’समर्पणा’ ची कथा
 महा एमटीबी  12-Jan-2018
 

 
शाळेत शिकत असताना इयत्ता आठवी ते दहावी या तीनही वर्षी वर्गशिक्षकांच्या प्रेरणेने आमच्या वर्गाचे एक हस्तलिखित ’ज्ञानदीप’ या नावाने आम्ही प्रकाशित केले होते. स्वरचित कविता, कथा, लेख, विनोद, कोडी, मुलाखती अशा विविध साहित्यप्रकारांची रेलचेल ’ज्ञानदीप’मध्ये होती. चांगले हस्ताक्षर असलेल्या काही निवडक मुलांचा समावेश ज्ञानदीपच्या ’संपादक मंडळा’मध्ये केला गेलेला होता. सुदैवाने या मंडळाचा सदस्य होण्याचे भाग्य तीनही वर्षी मला लाभले होते. एकंदरीत भावविश्व समृद्ध करणारा हा अनुभव होता. काळ पुढे जात राहिला. कोणे एके काळी अशा प्रकारचे काम आपण केले होते या गोष्टीचे विस्मरण व्हावे इतपत निराळ्या कार्यक्षेत्रात पुढे प्रदीर्घ काळ मी काम करत होतो. संपादक मंडळात केलेले काम आपल्याला पुन्हा एकदा करावे लागेल, अशी जराही शक्यता नसताना अचानकपणे तसेच काम दत्त म्हणून माझ्यापुढे उभे ठाकले, ते जनकल्याण रक्तपेढीमध्ये कामाला सुरुवात झाल्यानंतर.
 
त्याचे झाले असे, २०१२ साली रक्तपेढीत रुजू झाल्यानंतर जी अनेक कामे माझ्या कार्यपत्रिकेत होती त्यात आणखी एका वेगळ्या कामाची भर एके दिवशी रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी घातली. ते मला म्हणाले, ’आपण मागल्या वर्षीपासून रक्तपेढीचा एक वार्षिक वृत्तांत प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्या कामाकडे आता तू लक्ष दे.’ अर्थात त्यांनी मला या क्षेत्रातला अनुभव विचारला नाही ते मात्र बरेच झाले. नाहीतर शाळेतल्या ज्ञानदीप हस्तलिखिताव्यतिरिक्त सांगण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते. पण हे काम माझ्या आवडीचे होते, हे मात्र नक्की. शिवाय माझ्याकडे असलेल्या ’जनसंपर्क’ या खात्यालाही बरेचसे पूरक असलेले हे काम होते. कारण बऱ्याच जणांच्या भेटीगाठी यासाठी कराव्या लागणार होत्या. या अंकात लेखन करणारे लेखक, जाहिरातदार, मुद्रक, डिजायनर या सर्वांशी संवाद यानिमित्ताने होणार होता.
 
संवादाच्या या प्रवासादरम्यान माझी पहिली आणि महत्वाची ओळख झाली ती, या वार्षिक वृत्तांतांच्या संपादक सौ. विद्याताई देशपांडे यांची. वाडिया महाविद्यालयात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका म्हणून दीर्घकाळ काम केलेल्या विद्याताई सध्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. मुख्य म्हणजे जनकल्याण रक्तपेढीच्या स्थापनेपासून सातत्याने त्या रक्तपेढीच्या सामाजिक उपक्रमांशी संलग्न राहिलेल्या आहेत. ओळख झाल्या दिवसापासून ते आजतागायत विद्याताईंची प्रत्येक भेट एक नवीन ऊर्जा देऊन जाते, हा माझा स्वत:चा अनुभव आहे. प्रगाढ विद्वत्ता, समाजस्थितीचं अचूक भान, अत्यंत सुसंस्कृत वाणी आणि सदाहरित व्यक्तिमत्व लाभलेल्या विद्याताईंनी रक्तपेढीच्या वार्षिक वृत्तांताच्या संपादनाचं काम ’घरचंच काम’ म्हणून स्वीकारलं होतं आणि आता या उपक्रमात त्यांच्यासह मी काम करावे असे मला सांगण्यात आले होते. ही माझ्यासाठी खरोखरीच खूप समाधानाची बाब होती. आपल्याकडे आलेल्या सामुग्रीवर संपादकीय संस्कार कसे करायचे असतात, शब्दांचे वजन म्हणजे काय असते, समानार्थीच असले तरी त्यातील कोणते शब्द कुठे वापरले गेले पाहिजेत अशा अनेक गोष्टी विद्याताईंकडुन मला सहजपणे शिकायला मिळाल्या.
 
रक्तपेढीचे वर्षभरातील विशेष उपक्रम, रक्तदान शिबिरे, रक्तसंकलन इ. ची आकडेवारी, काही विशेष अनुभव आणि संबंधित अद्ययावत माहिती आणि ज्ञान या सर्व गोष्टी लिखित स्वरुपात संकलित व्हाव्यात आणि त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात याच हेतुने ’वार्षिक वृत्तांताचा’ हा उपक्रम सुरु झाला होता. या अंकामधील साहित्यासंबंधी सर्व अधिकारी, विश्वस्त आणि सेवाव्रती मंडळी यांनी एकत्र बसुन विचार करण्याचा एक चांगला पायंडा आधीपासूनच पडलेला होता. यामुळे अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचा समावेश या अंकांमधून होत गेला. या अंकाचे काहीतरी नाव असावे, असा विचार या तिसऱ्या अंकाच्या वेळी पुढे आला. या विचाराबरोबरच काही नावांचे पर्यायही आले. तेव्हा हे नाव ठरवतानाही अगदी लोकशाही पद्धतीने या नावांसाठी मतदान घेतले गेले आणि बहुमताने या अंकाचे ’समर्पण’ हे नाव निश्चित झाले.
 
रक्तपेढीशी संबंधित काही अनुभव, ज्ञान आणि आकडेवारीबरोबरच आम्ही अन्यही काही निराळ्या गोष्टींचा अंतर्भाव समर्पण’मध्ये करण्यास सुरुवात केली. जसे, शिरवळ, फ़लटण, वाई, शिरूर अशा ग्रामीण भागात चालणाऱ्या रक्तसाठवणूक केंद्रांचे काम तेथील डॉक्टरांच्या मुलाखतींच्या माध्यमातून ’समर्पण’मध्ये समाविष्ट होऊ लागले. याबरोबरच रक्तपेढी सोडुन अन्य कुठल्यातरी सामाजिक प्रकल्पाविषयीची माहितीही आम्ही सर्वांसाठी द्यायला सुरुवात केली. माझ्या दृष्टीने ’समर्पण’ची वैचारिक उंची खऱ्या अर्थाने वाढविणारे या अंकातील सदर म्हणजे ’अतिथी संपादकीय.’ रक्तपेढीशी थेट संबंध नसलेल्या आणि वैद्यकीय अथवा सामाजिक क्षेत्रात अजोड स्थान मिळवलेल्या काही मान्यवरांना रक्तपेढीच्या अनुषंगाने आपले मनोगत मांडण्यासाठी आम्ही निमंत्रित केले आणि ’समर्पण’ची एक उज्वल परंपरा या निमित्ताने चालु झाली. रक्तपेढीचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ स्थापत्य अभियंता कै. श्री. आप्पासाहेब वज्रम, विवेकानंद रुग्णालय, लातूर’चे संस्थापक आणि ज्येष्ठ संघकार्यकर्ते डॉ. अशोकराव कुकडे, संघाचे अ. भा. संपर्क प्रमुख आणि बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. अनिरुद्ध देशपांडे, श्वेता असोसिएशनच्या संस्थापिका आणि आय.एम.ए.च्या तत्कालिन अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे, सुविख्यात ग्रंथीविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. श्रीरंग गोडबोले, संचेती रुग्णालयाचे संचालक आणि ज्येष्ठ अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप रावत आणि सुविख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही आजवरच्या अतिथी संपादकांची नुसती नावे पाहिली तरी वर उल्लेखिलेल्या ’वैचारिक उंची’चा अंदाज यावा. ’समर्पण’च्या निमित्ताने अशा मान्यवरांशी जवळून संवाद साधता आला, ही केवढी भाग्याची गोष्ट. याव्यतिरिक्त ’समर्पण’मधील लेखांच्या निमित्तानेही अनेक डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी उत्तम मैत्र जुळुन आले. इतकंच नाही तर जाहिरातींच्या माध्यमातून ’समर्पण’साठी आर्थिक योगदान देणाऱ्या जाहिरातदारांचंही ’जनकल्याण’शी किती उत्कट नातं आहे, हेही यानिमित्ताने मी नित्य अनुभवत असतो.
 
 

 
 
हे झालं ’समर्पण’च्या कंटेंटविषयी. पण ’समर्पण’ला देखण्या रुपात सिद्ध करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे, किंबहुना ज्यांच्या आपुलकीयुक्त कामामुळेच ’समर्पण’ चे अंक नित्य देखण्या स्वरुपात येत राहिले आहेत, त्या गणेश ऑफ़सेटच्या डॉ. गिरीश दात्ये, श्री. हरीश घाटपांडे आणि मुखपृष्ठ / मलपृष्ठाचे रचनाकार श्री. सागर नेने यांच्याबद्दल स्वतंत्र लेख लिहिता येऊ शकेल इतकं छान ट्युनिंग आमचं जमलेलं आहे. ही सर्वच मंडळी ’जनकल्याण रक्तपेढी’चं काम म्हणजे आपल्या घरातलं काम आहे याच भावनेने या उपक्रमात सहभागी असतात.
 
मी ’समर्पण’चं काम करायला सुरुवात केली त्यावेळचा एक प्रसंग मला आठवतो. माझ्याकडे आलेले हे नवीनच काम असल्यामुळे साहजिकच मी यासाठी भरपूरच पळापळ केली होती. म्हणूनच या अंकाच्या प्रकाशनाबाबत मी प्रचंड उत्सुक होतो. जून महिन्यामध्ये हे ’समर्पण’ प्रकाशित होणार होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जेव्हा आम्ही सर्वजण बसलो तेव्हा बैठकीच्या सुरुवातीलाच माझ्या बोलण्यात ’समर्पण प्रकाशन कार्यक्रमाचे नियोजन आपल्याला करायचे आहे’ असं काहीसं वाक्य आलं. तत्क्षणी ते वाक्य तोडत डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ’आपण एक लक्षात घेऊ या. हा कार्यक्रम प्रकाशनाचा नसून आपल्या दृष्टीने अधिक महत्वाच्या असलेल्या ’रक्तदाता मेळाव्या’मध्ये आपण ’समर्पण’चे प्रकाशन करीत आहोत.’ या वाक्याने मी एकदम भानावर आलो. छोटेसेच पण अत्यंत मार्गदर्शक वाक्य डॉ. कुलकर्णींनी उच्चारले होते, ज्यामुळे ’समर्पण’सारखे उपक्रम महत्वाचे आहेतच पण अशा उपक्रमांचा नेमका उद्देश्य काय असावा याबाबतही सर्वांच्या कल्पना या वाक्यामुळे स्पष्ट झाल्या.
 
समर्पण’ प्रकाशनाच्या निमित्तानेही अनेक मान्यवरांबरोबर जनकल्याण रक्तपेढीचे मैत्र जुळुन आले. त्यात विद्यमान मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फ़डणवीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ चित्रपटदिग्दर्शक मा. श्री. राजदत्त, ज्येष्ठ अभिनेते श्री. श्रीकांतजी मोघे अशांचा समावेश आहे. समर्पण’चा एक वाचकवर्गही आता तयार झाला आहे. अनेकांकडुन चांगल्या प्रतिक्रिया येतात, सूचनाही येतात. जनकल्याण रक्तपेढी आणि समर्पण हे समीकरण आता तयार झाले आहे. स्वाभाविकच रक्तपेढीकडुन जशा अपेक्षा वाढताहेत, तशाच प्रमाणात ’समर्पण’कडुनही अपेक्षा केल्या जाऊ लागल्या आहेत आणि अर्थातच या अपेक्षांना पुरे पडण्यासाठी सर्व प्रकारचे परिश्रम रक्तपेढी घेत आहेच.
 
रक्तपेढी या सामाजिक प्रकल्पासंबंधी संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. श्रीपती शास्त्री यांनी मागे काही महत्वाची सूत्रे सांगितली होती. त्यातील “रक्तपेढीसारख्या संस्था केवळ रक्तसंक्रमणाचे केंद्र नाहीत तर विचार संक्रमणाचे केंद्र आहेत” हे सूत्र म्हणजे ’समर्पण’सारख्या उपक्रमांचे मध्यवर्ती सूत्र आहे असे म्हणायला हरकत नाही. उलट यात थोडी अधिक भर घालुन असे सांगता येईल की, समर्पण’व्दारे वैचारिक संक्रमण तर होत आहेच, परंतु ’रक्ताची नाती’ तयार करणारे आणि ते दृढ करणारे ’भावसंक्रमण’देखील यातून अनायासेच साध्य होत आहे. ’समर्पण’चे साफ़ल्य आहे ते हेच !
 
  
- महेंद्र वाघ