सशक्त भारतासाठी कलाम यांच्या विचारांचे बीजारोपण - प्रा. एस. आर. महाजन
 महा एमटीबी  12-Jan-2018
 

 
 
 
जगभरात आपल्या कर्तृत्त्वाने मिसाईल मॅन म्हणून ओेळख निर्माण करणारे तसेच लाखो तरुणांचे प्रेरणास्थान भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी स्थापन झालेल्या लीड इंडिया-२०२० फाऊंडेशनतर्फे जळगावसह देशभरातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये डॉ.कलाम यांच्या विचारांचे बीजारोपण करण्याचे कार्य सुरु आहे. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविर्‍यासाठी तरुणांमध्ये जागृती करण्याचा वसा या संस्थेने घेतला आहे.
 
डॉ. एन. बी. सुदर्शन आचार्य यांनी २०११ या जागतिक पातळीवरील सेवाभावी संस्थेची स्थापना केली. डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचारांचा प्रसार करुन तरुणांचे सशक्तीकरण करण्याचा संस्थेचा मुळ उद्देश आहे. कोणत्याही देशाच्या विकासात त्या देशातील तरुणांच्या ज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते. हेच सूत्र ओळखून ‘लीड इंडिया फाऊंडेशन’ २०११ पासून कार्य करीत आहे
 
लीड इंडिया फाऊंडेशनकडून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यात मुख्यत्वे महाविद्यालयीन तरुणांना व्याख्यानातून डॉ. कलामांच्या विचारांची ओळख करुन देणे, गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, डी. आर. डी. ओ. व इस्त्रो या जागतिक पातळीवरील भारतीय संस्थांची माहिती करुन देणे, शिक्षण, पर्यावरण, संवर्धनासह वाईट सवयींचा त्याग, स्वच्छता तसेच तरुणांनी फॅशन, पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या आहारी न जाता भारतीय संस्कृतीशी नाळ अधिक घट्ट जोपासण्यावर भर दिला जातो.
 
लीड इंडिया फाऊंडेशनच्या सदस्यांनी विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवर तांत्रिक व अतांत्रिक स्पर्धामध्ये आजवर तब्बल १,२९,०००/- रुपयांची बक्षीसे जिंकलेली आहेत. या बक्षीसाच्या रकमेतून सामाजिक कार्यास हातभार लावला आहे.
 
जळगावात २५ सदस्य
 
लीड इंडिया फाऊंडेशनचे जळगावात २५ सदस्य आहेत. त्यात प्रा. संदीप महाजन हे को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात. तरुणांप्रमाणे शेतकरी, गोरगरीब, मजूर, कामगारवर्गाचेही सशक्तीकरण व्हावे, अशी डॉ. अब्दुल कलाम यांची इच्छा होती. त्यानुसार संस्थेसाठी काम करणारे सदस्य तरुण, शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी सातत्याने निरनिराळे उपक्रम राबवत असतात. या उपक्रमांसाठी हे सर्व सदस्य एकत्र येतात. विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यानेही आयोजित केली जातात. उपक्रमासाठी लागणार्‍या खर्चाकरिता, ज्याला जेवढे योगदान देता येईल. तेवढे देऊन आर्थिक जमवाजमव केली जाते. शैक्षणिक संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींचेही संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.
 
समन्वयक, लीड इंडिया २०२० ग्रुप.
 
राष्ट्रीय पातळीवरही दखल
 
लीड इंडिया फाऊंडेशनच्या सदस्यांनी नुकतेच एकाचवेळी आंतरराष्ट्रीय परिषदेत ९ संशोधन पेपर्स (स्थापत्य अभियांत्रिकी) सादर करुन आपल्या कामाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटविलेला आहे. परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून इस्त्राईलचे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. एराच डॉईश्‍चर यांनी या संशोधनाचे विशेष कौतुक केले. तसेच भावी काळात संशोधनासाठी व्यक्तिश: मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन दिले.