मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची पुन्हा एकदा अफवा
 महा एमटीबी  11-Jan-2018
 

 
 
 
ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीरा-भाईंदर येथील कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची अफवा पसरली. मात्र, ही बातमी केवळ अफवा असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
 
 
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर येथील एका शाळेच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरत असताना पायलटला लोंबकळत असणारी केबल दिसली. त्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर खाली न उतरवता पुन्हा वर नेत दुर्घटना टाळली. ही केबल हेलिकॉप्टरच्या पंखात अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता होती, मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. गेल्यावर्षी २५ मे रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावण्याची घटना घडल्यानंतर वारंवार असा अपघात झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.