जामनेरमधून थेट काश्मीर खोर्‍यात...
 महा एमटीबी  12-Jan-2018
 

 
 
 
जळगाव जिल्ह्यातील टाकरखेड्यासारख्या (ता.जामनेर) छोट्याशा गावातून अभाविपचे पूर्णवेळ काम करण्यासाठी काश्मीर खोऱ्यात गेलेल्या मयूर पाटील यांच्याशी ‘महा एमटीबी’ने युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद
 
मयूरची आई गृहिणी तर वडील शेतकरी. वारकरी संप्रदायामुळे घरात अध्यात्मिक वातावरण. धारिवाल महाविद्यालयात एफ.वाय.बी.एस्सी.ला असताना अभाविपच्या कार्यामध्ये सक्रिय झाला. त्याच्यातील क्षमता बघून त्याला जामनेर तालुका प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. तालुक्यातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्याने शुल्कवाढ, शिष्यवृत्ती, इमारत फंड आदीसाठी आंदोलन करून यशही मिळविले. अभाविपच्या कार्यविस्तारासाठी शाखाही स्थापन केल्या. २०१० मध्ये मुंबईला झालेल्या मोर्चामध्ये जामनेर तालुक्याचे नेतृत्व केल्यामुळे परिषदेमधील मित्रमंडळींसोबत ओळखही वाढली. मुंबईहून परतल्यावर जिल्ह्याच्या कार्यात तो सहभागी झाला. त्यावेळचे विभाग संघटनमंत्री संदीप पिसके आणि शैलेंद्र दळवी यांच्या संपर्कात आला. अभाविपच्या प्रदेश कार्यकारिणीतही त्याची निवड झाली.
 

सर्वांनाच वाटले आश्चर्य
 
घरी परतल्यावर आई - वडिलांजवळ माझी इच्छा व्यक्त केल्यावर त्यांनी खूप समजावले. परिवारातील काही ज्येष्ठ सहकार्यांनीही घरच्यांची समजूत घालून सांगितले की, आपला मुलगा अभाविपच्या कार्यासाठी काश्मीरला जातो आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. २ ऑगस्ट, २०१३ रोजी मी काश्मीरला जाण्यासाठी निघालो. तेथील माहिती घेता ६ ऑगस्टला किश्तवाडला हिंदू - मुस्लीम दंगलीमुळे १५ दिवस कर्फ्यू होता. ७ ऑगस्टला अभाविपने जम्मू- काश्मीर बंदचे आवाहन केले होते. मी जम्मूच्या प्रांत कार्यालयात होतो. सप्टेंबरला राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर आणि प्रदेश संघटनमंत्री पवन शर्मासोबत काश्मीरला आलो. तेव्हा आम्ही गांधर्बल जिल्ह्यातील क्षीरभवानीचे दर्शन घेऊन काश्मीरमधील अभाविपच्या कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ केला. अनंतनाग जिल्ह्यातील नागदंडी आश्रमात स्वामी विवेकानंद काही दिवस वास्तव्यास होते. याच आश्रमात राहून श्रीनगर कार्यक्षेत्रात अभाविपचे काम सुरू केले. पण आश्रमातील लोकांची माझ्यामुळे गैरसोय होऊ नये म्हणून मी आश्रम सोडला. यानंतर काही दिवस अनंतनागमधील काश्मिरी पंडितांसाठीच्या कॅम्पमध्ये तर काही दिवस श्रीनगरमधील लालचौकातील धर्मादाय निवासमध्ये राहिलो. पुढे सेवाभारतीच्या एका खोलीत जागा मिळाली. मी अभाविपच्या विद्यार्थ्यांसोबत संपर्क सुरु केला. दोन दिवसातच मला फोनवरून धमकी मिळाली - ‘आप काश्मीर से लौट जाव, नही तो वापस भेजना हमे आता है |’ अशा धमक्या सुरु झाल्या. वरिष्ठांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी संयम ठेवून काम करण्यास सांगितले. दररोजच्या संपर्कामुळे पुलवामा, गांधर्बल, अनंतनाग आणि श्रीनगरमधील विद्यार्थी अभाविपशी जुळू लागले होते.
 
युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांना काय सांगशील ? असे विचारता तो म्हणाला, भारतीय युवकांमध्ये सामर्थ्य आहे. युवा पिढीने आव्हानांना, स्पर्धेला सामोरे जावे. इंटरनेट आणि मोबाईलच्या जाळ्यात न अडकता, यंत्रांचे गुलाम न होता त्यांच्या सहाय्याने आपली क्षमता वाढवा. बुद्धीला चालना द्या. चिकाटीने ध्येय गाठा. स्वामी विवेकानंदांप्रमाणे उच्च विचार करण्याची सवय लागली की आचरण आपोआप शुद्ध होते, हे विसरू नका. एखाद्या अपयशाने खचून न जाता, नकारात्मक विचार न करता सक्षम व्हा.
 
सार्थ शती समारोह
 
स्वामी विवेकानंदांच्या जन्माचे १५० वे जयंती वर्ष सार्थ शतीनिमित्त आयोजित समारोहासाठी विस्तारक म्हणून कन्याकुमारीला जाण्याचे भाग्य मला लाभले, असे सांगून मयूर म्हणाला, नंतर कल्याणच्या अभ्यासवर्गातही गेलो. तेथे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील अंबेकर यांच्या उपस्थितीत मी काश्मीरमध्ये अभाविपच्या कार्यासाठी पूर्णवेळ जाण्याचा मानस व्यक्त केला. काश्मीरमध्ये अद्याप अभाविपच्या कार्यासाठी पुरेशी व्यवस्था नसतांना कसा राहशील ? असा प्रश्न त्यांनी मला करता मी म्हणालो की, मी कोणत्याही परिस्थितीत राहू शकतो. तोपर्यंत माझे शिक्षण पूर्ण झाले होते. खूप विचारांती मला श्रीनगर जिल्हा संघटनमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली.
 
काश्मीरमध्ये एकदा तरी जायला हवे 
 
काश्मिर हे भारताचे नंदनवन. प्रत्येकाला आवडेल असे ठिकाण. १९९० च्या काळात येथे दहशतवादी हल्ले होत होते, पूर आला तरी काश्मिरला येणारे पर्यटक कमी झाले नाही. दिवसेंदिवस संख्या वाढतच राहिली.काश्मीरहून परतल्यावरही मयूर अभाविपच्या कार्याशी अधिक नव्या उमेदीने जुळलेला आहे. आजच्या तरुणाईपुढे एक ‘आयडॉल’ म्हणून ... !
 

 
  
 
२०१४ च्या पुरामध्ये केले कार्य 
२०१४ मध्ये काश्मिरमध्ये मोठा पूर आल्याने खूपच विदारक स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा अभाविप आणि रा.स्व.संघाने पूरग्रस्तांना सहकार्यासाठी काही योजना आखल्या. वैद्यकीय मदतीसाठी नॅशनल मेडिको ऑर्गनायरेशन (NMO) सोबत अभाविपने समन्वय साधून खाद्यपदार्थ, कपडे अशी मदत केली. पूर ओसरल्यानंतर पुलवामा जिल्ह्यातील गरीब परिवारांना अभाविपने आर्थिक सहकार्यही केले होते.
 
 
तसेच बडगाम जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव केला. त्यात मुलींची संख्या उल्लेखनीय होती. राज्यभर अभाविपची सदस्य नोंदणी अभियान तसेच २ ऑक्टोबरला स्वच्छता अभियान राबवले. श्रीनगरच्या माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना अभाविपच्या लोगोसह वह्या वाटल्या.
 
एनआयटीत फडकवला तिरंगा !
 
भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यात भारत पराभूत झाल्यावर काही असामाजिक तत्वांनी जल्लोष केला होता. त्याला उत्तर म्हणून अभाविपने विद्यार्थ्यांसोबत भारताचा तिरंगा स्वतः तयार करून एनआयटीमध्ये मोठ्या अभिमानाने फडकवला. त्यावर देशभरात चर्चा झाली होती. या दहशतग्रस्त राज्यातील भारतविरोधी कारवायांच्या वातावरणात घडलेली ही प्रेरणादायक घटना ठरली.
 
 
अनेकांशी भेटी
 
येथे काम करतांना देशातील अनेक मान्यवरांशी भेट झाली. त्यात रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबोले, प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, माजी सहसरकार्यवाह मदनदास, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव, राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन, जम्मू - काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलकुमार आदींचा समावेश होता. या भेटीमुळे आयुष्यभरासाठी ऊर्जा मिळाली.