राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका महत्त्वाची
 महा एमटीबी  12-Jan-2018
 
‘युवक’ ह्या शब्दातच प्रचंड क्षमता आहे. पण त्यासोबतच तर्कशक्ती, बुद्धी तसेच काहीही करण्याची धमक ही फक्त युवावर्गात - अर्थात १२ ते २५ वयोगटातील मुलां-मुलींमध्ये तीव्रतेने दिसून येते.
 
 
आजचा युवक बदलला आहे. हे खरं आहे का? बदलला आहे पण का? बदलला म्हणजे नेमके काय? आजचा युवक भरकटला आहे. प्रत्येक देशातील नवयुवक हा राष्ट्रनिर्माणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यासाठी नवयुवक मानसिक आणि शारीरिकदृष्टयाही बलशाली असणे आवश्यक आहे. युवकांनी असे सक्षम होण्यासाठी चरित्र, नैतिक मूल्यांसह बौध्दिकता, अध्यात्मिक शक्ती ने परिपूणर्र् असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण एक स्वस्थ व विकसित राष्ट्राची कल्पना करु शकतो. 
 
 
 
आजच्या युवकाला राजकारणी फक्त आपल्या फायद्यासाठी वापरुन घेतात. त्यामुळे ते दिशाहिन होतात. बेरोजगारी समस्याही आहे. आर्थिक पाया भक्कम नाही. मागील पाच दशकांपासून शैक्षणिक विकासात पाहिजे तसा बदल नाही. आज पण शिक्षणाचे स्वरुप प्रयोगात्मक पध्दतीने कमीच आहे. शिक्षणात विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास प्रेरित करणे आवश्यक आहे.
 
 
 
कारण आज कितीतरी युवक उच्चशिक्षित असूनसुध्दा बेकारीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे हताशा, निराशा असंतोष युवावर्गात वाढत चालला आहे. कामांसाठी भ्रष्टाचारास सामोरे जावे लागते. शिक्षण पध्दतीत बदल आवश्यक आहे. प्रत्येकठिकाणी प्रवेश फक्त आणि फक्त गुणवत्तेवरच दिले पाहिजे, अन्यथा सुशिक्षित, सक्षम, आणि बलशाली युवक शिक्षण प्रणालीतील प्रवेशाच्या चुकीच्या पध्दतीने (आरक्षण) विदेशात स्थायिक होण्याचे प्रमाण वाढतच राहील.
 
 
 
युवकांसमोर आणि घराघरात आदर्श व्यक्तिमत्त्व पोहोचवणेच नाही तर रुजवणेही आवश्यक आहे. शिक्षक आणि अनुभवकौशल्य यांची सांगड आवश्यक आहे. तरुणांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर सुयोग्य पध्दतीने करायलाच हवा. स्वत:चा विकास स्वत: करणे आणि त्यासाठी लागणारे भांडवल शिक्षणातून उभे करणे गरजेचे आहे.
 
 
 
प्रत्येक तरुणाने आपल्या कर्तव्याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. विकासात सर्वांचा हातभार आवश्यक असतो. कर्तव्यपूर्तीला प्राधान्य देवून तन-मन-धन अर्पण केले पाहिजे. युवावर्गाकडे आव्हाने पेलण्याची ताकद निश्‍चितच आहे गरज आहे फक्त प्रबळ इच्छाशक्तीची...
 
 
 
तुला एवढे कसे कळत नाही...
फुलत्या वेलीचं वय नाही...!!
क्षितीज ज्यांचे सरले नाही...
त्यास कसलेच भय नाही...!!
युवकवर्ग आज निराशेतून आत्महत्त्येकडे वळतो आहे. वेळेआधीच या शक्तीला नष्ट होण्यापूर्वीच परमशक्तीत परिवर्तीत करणे आवश्यक आहे.
संघर्षाच्या आधीच हार मानलीस तू 
कर्तबगारी आधीच गमावलीस तू...!
जीवन हा संघर्ष आहे 
तोच नको म्हणतोस तू...!!
अरे जगण्याआधीच संपलाय तू....!!!
आज लिंगभेद विसरुन प्रत्येक मुला-मुलीला सन्मानाने जगवा, शिकवा आणि लक्षात घ्या की... पढोंगे तो बढोंगे...!