न्यायपालिकेचे काम योग्य पद्धतीने होत नाही - जस्टीस चेलामेश्वर
 महा एमटीबी  12-Jan-2018

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पत्रकार परिषदेत माहिती

नवी दिल्ली :
'देशाच्या न्यायपालिकेच्या कामकाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असून त्या योग्य वेळी थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा देशाच्या लोकशाहीला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो' असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टीस चेलामेश्वर यांनी केले आहे. देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेत अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशात सध्या चेलामेश्वर यांच्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा होत आहे.चेलामेश्वर यांच्या निवासस्थानी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला चेलामेश्वर यांच्यासह यावेळी जस्टीस गोगोई, जस्टीस लोकुर, जस्टीस कुरियन जोसेफ हे देखील यावेळी उपस्थित होते. परिषदेला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पत्रकारांचे आभार व्यक्त करत, 'आमचे बोलणे सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी धन्यवाद' असे ते म्हणाले. तसेच कोणत्याही देशाच्या इतिहासामध्ये अशा घटना पहिल्यांदाच घडत, सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश एकत्रपणे पत्रकार परिषद घेत आहेत. परंतु न्यायालयामध्ये अशा काही घटना घडत आहेत, ज्या योग्य नसून त्यांच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा देशाच्या लोकशाहीला याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो' असे चेलामेश्वर यांनी म्हटले.याचबरोबर न्यायालयात घडत असलेल्या या घटनांची माहिती सरन्यायाधीशांना देखील देण्यात आली होती, परंतु त्यांनी याकडे कानाडोळा त्यावर कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे आम्हा सर्वांना जनतेसमोर येऊन ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. कारण भविष्यात 'आम्ही सर्वानी आपले इमान विकले होते' असा आरोप कोणीही आम्हावर करू नये' असे ते म्हणाले. तसेच सरन्यायाधीशांना या संबंधी लिहिण्यात आलेले पत्र देखील येत्या काही दिवसामध्ये जनतेसमोर आणले जाईल, असे ते म्हणाले.

हा जनतेचा निर्णय

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात होत असलेल्या या गोंधळासाठी सरन्यायाधीशांना जबाबदार धरून त्यांच्यावर महाभियोग भरवला जावा का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असताना, हा संपूर्णपणे जनतेच्या निर्णय असून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण केली आहे, असे या न्यायाधीशांनी यावेळी म्हटले. .