मुंबई-वडोदर्‍यादरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापेक्षाही मोठा महामार्ग
 महा एमटीबी  12-Jan-2018

नितीन गडकरींची घोषणा, २० हजार कोटींचा प्रकल्प

 
 
 
 
 
ठाणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) पेक्षाही मोठा असा द्रुतगती महामार्ग वडोदरा ते मुंबई दरम्यान लवकरच बांधण्यात येणार असून यासाठी २० हजार कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. येत्या ३ महिन्यांतच यासाठी आवश्यक भूसंपादनाची कामेही सुरू होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी याबाबत घोषणा केली.
 
वर्सोवा खाडीवर नव्या चौपदरी पुलाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील इतर ७ रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मिरा रोड येथे झाले, त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ठाणे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच खासदार चिंतामण वनगा, कपिल पाटील, गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता, रवींद्र फाटक, हितेंद्र ठाकूर, संजय केळकर, क्षितिज ठाकूर तसेच महापौर डिंपल मेहता यांचीही उपस्थिती होती.
 
नितीन गडकरी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली न्हावा शेवा-शिवडी, समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टलरोड सारखे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील. येत्या दोन वर्षांत १० हजार सी प्लेन्स आणण्याची घोषणा करतानाच सागरी जेट्टी, आणि पोर्ट यांना मंजुर्‍या देण्याची घोषणाही त्यांनी केली. वसई-विरार भागात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्यामुळे जेएनपीटीतील मोठ्या कंटेनर्सच्या वाहतुकीचा त्रास कमी होईल, असेही प्रतिपादन गडकरी यांनी केले.
 
नवा खाडीपूल १८ महिन्यांत पूर्ण करणार- मुख्यमंत्री
 
वर्सोवा येथील नवा खाडी पूल १८ महिन्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा करतानाच गेल्या ७० वर्षांत राज्यात ५ हजार किमीचे रस्ते होते मात्र गडकरी मंत्री झाल्यापासून २० हजार किमी महामार्गाना मंजुरी मिळाली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, २२ किमीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण करणार असून हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात पाणी, जमीन, वायू आणि पाताळ अशा सर्वच ठिकाणी तब्बल १ लाख कोटी रुपयांची पायभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे एक एकात्मिक वाहतूक प्रणाली निर्माण होऊन मुंबई तसेच महानगर प्रदेशातील सर्व उप नगरांना त्याचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.