तंत्रज्ञानाच्या युगात गगन भरारी
 महा एमटीबी  12-Jan-2018

 
 
लेखाच्या शिर्षकातच तीन तरुण व्यक्त होतात, ते म्हणजे मागील शतकातील युवक, आजच्या वर्तमान युगातील या पिढीचा युवक आणि भविष्यातील युवक. खरे पाहिले तर युवक ह्या शब्दातून व्यक्त होते, ते सळसळते तारुण्य जोशपूर्ण जीवन, स्वप्नांच्या आशा, अपेक्षा, जिद्द असलेले, धाडसी, धडपडणारे, अखंड प्रयत्नवादी तरुण युवक म्हटले की त्यात युवतीही आहेतच. दोन्ही समांतर आयुष्य, अहोरात्र धावणारे.
 
जीवन म्हटले की, सतत बदल आलेच. मग ह्या प्रभावाने युवक-युवतींचे जीवन उजळणारी क्षेत्रे दिसतात. कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सिनेजगत, क्रीडाजगत, सोशल मीडिया, टी.व्ही.जगत, सांस्कृतिक क्षेत्र या आणि अशा अन्य ठळक क्षेत्रांचा प्रभाव युवकांवर होत असतो.
 
 
आजचा युवक भारावलेला, गोंधळलेला, दबलेला, कोमेजलेला अजिबात नाही. त्याच्या नजरेत काहीशी बेफिकिरी, बेपर्वा वृत्ती, जाण नसलेली वृत्ती दिसून येते. कदाचित ‘हम दो, हमारे दो’ ह्या संस्कृतीचा विभक्त कुटुंबाचा प्रभाव ह्या तरुणांवर जास्त असावा. त्यामुळे अनेकांपेक्षा स्वत:कडे पाहण्याचाही बदल दिसतो. त्यांच्यासमोर विविध जिवंत आदर्श आहेत. म्हणून कदाचित त्यांना मागील काही जीवनानुभवांशी, जीवनमुल्यांशी जुळवून घेता येत नाही. नव्हे, त्यांना ती मूल्ये मिळालीच नाही. वारसा हक्काने इतर अनेक बाबींमुळे ही असू शकेल! त्यामुळे त्यांची स्वप्ने अफाट आहे. गगनभरारी अवश्य आहे, पण त्यातील कौशल्य, पोहचणे, तेेेथे टिकून राहणे हे अजून त्यांच्यात आलेले नाही.
 
 
 
सामाजिकदृष्ट्या तरुण खरंच खूपच बदलत आहे. जातीच्या नावाने राजकारण, अर्थकारण, समाजकारण अशा ठिकाणी तो भरडला जात आहे. असे असले तरी जाती-पातींच्या भिंतीपलिकडे जावून तो विवाह संस्थेला आव्हाने देत नवीन पायंडा पाडत आहे. सहजीवन, एकटेपण, व्यवसाय बदल असे तो मोठे बदल सहज स्वीकारत आहे. आजचा युवक आर्थिक बाजूवर खंबीरपणे विचार करणारा आहे. त्याला त्याची जास्त किंमत मिळवायची आहे. त्यामुळे नेहमीचे चाकोरीबद्ध नोकरी जीवन त्याने नाकारले आहे. जेथे पैसा, पद, प्रतिष्ठा व क्षमता विकसित करता येईल तिकडे त्याची धाव वाढते आहे. हा बदल सगळीकडे, सर्व क्षेत्रात दिसतो आहे.
 
 
तंत्रज्ञानाच्या युगात त्याने बरीच मजल मारली आहे. स्मार्ट फोनने त्याचा ‘स्मार्ट’ बदल ही घडवून आणला आहे. त्या बळावर त्याने आपले संपूर्ण जीवन बदलले आहे. शिक्षण, रोजगार, व्यवसाय, शेती, ह्या क्षेत्रांची बरीच माहिती मिळवून युवक स्वत: व इतरांनाही प्रभावीपणे दिशा दाखवण्याचे काम करीत आहे.
 
 
शहरी विभागातील तरुण हा ग्रामीण तरुणांच्या तुलनेत सरस आहे. कारण त्यांना मिळणारे तंत्रज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवणारे, प्रयोगाचे ठरणारे आहे. त्याऐवजी ग्रामीण भागात आधुनिकतेचा स्पर्श आहे पण सर्वार्थाने नाही. त्यामुळे ग्रामीण तरुण काहीसा मागे आहे. 
काही टक्क्यातील या ग्रामीण तरुणांना संधी मिळते, पण बरेच तरुण अजूनही प्रतीक्षेत आहेत.
 
 
हा आजचा बदलता तरुण काहीसा बेरोजगार, सुशिक्षित, बहुशिक्षित, अल्पशिक्षित, अशिक्षित असूनही काळावर, समस्यांवर, अडचणींच्या डोंगरावर चढाई करुन जगत आहे. आत्महत्त्या, हत्त्या, अपघात ह्यातही भरडल्या जाणार्‍या युवकांच्या टक्केवारीत वाढ होतांना दिसते आहे.
 
 
व्यसनांच्या खोलखोल दरीत आजचा तरुण पडतानाही दिसतो. सायबर गुन्हे, इत्यादी ठिकाणीही जाताना हाच तरुण दिसतो. नवनवीन व्यसनांच्या विळख्यात पडणारा, ती वाढवणारा आणि तेथून निघणाराही आजचा बदलता युवक दिसतो. आर्थिक बाजूवर खंबीरपणे विचार करणारा आजचा युवक आहे. त्याला जास्त किंमत मिळवायची आहे. त्यामुळे नेहमीचे चाकोरीबद्ध नोकरी जीवन त्याने नाकारले आहे. आणि जिथे पैसा, पद, प्रतिष्ठा व क्षमता विकासाला अधिक संधी मिळेल त्याकडे त्याची धाव वाढते आहे. हा बदल सगळीकडे सर्व क्षेत्रात दिसतो आहे.
 
 
तंत्रज्ञानाच्या युगात त्याने बरीच मजल मारली आहे. स्मार्ट फोनने त्याच्यात ‘स्मार्ट’बदल घडवून आणला आहे. त्या बळावर त्याने आपले संपूर्ण जीवन बदलले आहे. शिक्षण, रोजगार, व्यवसाय, शेतीबाबत बरीच माहिती मिळवून युवक स्वत: इतरांनाही प्रभावीपणे दिशा दाखवण्याचे काम करत आहे.
 
 
एकूणच वेगवान युगातील जगाशी स्पर्धा करणारा, अडचणींना मात देणारा आजचा अस्सल भारतीय तरूण तेजस्वी, ओजस्वी, प्रेरणादायी, उत्साही, जिवंत, कीर्तीवंत, बुद्धिवंत राहील अशी आशा आहे. 
 
 प्रा.अंजली उत्तम पवार