भारतात जाताय तर काळजी घ्या
 महा एमटीबी  11-Jan-2018

अमेरिकेची नागरिकांना सूचना

वॉशिंग्टन :
गेल्या वर्ष परदेशी पर्यटकांवर भारतात झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी नवीन पर्यटन सूचना जारी केल्या असून 'भारतात जात असाल तर अधिक काळजी घ्या' अशी सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिली आहे. अमेरिकेच्या पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर अमेरिकेतील नागरिकांना पर्यटनासंबंधी काही सूचना देण्यात आल्याअसून पर्यटकांनी विशेष सूचना घेण्याच्या देशांमध्ये भारताचा देखील समावेश करण्यात आला आहे.


'भारतामध्ये सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून अमेरिकेच्या नागरिकांनी भारतात जाताना विशेष काळजी घ्यावी,' असे अमेरिकेने म्हटले आहे. भारतामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी जम्मू-काश्मीर तसेच भारत-पाकिस्तान सीमेजवळील भागामध्ये पर्यटनासाठी जाऊ नये, अशी सूचना अमरिकेने केली आहे. तसेच भारतात महिलांसंबंधी गुन्हे वाढत असून महिला पर्यटकाने शक्यतो एकटीने भारतात प्रवास करू नये, असेही अमेरिकेने म्हटले आहे. याच बरोबर पर्यटकांनी सतत अमेरिका सरकारच्या संपर्कात राहून आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व सोय करावी, असे अमेरिकेने म्हटले आहे.

गेल्या वर्षी उत्तरप्रदेशमध्ये दोन परदेशी जोडप्यांवर प्राणघातक हल्ले झाले होते. तसेच काही विदेशी नागरिकांना देखील उत्तर भारतातील काही गुन्हेगारांकडून मारहाण करण्यात आली होती. याघटनेमुळे भारतात विदेशी नागरिक असुरक्षित असल्याची म्हटले जात होते. परंतु परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत सर्व पिडीतांना मदत केली होती. व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु अमेरिकने जारी केलेल्या या सूचनांमुळे भारताचा जागतिक प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे.

भारता पेक्षा पाकिस्तानमध्ये धोका अधिक 

दहशतवादाच्या मुद्द्यावरून सातत्याने अमेरिकेच्या टीकेला सामोरे जाव्या लागणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने धोक्याच्या बाबतीत तिसऱ्या स्तरामध्ये टाकले आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत पाकिस्तान हा अत्यंत संवेदनशील असा प्रदेश असून अमेरिकेच्या नागरिकांनी पाकिस्तानमध्ये जाणे शक्यातो टाळावे, असे अमेरिकेने म्हटले आहे. .