाच्या सामाजिक उद्योजकता प्रकल्पांतर्गत केलेले प्रयत्न खर्‍या अर्थाने वनवासी महिलांच्या जीवनात दीप प्रज्वलनाचे कार्य करत आहे. केवळ या माध्यमातून होणार्‍या कार्याकडे महिलांच्या संसाराला आर्थिक मदत या दृष्टिने न पाहता ग्रामविकासामध्ये महिलांचा सहभाग व्हावा यासाठी महिला संघटनाचे कार्य आणि नकळतच वृत्तीघडणीच्या संस्कारांची पेरणीदेखील या प्रकल्पांच्या माध्यमातून होत आहे. दिवाळी स्नेहभोजन, भाऊबीज आणि असेच सणांच्या निमित्ताने आयोजित केलेले अनेक उपक्रम आज शहरी आणि वनवासी क्षेत्रांमध्ये बंधुतेचा संदेश देत आहेत.
 
विहिगावमध्ये जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षात मंडळाने विविध सामाजिक घटक आणि समविचारी संघटना यांच्या सहाय्याने, ग्रामस्थांच्या सहभागातून आणि कार्यकर्त्यांच्या कार्याप्रतीच्या निष्ठेने ‘जलशक्ती अभियान’ राबविले. पावणेदोन कोटी लिटर पाणी साठवणार्‍या बंधार्‍यांची ‘जलशक्ती’ अभियानांतर्गत निर्मिती करण्यात आली. विहिगाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल होते. विहिगाव पाण्याच्यादृष्टिने स्वयंपूर्ण करून अशाच पद्धतीचे अभियान इतर गावांमध्ये परिसरनिहाय अनुकूलता लक्षात घेऊन राबविण्याचा मंडळाचा विचार आहे. शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असणार्‍या प्रकल्पांबरोबरच शहरातील सेवावस्तीमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांकरिता देखील मंडळाने २०१३ मध्ये काम सुरु केले. त्या अंतर्गत जिल्हा परिषद आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण चार शाळांमधून मंडळाचा ‘नालंदा शैक्षणिक प्रकल्प’ राबविण्यात येतो. विवेकानंदांना अपेक्षित असणारा ‘पूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे नेणारा विकास’ हेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पांतर्गत दर शनिवारी या शाळांमध्ये विविध विषयांवर आधारित सत्रांचे आयोजन करण्यात येते. गणित, विज्ञान, भाषा तसेच भारतीय इतिहास, आपला परिसर, समाज यावर आधारित सत्र, उपक्रम आणि खेळ यांच्या माध्यमातून बौद्धिक गुणांबरोबरच त्यांच्या मनोगुणांचा विकास घडविण्याचा प्रयत्न केला जातो. वर्षानुवर्षे ज्यांच्या घरापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचलीच नाही त्यांच्यापर्यंत ‘चलो जलाये दीप वहॉं, जहॉं अभी भी अंधेरा है...’ असे म्हणत मंडळाचे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सेवा मंडळाचे कार्य राज्यभर पोहचले असून, ते प्रेरक ठरत आहे.
 
 
 - चेतन बोंद्रे