बदलत्या युवकांपुढची बदलती आव्हाने...
 महा एमटीबी  12-Jan-2018
 
 
आजचे युग झपाट्याने बदलत जाणारे युग म्हणून ओळखले जाते. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. अशा या स्पर्धात्मक परिस्थितीत आजच्या युवकांपुढे येणारी आव्हानेसुद्धा बदलत आहेत. आजच्या युवकास शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, रोजगाराच्या अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. जागतिकीकरणाच्या या रेट्यात येणारी आव्हाने ही अधिक मोठी आहेत. या आव्हानांचा सामना करतांना युवकांना शांतपणे आपली क्षमता ओळखत कार्य करणे आवश्यक आहे.
आज अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. जी बाब आधी छंद म्हणून जोपासली जात होती त्यातही उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण होतांना दिसतात. युवक शिक्षण घेतो वेगळे व आपले करियर करतो वेगळ्याच क्षेत्रात. अर्थात, त्याच्या शिक्षणाचा आणि त्याने मिळविलेल्या रोजगाराचा संबंधच राहत नाही. यात उदाहरण द्यायचे झाले तर इंजिनिअरिंगची पदवी मिळविलेला युवक व्यवस्थापनशास्त्रात आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतो आणि त्या बळावर नोकरी मिळवितो. या नोकरीत त्याने मिळविलेल्या पदवीचा संबंध राहत नाही. अशी अनेक उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. अशा युवकांबाबत चिंतन केले असता एक दिसून आले कि, या युवकांनी सुरुवातीचे शिक्षण (अर्थात १० वी नंतरचे) आपापल्या आनंदानुसार, व्यक्तित्त्वानुसार, आपल्यातील गुणांचा विचार न करता निवडलेले दिसून येते. यावेळी पालकांचे सामाजिक स्थान, पारिवारिक इच्छा, समोर असलेले आदर्श, इ. घटक युवकांच्या धेय्य निवडीवर परिणाम करतांना दिसतात. या सर्वांमुळे युवकास उत्तम आर्थिक स्त्रोताचा रोजगार मिळाला तरीही तो किंवा ती आनंदी नसतो/नसते. ज्या रोजगारामध्ये आनंद नसतो तो रोजगार किंवा करियर एका नवीन आव्हानाला जन्म देतो. ते आव्हान म्हणजे मानसिक अस्वास्थ्याचे किंवा आजाराचे.
 
 
 
आजच्या युवकांपुढे स्थिर मानसिकता ठेवण्याचे आव्हान अधिक दिसते. या संघर्षमय आयुष्यात त्याला किंवा तिला वेळोवेळी विविध संघर्षांना सामोरे जावे लागते. म्हणजे परीक्षेत अधिक मार्क मिळालेच पाहिजे यासाठीचा संघर्ष आणि ते नाही मिळाले तर येणारी परिस्थिती टाळण्याचे किंवा हाताळण्याचे आव्हान, उत्तम आर्थिक स्त्रोत व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या रोजगाराची निवड करण्याचे आव्हान, त्यामुळे होणारा मानसिक संघर्ष आणि तसे न झाल्यास पुढे कोणता पर्याय निवडायचा याचे आव्हान अशा नानाविध संघर्ष आणि आव्हानांमुळे तरुणांचे मानसिक स्वास्थ्य दिवसेंदिवस अधिकच खालावत जाते. यामुळे तरुण-तरुणी नैराश्येच्या गर्तेत अडकत जातात, ते अधिक चिडखोर किंवा एकलकोंडे होत जातात. अशा परिस्थितीपासून मुक्त होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी आपली जीवनयात्रा संपविण्याचे ठरवून मोकळे होतात. परंतु हा काही संघर्ष, आव्हाने संपविण्याचा मार्ग नाही. या सर्वांत जे संघर्षाचा आनंद घेतात ते कोणतेही आव्हान पेलण्याची धमक ठेवतात. समाज, मित्रपरिवार काय म्हणेल यापेक्षा मी जे करतो आहे हे योग्य आहे का? यातून मला काय मिळेल?, मला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे? मी हे कसे करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे एखादे कार्य सुरु करण्यापूर्वी, धेय ठरविण्याआधी परिवाराच्या व मार्गदर्शकांच्या सल्ल्याने मिळविली तर भविष्यात येणार्‍या आव्हानांना पेलण्यासाठी आपण सज्ज असतो, हे मात्र नक्की. यासाठी स्वामी विवेकानंदांचे पुढील वाक्य तरुण-तरुणींनी आपल्या मनाशी कायम ठेवणे आवश्यक ठरते....
उठा, जागे व्हा, आपले ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका....
 
                                                                                                                                                                                    प्रमुख,
संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग,
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव