दहावी शिकलेला करोडपती उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018   
Total Views |
 
 
 
बिल गेट्स यांचं एक सुप्रसिद्ध वचन आहे- ‘‘तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात, हा तुमचा दोष नाही. पण, गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे.’’ हे सुप्रसिद्ध वचन कोल्हापूरच्या प्रदीपने तंतोतंत अंमलात आणले. अपुर्‍या आर्थिक परिस्थितीमुळे प्रदीपला शिकता आलं नाही. ज्यांच्यासोबत शिक्षण घेतलं, त्या मित्रांचे कपडे धुतले, त्यांच्या घरी दूधलाईन टाकली, पेपर टाकले. प्रचंड कष्ट घेतले. त्या जोरावर रिसॉर्ट घेतलं. बंगला बांधला. हा हा म्हणता कोटी रुपयांचे उलाढाल असणारा उद्योगसमूह उभा केला. हे सर्व करताना खिशात एक रुपया नव्हता. सोबत होती जिद्द, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी. परिस्थितीला शरण न जाण्याचा बाणा. या सगळ्यांमुळेच आज प्रदीप जाधव कोल्हापूरच्या हातकणंगले परिसरातील एक यशस्वी उद्योजक म्हणून परिचित आहेत.
 
कोल्हापूर जिल्हा म्हणजे खर्‍या अर्थाने शूर मावळ्यांचा जिल्हा. महाराजांसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत झुंजणारा आणि महाराज पोहोचल्याची खबर तोफेच्या आवाजाच्या रुपाने ऐकल्यानंतरच आपला जीव सोडणारा निष्ठावान बाजीप्रभू देशपांडे या सारख्या मावळ्यांचा हा जिल्हा. जिद्द, चिकाटी, शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती जणू कोल्हापूरकरांच्या रक्तातच भिनलेली. असाच एक कोल्हापूरकर म्हणजे प्रदीप जाधव. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये भादोले नावाचं एक टोलेजंग गाव आहे. या गावात प्रदीप आई-बाबा आणि भाऊ- बहिणींसह राहत होता. प्रदीपचे बाबा शाहू मिलमध्ये नोकरीस होते. प्रदीप जय शिवराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत शिक्षण घेत होता. आधीच आर्थिक परिस्थिती नीट नसल्याने शिकणे म्हणजे जणू एक चंगळच होती. दहावी पूर्ण केल्यानंतर मात्र प्रदीपला घरासाठी पैसा कमाविणे ही शिकण्यापेक्षा महत्त्वाची बाब होती. त्याने दहावीनंतर शिक्षणाला राम-राम केला.
 
प्रदीपच्या दुर्दैवाचे दशावतार इथेच संपले नव्हते, तर प्रदीपचे बाबा काम करत असलेली शाहू मिल देखील बंद पडली. शाळेत असल्यापासूनच प्रदीप दूधलाईन, पेपरलाईन टाकून आपल्या कुटुंबाला आणि शिक्षणाला हातभार लावत होता. सोबतीला १० पैसे कमिशनवर विजेचं बीलसुद्धा तो वाटत असे. बाबांची नोकरी गेल्यानंतर काय करायचं? कसं जगायचं? हा मोठाच यक्षप्रश्‍न जाधव कुटुंबीयांसमोर होता. जाधव हे परीट समाजातले. त्यामुळे आपण आपलाच व्यवसाय का करु नये, हा विचार त्यांच्या मनात आला. कसेबसे गाठिशी जमलेले १५ हजार रुपये खर्च करुन त्यांनी कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या मागील भागात छोटंसं दुकान घेतलं. प्रदीप हॉस्टेलवर जाऊन शिकणार्‍या मुलांचे कपडे घेऊन येत असे. यातील काही विद्यार्थी हे प्रदीपसोबतचे एकेकाळचे सहाध्यायी. मात्र, लाज न बाळगता प्रदीप कपडे आणत असे. त्याची आई आणि बहीण तलावावर जाऊन कपडे धूत असत. धुवून इस्त्री केलेले कपडे परत देण्याचं आणि बील बनवण्याचं काम देखील प्रदीपच करायचा.
 
 
हळूहळू पॉप्युलर ड्रायक्लिनिंग या प्रदीपच्या दुकानाचा जोर बसला. आई घराला हातभार म्हणून मिरच्या कांडण्याचा व्यवसाय करु लागली. १९९८ साली प्रदीपने जोडधंदा म्हणून रिअल इस्टेटचा बिझनेस सुरु केला. कोणाला घर हवंय, जागा हवीय, शेती पाहिजे तर एक विश्‍वसनीय नाव म्हणजे प्रदीप जाधव अशी प्रदीप जाधव यांची ओळख निर्माण झाली. वडिलांना नोकरी गेल्यानंतर १ लाख ७५ हजार रुपये मिळाले होते. त्यातील ७५ हजार रुपये बहिणीच्या आजारपणासाठी खर्च झाले, उरलेले एक लाख रुपये आणि अर्बन बँकेचे घेतलेले कर्ज या जोरावर प्रदीप जाधव यांनी अंबाघाटात ‘वनविसावा’ नावाचे रिसॉर्ट सुरु केले. या रिसॉर्टला पर्यटकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. हॉटेल इंडस्ट्रीसारख्या नवख्या क्षेत्रात पाऊल ठेऊन मिळालेलं यश स्फूर्ती देणारं ठरलं. याच यशाच्या बळावर विशालगडाच्या पायथ्याशी ‘शिव-सह्याद्री’ नावाने ते नवीन रिसॉर्ट लवकरच सुरु करणार आहेत.
 
 
आज प्रदीप जाधव यांची ‘पॉप्युलर ड्रायक्लिनिंग’ लॉंड्री नवीन वास्तूत दिमाखात उभी आहे. ‘समर्थ एजन्सी’ अंतर्गत रिअल इस्टेटचा व्यवहार होतो. ‘समर्थ डेव्हलपमेंट’मध्ये जमिनीचे प्लॉट्स तयार करुन विकले जातात. ‘समर्थ अर्थमुव्हींग’ या कंपनीच्या अधिपत्याखाली दोन ट्रक आणि जेसीबी मशिन्स चालविल्या जातात. आज प्रदीप जाधव यांच्याकडे ४०च्यावर कामगार कार्यरत आहेत. काही कोटी रुपयांची उलाढाल आज त्यांचा उद्योगसमूह करत आहे.
 
गरीब परिस्थितीतून स्वकर्तृत्वाने वर आलेल्या प्रदीप जाधवांना परिस्थितीची जाण आहे. या जाणिवेतूनच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असणार्‍या अनेक कुपोषित मुलांना पोषक आहार जाधव पुरवितात. गरीब आणि गरजू रुग्णांच्या खर्चिक शस्त्रक्रियेसाठी त्यांनी अर्थसाहाय्य केले आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून त्यांनी काही महिलांना शिलाई मशिनचे वाटप देखील केले आहे.
 
 
आज एखाद्या मराठी तरुणाला उद्योग करण्याचा सल्ला दिला तर तो म्हणतो, ‘‘भांडवल पाहिजे, उद्योग चालविण्याचं कौशल्य पाहिजे. त्या क्षेत्रातील कोणीतरी गॉडफादर पाहिजे. अपयश आलं तर?’’ अशा अनेक शंकाकुशंका त्याच्या मनात फेर्‍या घालत असतात. त्यामुळे पाऊल न उचलताच तो एखादी नोकरी पकडतो आणि आयुष्यभर नोकरीच्याच फेर्‍यात अडकून बिल गेट्सच्या वाक्यातील आयुष्यभरासाठी दोषी होतो. खरंतर आजच्या या लेखाचा मूळ उद्देश निव्वळ प्रदीप जाधवांचा उद्योजकीय प्रवास उलगडणे एवढाच नव्हता, तर मराठी तरुणाने निव्वळ एसएससीपर्यंत शिक्षण होऊन सुद्धा कोटी रुपयांची उलाढाल करणार्‍या प्रदीप जाधवांसारख्या तरुणांचा आदर्श घेऊन व्यवसायाकडे वळावे हा उद्देश होता. नवीन वर्षात हा उद्देश सफल होईल, अशी आशा आहे.
 
 
 
- प्रमोद सावंत 
 
@@AUTHORINFO_V1@@