वसीम रिझवींचे खडेबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
मदरशांनी कधीही डॉक्टर, अभियंते घडवले नाहीत, तर त्यांनी दहशतवाद्यांना जन्म दिला. येथील शिक्षणपद्धतीमुळे मदरशांतील मुलांना बाहेर रोजगार मिळत नाही, तयमुळे मदरसे बंद करावेत अशी मागणी वसीम रिझवी यांनी केली. स्वतःच्या समाजात सुधारणा घडवायची असेल तर त्या समाजानेच पुढे येणे आवश्यक असते, आज रिझवी यांनी तेच केले आहे. त्यांच्या या मागणीमुळे मुसलमान समाजातील मुले आणि मुलींची परिस्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे. सोबतच ढोंगी मानवतावाद्यांचे बुरखेही टराटरा फाटले आहेत. पण एवढ्यानेच काम होणार नसून मुसलमान समाजाच्या विकासासाठी आणि त्यामतून राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वच समाजघटकांनीही त्यांच्या या मागणीला सक्रिय पाठिंबा देणे गरजेचे आहे.

ठिकठिकाणी मुसलमान मोहल्ल्यांत असलेल्या मदरशांत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दहशतवादी संघटनांकडून त्यांना आर्थिक रसद पुरवली जाते. मदरशांनी कधीही डॉक्टर, अभियंते किंवा आयएएस अधिकारी घडवले नाहीत, मात्र त्यांनी दहशतवाद्यांना नक्कीच जन्म दिला, असा धक्कादायक दावा उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला.
 
मदरशांतील अशा उद्योगांमुळे देशभरातील मदरसे बंद केले जावेत, अशी मागणीही त्यांनी यातून केली. याशिवाय मदरशांतून दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा मुख्य धारेतील शिक्षणाशी कसलाही ताळमेळ नसून त्याचा जीवन जगण्यासाठी, रोजगारासाठी काहीही उपयोग होत नाही. मदरशांत शिक्षण घेतलेल्या मुलांना नोकर्‍या मिळत नाही की त्यांच्या पदव्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे सर्वच मदरसे बंद करुन येथील मुलांना मुख्य धारेतील शिक्षण द्यायला हवे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी या पत्रातून मांडली. मदरशांतील इस्लामी शिक्षणामुळे येथील मुले कट्टरवादाकडे ओढली जातात, असेही ते म्हणाले. वसीम रिझवी यांनी पत्राद्वारे केलेली मागणी खरोखर विचार करण्यासारखीच आहे. कारण सर्वच मुसलमान समाजाचा विचार करता, मुस्लिमांतील मुले सर्वाधिक संख्येने मदरशांतच शिक्षण घेत असल्याचे ठळकपणे दिसते. येथे त्यांना इस्लामी पद्धतीनुसार धर्मग्रंथांचे, तर्कशास्त्र, दर्शनशास्त्राचे शिक्षण दिले जाते. दरस-ए-निजामिया, जामिया इस्लामीया मदिना आणि नदवत-उल-उलेमा यासारखे अभ्यासक्रम येथे शिकवले जातात. ज्याचा मुसलमान विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात काहीही फायदा होत नाही.
 
आज सर्वच क्षेत्रात प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय या शाखांमध्ये रोजगाराचे कितीतरी मार्ग उपलब्ध आहेत. पण मदरसा शिक्षण पद्धतीत शिकलेल्या मुलांना त्याचा लाभ घेता येत नाही. कारण त्या पातळीवरचे आणि त्या दर्जाचे शिक्षण त्यांना मिळतच नाही. यातूनच मुसलमान समाजात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, हलकी-सलकी कामे करणे, अशिक्षितपणामुळे नव्या जगाची माहिती नसणे, अज्ञानामुळे जुन्या रुढी-परंपरांना धरुन ठेवण्याचे प्रकार दिसतात. काळाबरोबर न बदलता शेकडो वर्षांपूर्वीच्या समजुती मुसलमान समाजात आजही पाळल्या जातात, याचे मुख्य धारेतील शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे जे शिक्षण घेऊन आयुष्याच्या रणमैदानात जिंकताच येणार नाही, त्याचा उपयोग काय, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
 
 
मुसलमान समाज आजही मागासलेला दिसतो. मुली, महिलांच्या बाबतीत तर मुसलमान समाजातील रुढी-परंपरा कमालीच्या अमानुष असून त्यामुळे स्त्रियांना माणूस म्हणून जगताही येत नाही. कित्येकदा काही मुस्लिमपालक आपल्या मुलांना मुख्य धारेतील शिक्षणात पाठवतात पण मुलींना मात्र मदरशासारख्या कालबाह्य ठिकाणीच पिटाळतात. यातून मुला-मुलींतील भेदभाव तर दिसतोच पण एकूणच समाजाच्या स्वास्थ्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. सरतेशेवटी या सर्वच गोष्टींचा प्रभाव संपूर्ण देशाच्या व्यवस्थेवर-परिस्थितीवर पडतो. मदरसा शिक्षण पद्धतीमुळे मुसलमान समाजातील महिलांची स्थिती अतिशय दयनीय असल्याचे स्पष्ट होते. १८ व्या शतकात महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा वसा घेतला. अतिशय मागासलेल्या काळात ही खरे तर फार मोठी क्रांती होती. सावित्रीबाईंच्या पुढाकारामुळे आज सर्वत्र ‘मुलगी शिकली प्रगती झाली’चे चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण दुर्दैवाने इस्लाममध्ये असे झाले नाही. मुसलमान समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणारी कोणी सावित्री जन्मालाच आली नाही, किंवा स्वतः त्या समाजानेच अशी सावित्री घडू दिली नाही. ही खरे तर दुःखद गोष्ट. कोणत्याही समाजात महिलांचे सरासरी प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास असते. म्हणजेच एकूण मुसलमान लोकसंख्येच्या अर्ध्या जगावर असा अन्याय वर्षानुवर्षे चालूच आहे, जो कुठेतरी थांबणे आवश्यक आहे.
मुली, महिला यादेखील माणूसच आहेत, त्यांना जगाच्या बरोबरीने पुढे जाण्याचा, आपला उत्कर्ष करण्याचा समान अधिकार आहे, हे आता मुसलमान समाजाला कळायला हवे. पण मदरसा शिक्षण पद्धतीमुळे कुठे अरुणोदय झालाय, हेच या समाजातील लोकांना कळत नाही. त्यामुळे त्यांना अंधारयुग हेच हवेहवेसे वाटते. यात बदल होणे अत्यावश्यक असून या बदलामुळेच मुसलमान समाजाचा विकास होणे संभव आहे. आज स्पर्धेच्या युगात जग ही एक रणभूमी झाली आहे, येथे टिकायचे असेल तर तुमच्याकडे त्यासाठी आवश्यक अशी कौशल्ये असणेही गरजेचे आहे. आणि ही कौशल्ये आधुनिक शिक्षणातूनच मिळू शकतात, मदरशांतून नव्हे. त्यामुळे यावर मुसलमान समाजाने नक्कीच विचार करायला हवा.
 
मदरसा शिक्षणपद्धती, त्यातील उचापती, दहशतवाद आदी विषयांवर मुसलमान समाजातूनच भाष्य करण्यात आले, ही समाधानाची गोष्ट म्हणावयास हवी. कोणत्याही समाजात सुधारणा घडवून आणायच्या असतील तर त्या समाजातच तशी उत्कट इच्छा असणे गरजेचे असते. मुसलमान समाज आज स्वतःहून आपल्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न करत असेल तर त्याचे स्वागत करणे आपले कर्तव्य ठरते. कारण सुधारणा झाली म्हणजे फक्त तो एकटा समाजच पुढे जात नसतो तर त्यासोबत राष्ट्रगाडाही पुढची वाटचाल करत असतो. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे वसीमरिझवी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे इस्लाममध्ये असलेली धर्ममार्तंडांची मक्तेदारी मोडीत निघण्याची शक्यता आहे. जे धर्ममार्तंड केवळ आपल्या स्वार्थासाठी जुन्या-पुराण्या गोष्टींचे खुळ डोक्यात धरुन बसतात त्यांची सद्दी संपत आल्याचेच हे द्योतक आहे. आता समस्त इस्लामेतर चळवळींनीदेखील माणुसकीच्या दृष्टीने रिझवी यांच्या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे. दुसरीकडे स्वतःला मानवतावादी वगैरे शब्दभुषणे लावणार्‍या पाखंड्यांचा खरा चेहराही आता उघड होत आहे. या लोकांनी मानवतावादाचे बुरखे भरपूर पांघरले पण इस्लमामध्ये सुधारणा व्हावी यासाठी कधीही तळमळीने प्रयत्न केले नाहीत की त्यासाठी आवाज उठवला नाही. खरे म्हणजे अशी मानवतावादाची मोकार पोपटपंची करणार्‍यांचे बोलवते धनीच वेगळे होते. त्यामुळे ते जसे सांगतील तशी या कठपुतळ्यांची हालचाल चालत असे. पण आता रिझवी यांच्या मागणीनंतर त्यांचे खरे रुप सर्वांसमोर येते आहे. या लोकांना मुसलमान समाजाला सुधारण्यापेक्षा त्यांच्या मागास राहण्यातच आपला फायदा वाटत होता, त्यांच्या मागासपणातूनच यांचा स्वार्थ साधला जात होता. म्हणूनच त्यांनी मुसलमानांकडे कधी माणूस म्हणून पाहिलेच नाही. कारण त्यांच्या त्यांच्या मतपेट्यांची काळजीच या लोकांना अधिक सतावत होती. याच मतांच्या भिकेपायी त्यांनी माणुसकीचा बळी दिला. पण आता त्यांची डाळ काही शिजणार नसून स्वतः मुसलमान समाजानेच आपल्या विकासासाठी पुढे येण्याचे ठरवले आहे. हे निश्चितच कौतुकास्पद. आता त्यांच्या या प्रयत्नांना देशातील सर्वच सुजाण आणि विवेकी नागरिकांनी सक्रिय पाठिंबा देणे आवश्यक आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@