स्मार्ट नाशिकच्या दृष्टीने लाईटिंग प्रकल्पास मंजुरी
 महा एमटीबी  12-Jan-2018

एलईडी फिटिंग संदर्भात जोरदार चर्चा

 

 
 
 
नाशिक : ‘स्मार्ट नाशिक’च्या मोहिमेस गती देण्यासाठी भाजपने ’स्मार्ट लाईटिंग प्रकल्पा’स महासभेत मंजुरी दिली. महापालिकेची महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या उपस्थितीत झाली.
 
राज्याचे ‘ऊर्जा संवर्धन धोरण-
२०१७ ’च्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात ‘स्मार्ट लाईटिंग प्रकल्पां‘तर्गत एलईडी फिटिंग लावण्यासंदर्भातील विषयावर जोरदार चर्चा झाली. या चर्चेच्या प्रारंभी नगरसेवक गुरमित बग्गा यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले. उद्धव निमसे यांनी या विषयाचे समर्थन करताना पूर्वी झालेल्या चुकांची दुरुस्ती करून मंजुरी देण्याची मागणी केली. शशिकांत जाधव यांनी चर्चेत या प्रकल्पामुळे पावणेदोन कोटींची बचत होणार असल्याचे सांगितले.
 
या निर्णयातून महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसला तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍न उपस्थित करीत रा. कॉं. गटनेते गजानन शेलार म्हणाले की, ’’चुकीच्या अटी टाकणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे. या विषयाचा सखोल अभ्यास करून आणि सर्व कागदपत्र देऊन कायदेशीर सल्ला घ्यावा आणि नंतर या विषयाला मंजुरी द्यावी’’, असे स्पष्ट करीत आपला विरोध दर्शवला. डॉ. हेमलता पाटील यांनी परिपूर्ण प्रस्ताव करावा. हा विषय न्यायालयात अडकणार नाही आणि महापालिकेला आर्थिक फटका बसणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली.
 
भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी या विषयाला समर्थन देत पूर्वीच्या एलईडी प्रकरणामुळे संपूर्ण शहर अंधारात लोटण्याचे काम झाल्याकडे लक्ष वेधले. शहरात पोल उभे असून त्यावर फिटिंग नाही. आता कायदेशीर बाजू तपासून नवीन डॉकेट आले असून त्यास मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी मागील एलईडी वादाची माहिती दिली. तेराव्या वित्त आयोगातून ऊर्जा बचतीकरिता एलईडी फिटिंग बसवण्याचे काम करण्याचा विषय मंजूर असताना एका उपसूचनेचा आधार घेत मागील पंचवार्षिक काळात महापालिकेकडून डॉकेट आणण्यात आले. अशा सुमारे २१० कोटी खर्चाच्या एलईडी वादाची माहिती बडगुजर देत असतानाच सभागृह नेते दिनकर पाटील यांनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.
 
महापौरांनी उभयतांना शांत करीत पाटील यांना खाली बसण्याची सूचना करताना बडगुजर यांना बोलण्यास सांगितले. काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी आलेले डॉकेट चुकीचे व घातक असल्याचे सांगत यामुळे महापालिकेचे नुकसान होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी चर्चेत कायदेशीर सल्ला खरा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला. साडेसात कोटींच्या एलईडी फिटिंगला अगोदरच मंजुरी दिली असून आमच्या निधीतून बसवण्यात येणारे एलईडी हे ब्रॅण्डेड कंपनीचे बसवा असे सांगत बोरस्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पूर्वीच्या एलईडी मंजुरीला आपला विरोध होता मात्र आता या विषयाला मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानंतर मुशिर सय्यद यांनी पूर्वीच्या एलईडी वादात आपली उपसूचना ही एनर्जी सेव्हिंगकरिता होती, असे सांगितले. शेवटी महापौरांनी विरोधकांचा विरोध नोंदवत या विषयाला मंजुरी दिली.
 
पश्‍चिम प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी शहरात रस्त्यात आलेल्या झाडांमुळे आणखी किती अपघात होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर खुलासा करताना आयुक्त म्हणाले, न्यायालयाची आम्हाला बंधने असून त्यापलीकडे आम्ही जाऊ शकत नाही. तुम्हीच नागरिक म्हणुन न्यायालयात पिटीशन दाखल केली पाहिजे, ही दुसरी बाजू तुम्ही न्यायालयात सादर करा. आता दाखल याचिकेवर निर्णय होणार आहे. आता शहरात बहुतांशी झाडांजवळ रिफ्लेक्टर व फलक लावले आहे. शिल्लक ठिकाणी तात्काळ रिफ्लेक्टर व फलक लावू, असेही आयुक्तांनी सांगितले. या चर्चेत दिनकर आढाव, गजानन शेलार व राहुल दिवे यांनी भाग घेतला