तुटलेल्या दोरीचा पतंग...
 महा एमटीबी  12-Jan-2018
 

 
पतंगाची दोरी जेव्हा कापली जाते, तेव्हा भोवतालच्या हवेच्या वाहण्यातून क्षणमात्र मिळणारा मुक्ततेचा आनंद त्या पतंगाला ‘आपणच आपले राजे आहोत,’ हे सुख काही काळ मिळवून देतो. परंतु, त्यामुळे त्याचा परत येण्याचा रस्ता बंद होऊन हवेत भटकून स्वत:च्या डोळ्यादेखत होणारा विनाश पाहणे हे एवढेच त्याचे भवितव्य असते. आपण यशस्वी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली, हे प्रकाश आंबेडकरांच्या आनंदाचे स्वरुप दोरी तुटलेल्या पतंगाच्या आनंदासारखेच क्षणभंगूर आहे.
 
जन्मलेली प्रत्येक व्यक्ती असो की, निर्माण झालेली संघटना, संस्था किंवा चळवळ असो, तिच्या अस्तित्वाला काही ना काही संदर्भ असतात. असा संदर्भ व्यक्तीच्या बाबतीत नेमका कोणत्या काळी तयार होतो, हे सांगणे अवघड आहे. व्यक्तीची प्रवृत्ती, तिला येणारे अनुभव, त्या अनुभवाचा तिने लावलेला अर्थ, त्या अर्थानुसार तिचे वागणे, त्या वागण्याला समाजाने दिलेली प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियेचा त्या व्यक्तीवर झालेला परिणाम, अशा साखळीत प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला एक संदर्भ निर्माण होत असतो. जीवन कसे जगायचे, याचा आराखडा तो यातूनच निर्माण करतो. यालाच वेगळ्या भाषेत आपण ‘जीवनमूल्ये’ म्हणतो. या जीवनमूल्यांच्या प्रकाशात प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचा अर्थ शोधत असते. याला परिस्थिती काही प्रमाणात कारणीभूत असली तरी सर्वस्वी एकाच परिस्थितीतून निर्माण झालेल्या सर्व व्यक्तींचे जीवन एकसारखे असते, असे नाही. जशी जशी जैविक तत्वज्ञानामध्ये अधिकाधिक प्रगती होऊ लागली, तशी माणसाच्या स्वभावाच्या वागण्याची सुत्रे त्याच्या जनुकीय साखळीत (डीएनए) आहेत, असे लक्षात आले. परंतु, माणसाचा चांगला, वाईट, सकारात्मक, विध्वंसक अशा प्रकारचा स्वभाव केवळ जनुकीय साखळीवर अवलंबून असतो, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्याच्या आशाआकांक्षा, त्याला मिळालेले यशापयश यावरही त्याच्या स्वभावाची जडणघडण अवलंबून असते. तो एका मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात त्याला यश मिळाले नाही की तो मार्ग तो सोडून देतो आणि नव्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा अशा धरसोड प्रवृत्तीतून आयुष्याच्या अखेरीस काहीही हाती न लागणारी माणसे आपल्या भोवती असतात. ती त्यांच्या नैराश्यातून स्वतःचे नुकसान तर करुन घेतातच, परंतु ते इतरांच्याही त्रासाला कारणीभूत ठरतात. अनेकवेळा एखादे सुसंगत जीवन जगत असताना यश खूप लांब आहे, ते कधी आपल्या वाट्याला येणारच नाही, असे वाटू लागते. त्यातूनही या धरसोडीच्या प्रवृत्तीला सुरुवात होते. अशा व्यक्तींची मुळे जीवनात कधी घट्टपणे रुतलेलीच नसतात. आज या जमिनीत किंवा उद्या त्या जमिनीत, असे त्यांचे प्रयोग सुरु असतात.
 
समाजात काही निवडक व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांच्या जीवनविषयक कल्पना त्यांच्या व्यक्तिजीवनापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या कल्पना समाजरुप बनतात. अशा व्यक्तीच सामाजिक क्रांतीच्या, चळवळींच्या प्रेरक बनतात. त्यांच्या अनुभव प्रकाशात चालणारा मोठा अनुयायी वर्ग तयार होतो. हा अनुयायी वर्ग त्यांच्या संघटनेत, चळवळीत आपल्या जीवनाचे संदर्भ शोधत असतो. ते त्यांचे अनुयायी नसतात किंवा चळवळीचे घटक नसतात, त्यांच्याही दृष्टीने अशा व्यक्तिमत्त्वांचे वैचारिक चिंतन हे वैचारिक क्षेत्रातील संदर्भमूल्ये म्हणून महत्त्वाचे असते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात सामाजिक विषमतेच्या आलेल्या अनुभवांतून समाज समतायुक्त बनविण्याची चळवळ निर्माण केली. या चळवळीचे तीन प्रमुख संदर्भबिंदू होत. ज्या मागासजाती म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या गुणवत्तेची वाढ केली पाहिजे, हा पहिला संदर्भबिंदू. धर्म जात, वंश अशा भेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, हा दुसरा संदर्भबिंदू. या दोन्हीसाठी पोषक असे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वातावरण निर्माण केले पाहिजे, हा तिसरा संदर्भबिंदू. लोक भारतीय राज्यघटनेद्वारे लोकशाहीचा स्विकार करुन दरडोई एक मत दिल्यानंतर राजकीय समानतेच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले गेले. परंतु, त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे प्रश्र्न अजूनही कायम आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करताना, जात-पात निरपेक्ष समाज निर्माण करावा, या विचारधारेतून केली. शाळेत मुलाला दाखल करत असताना त्याची जात नोंदविली जाऊ नये, अशा प्रकारचे विचार त्यांनी कधी काळी प्रकट केले होते. याच विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ‘बहुजन महासंघा’ची स्थापना केली. परंतु, त्यांना आपल्या राजकीय वाटचालीत फारसे यश मिळाले नाही. संघटनात्मक कौशल्यामुळे की अन्य कोणत्याही कारणामुळे, रामदास आठवलेंना त्यांच्या तुलनेत अधिक चांगले यश मिळाले. या आपल्या राजकीय मर्यादेवर मात करण्यासाठी त्यांच्या प्रारंभी व्यक्त केलेल्या विचारांशी पूर्णपूणे विसंगत असे जातीयवादी राजकारण करण्याचे प्रकाश आंबेडकरांनी ठरविले. गुजरातमध्ये जातवादी राजकारणामुळे जे काहीसे यश मिळाले, त्यातून बहुधा त्यांना स्फूर्ती मिळाली असावी. त्यामुळे हेच राजकारण महाराष्ट्रातही आपल्याला यशाचा मार्ग दाखवू शकते, असा विचार करुन त्या प्रवाहात ते सामील झाले.
 
गुजरातमध्ये ज्या जातवादी शक्ती काम करीत आहेत, त्यांना मिळालेले मर्यादित यश पाहून देशभरामध्ये अशा प्रवृत्तींना उत्तेजन देऊन त्यांच्यातील विध्वंसक प्रवृत्तींना खतपाणी घालून सामाजिक असंतोष निर्माण करण्याची मोठी योजना एक गटाने हाती घेतली गेली आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेला बळी पडून प्रकाश आंबेडकर हे त्या प्रवृत्तीचे बाहुले बनले आहेत. याच शक्तीने भीमा-कोरेगाव येथे हिंसाचाराला पोषक होईल असे वातावरण निर्माण करण्याची योजना आखली, याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. भीमा-कोरेगाव येथील हल्ल्याचे निमित्त करुन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. वास्तविक पाहता, त्यांचे राजकारण अकोल्याच्या परिसरापुरते मर्यादित आहे. केवळ त्यांच्या बळावर तो परिसरही बंद करण्याएवढी त्यांची ताकद नाही. तरीही, ‘महाराष्ट्र बंद’ला जे यश मिळाले, त्यात अनेक शक्ती कार्यरत होत्या. आपल्या ‘बंद’च्या हाकेचे समर्थन करण्याकरिता त्यांनी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी केली. या मागणीमागचा त्यांचा राजकीय हेतू स्पष्ट होता. परंतु, ही मागणी अर्थशून्य आहे हे सिद्ध होत आहे आणि त्याचबरोबर ‘महाराष्ट्र बंद’च्या निमित्ताने झालेल्या दंगलीत भाग घेऊन विध्वंस केला, त्यांचीही नावे समोर येत आहेत व त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. त्या सर्वांना कायदेशीर प्रक्रियेपासून वाचविणे ही प्रकाश आंबेडकरांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
 
पतंगाची दोरी जेव्हा कापली जाते, तेव्हा भोवतालच्या हवेच्या वाहण्यातून क्षणमात्र मिळणारा मुक्ततेचा आनंद त्या पतंगाला ‘आपणच आपले राजे आहोत,’ हे सुख काही काळ मिळवून देतो. परंतु, त्यामुळे त्याचा परत येण्याचा रस्ता बंद होऊन हवेत भटकून स्वत:च्या डोळ्यादेखत होणारा विनाश पाहणे हे एवढेच त्याचे भवितव्य असते. आपण यशस्वी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली, हे प्रकाश आंबेडकरांच्या आनंदाचे स्वरुप दोरी तुटलेल्या पतंगाच्या आनंदासारखेच क्षणभंगूर आहे. त्याने महाराष्ट्रात तर सामाजिक दुहीची बिजे पेरली आहेतच, पण त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याही राजकीय विश्र्वासार्हतेवर भलेमोठे प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
- दिलीप करंबेळकर