प्रेरणा प्रदर्शनात साकारणार गणेश चित्रांचा विश्वविक्रम
 महा एमटीबी  12-Jan-2018
 

 
 
नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या महिला विभागाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी १९ ते २१ जानेवारीपर्यंत सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या लक्षिका मंगल कार्यालयात ‘प्रेरणा प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नाशिकचे प्रसिद्ध रांगोळीकार नीलेश देशपांडे हे ६५० मिनिटांत गणेशाची १२५ विविध रुपे रांगोळीतून साकारुन विश्वविक्रम करणार आहेत.
 
विविध वस्त्रे, खाद्यपदार्थ, अलंकार, गृह सजावट, सौंदर्य प्रसाधने असणार आहेत. या प्रदर्शनातच चित्रकला, मोदक बनवणे, माझा बाप्पा, अथर्वशीर्ष पठण, यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी, फॅशन डिझाईन, मेंदी, मेकअप, सुलेखन व वारली पेटिंगवरही कार्यशाळा होणार आहे. त्याचप्रमाणे पतंग महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. मोफत नेत्रतपासणी, आरोग्य तपासणीसह महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 
दरवर्षी राज्यातील विविध शहरात ‘प्रेरणा प्रदर्शना’चे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे असून, त्यात ५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्यात महिला उद्योजकांचे बचतगट सदस्यांना आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्याची संधी देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सर्वांनी सहभाग घेऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे, शुभांगी तिरोडकर, योगिनी देशपांडे, दिपा चांगराणी, रोहिणी नायडू, डॉ. गायत्री फडे यांनी केले.
 
११ तासात १२५ रांगोळ्या
 
नाशिकचे रांगोळीकार नीलेश देशपांडे हे ६५० मिनिटांत गणेशाची १२५ विविध रुपे रांगोळीतून साकारुन विश्वविक्रम करणार आहेत. १९ तारखेला पहाटे पाचपासून या रांगोळीला सुरुवात होणार असून, ११ तासात १२५ रुपे रांगोळीत साकारली जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवास १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने गणेश जयंतीचे औचित्य साधून हा विश्वविक्रम केला जाणार आहे. त्याची नोंद जिनीयस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याअगोदर १११ रुपे साकारण्याचे रेकॉर्ड असून त्यासाठी वेळ मात्र जास्त लागला होता.