भाजपश्रेष्ठींच्या गुप्त बैठकी वाढल्या, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?
 महा एमटीबी  11-Jan-2018
 
 
 
 
मुंबई : गेले वर्षभर लांबणीवर पडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, कॉंग्रेस सोडून नवा पक्ष स्थापन करत एनडीएमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा संभाव्य मंत्रीमंडळ प्रवेश, काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू तर त्या जागी काही नव्या चेहऱ्यांची वर्णी आदी सर्व मुद्दे गेले अनेक महिने चर्चेत असले तरी त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी गेले काही दिवस प्रदीर्घ बैठका घेण्याचा सपाटा लावल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ मंत्री अर्थात महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे आदी भाजपचे वरिष्ठ नेते गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने भेटत असून प्रदीर्घ बैठका घेत आहेत. मंगळवार व बुधवारी रात्री उशिरा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही वेळच्या या बैठका तब्बल दोन-तीन तास चालल्याचे समजते. मंगळवारी तर रात्री नऊ-सादेनऊच्या सुमारास गेलेले चंद्रकांत पाटील रात्री दोनच्या सुमारास ‘वर्षा’हून परतले. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर सुमारे दोन-तीन तास तळ ठोकून होते. दुपारी चार-साडेचार वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा -सातपर्यंत पाटील व दानवे यांच्यात प्रदीर्घ बैठक झाली.
 
 
 
या बैठकांमध्ये नेमके काय घडले याबाबत कोणाही मंत्र्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी या साऱ्या वेगवान घडामोडींमुळे या वरिष्ठ नेत्यांमध्ये नेमकी काय खलबते झाली असतील, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भीमा-कोरेगाव घटनेनंतर राज्यात काही महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत आहेत. २०१४ पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर विरोधी पक्षातील काही बड्या नेत्यांची अटक होणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच गेले वर्षभर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तारही प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन-चार दिवसांतील या गुप्त भेटी-गाठी पाहता लवकरच मुख्यमंत्र्यांकडून एखादा मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.