प्रयोगशील शेतीतून मिळवली ‘वेगळी’ ओळख!
 महा एमटीबी  12-Jan-2018
  
 
पंचक येथील हेमचंद्र पाटील यांचे कृषी क्षेत्रात ‘करिअर’
घरात शैक्षणिक वातावरण, शिक्षणासाठी सर्व परिस्थिती अनुकूल आणि पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन एखादी व्यक्ती शेती करेल, असे जर कोणी सांगितले तर त्यावर आपला सहजासहजी विश्‍वास बसणार नाही. परंतु, विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेऊनही अत्यंत जोखमीचे क्षेत्र म्हणून दुर्लक्षित शेती क्षेत्राची करिअरसाठी निवड करून हेमचंद्र पाटील यांनी त्यात आज चांगला जम बसवला आहे. चोपडा तालुक्यातील पंचक हे त्यांचे मूळ गाव. प्रयोगशील शेतीने त्यांना आज वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. पंचकसारख्या छोट्याशा गावातील या युवा शेतकर्‍याने महासत्ता असलेल्या अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात ‘अन्नसुरक्षा’ विषयावर आपल्या भारताचे प्रतिनिधीत्व केले. प्रयोगशील शेतीनेच हा सन्मान मिळवून दिला, अशी कृतज्ञताही ते व्यक्त करतात. त्याविषयी...
पंचक येथील हेमचंद्र पाटील यांचे प्राथमिक शिक्षण झाले ते जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच. चौथीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या अडावदला ते गेले. महाविद्यालयीन शिक्षण चोपडा येथे झाले. त्यांचे वडील शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. अकरावीत त्यांनी विज्ञान शाखेची निवड केली. बी.एस्सीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे म्हणून त्यांनी जळगावातील मणियार विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. केले. घरची ४० एकर शेती. शिवाय हेमचंद्र हे एकुलते एक. त्यामुळे त्यांना वडिलांनी शेतीच करण्याचा सल्ला दिला. त्यांनाही तो पटला. ते शेतीकडे वळले. पूर्णवेळ शेती करण्याचा निश्‍चय केला. त्यांचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत. सुरुवातीला त्यांनीही तसेच केले. पण हवे तसे यश मिळत नव्हते. मात्र, काहीतरी वेगळे करण्याचा छंद असल्याने त्यांना स्वस्थ बसवत नव्हते. त्यांनी शेतीची पद्धत बदलली. सुरुवातीला सूक्ष्म सिंचनाचा वापर सुरू केला. टप्प्याटप्प्याने अत्याधुनिक यंत्रसामग्री, शेतीतील नवनवे तंत्रज्ञान याची सांगड घातली. वातावरणातील बदलांचा अभ्यास करून पीक पद्धती बदलली. तेव्हा अपेक्षित यश मिळत गेले. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करताना त्यांना एकरी (जिरायत) १० ते १५ हजार तर (बागायत) २५ ते ३० हजार एवढेच उत्पन्न मिळायचे. कापूस, ज्वारी इतर कडधान्य अशी पिके ते घेत. मात्र, हेमचंद्र जेव्हापासून प्रयोगशील शेती करायला लागले तेव्हा उत्पन्नाचा आलेख एकरी ७० ते ८० हजारांवर गेला. त्यांनी सर्व शेतीक्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणले आहे. शेडनेटसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानदेखील वापरले आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन भाजीपाला, फळे यांची लागवड केली. सध्या ते करार शेतीअंतर्गत कांद्याची लागवड करतात. टिश्यूकल्चर केळी व टिश्यूकल्चर डाळींब, ब्राझिलियन मोसंबीचेदेखील ते उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतीतून उत्पादित होणारा माल अन्य राज्यांसह दुसर्‍या देशांमध्येही निर्यात होतो. हळद, पपईचीदेखील ते लागवड करतात. सूक्ष्म सिंचनामुळे दोन्ही हंगामात त्यांना ७ ते ८ प्रकारची पिके घेणे सहज शक्य होते.
 
 
नवा दृष्टिकोन ठेवा
शेती हे जोखमीचे क्षेत्र असले तरी त्यात ही चांगले करिअर करता येऊ शकते, असा त्यांचा स्वानुभव आहे. त्यामुळे बरेच तरूण शेतीकडे वळत आहेत. तरुणांनी नवा दृष्टिकोन ठेवला, उपलब्ध विविध साधन-सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर त्यातून चांगले करिअर करता येऊ शकते. जी प्रतिष्ठा एखाद्या नोकरीतून मिळणार नाही, ती तुम्हाला शेती मिळवून देईल. मात्र, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. तरूणांनी सकारात्मक राहून ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असा कानमंत्रही हेमचंद्र पाटील देतात.
विदेशात जाण्याची संधी
शेतीत निरनिराळे प्रयोग राबवल्याने त्यांना यश मिळत गेले. प्रयोगशीलतेमुळे विदेशात जाण्याची संधीही मिळाली. ग्रामीण भागातील लहान शेतकरी कशाप्रकारे अन्नसुरक्षेसंदर्भात कार्य करतो, हे जाणून घेण्यासाठी जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या प्रयोगशील शेतकर्‍यांना अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठाने एका कार्यशाळेच्या माध्यमातून एकत्र आणले होते. ‘अन्नसुरक्षा’ हा कार्यशाळेचा विषय होता. करार शेती प्रकारात भारतातून या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी हेमचंद्र पाटील यांची निवड झाली होती. त्यांनी तेथे प्रयोगशील शेतीबाबत सादरीकरण केले. प्रयोगशील शेतीनेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली, असे ते अभिमानाने सांगतात...........