तुम्ही पुढाकार घ्या...
 महा एमटीबी  11-Jan-2018
 

 
 
 
भारतीय संस्कृतीमध्ये ‘अन्न’ हे पूर्णब्रह्म मानले जाते, पण दुर्दैवाने याच भारतामध्ये कोट्यवधी लोक रोज उपाशी राहत आहेत. याच देशामध्ये अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. आज भारताने अनेक क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करून जगाच्या नकाशावर स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयारी केली आहे. अर्थात ही बाब कौतुकास्पद असली तरी आजच्या घडीला भारताच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
आजही देशातील कोट्यवधी जनतेला उपाशीपोटी झोपावे लागते, हे एक कटू वास्तव आहे. याचा अर्थ देशात अन्नधान्याचे उत्पादन कमी होते, असा नाही. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर रोज अन्नाची नासाडी केली जाते. लग्नसमारंभ, तसेच इतर घरगुती समारंभांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अन्न वाया घालवले जाते. जितकी गरज असेल तितकेच अन्न ताटात वाढून घेण्याची मानसिकता अजूनही समाजामध्ये रूढ झालेली दिसत नाही. ’जागतिक भूक’ निर्देशांकात भारताची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे समोर आले आहे. याबाबतीत ११९ देशांमध्ये भारत तब्बल १०० व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, २०१६ मध्ये एक अहवाल जाहीर झाला होता आणि त्यामध्ये ब्रिटनचे लोक जितक्या अन्नधान्याचा वापर करतात, तितके अन्नधान्य भारतीय लोक वाया घालवतात, असे नमूद करण्यात आले होते. तर सध्या देशभरात रोज २४४ कोटींच्या अन्नाची नासाडी होत असल्याची आकडेवारी सांगते. या अनुषंगाने वर्षाचे गणित मांडले तर अन्नाच्या नासाडीचा आकडा ८८ हजार ८०० कोटी रुपयांवर जातो, असे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालात म्हटले आहे.
 
भारतातील लोकांना दरवर्षी २२५ ते २३० दशलक्ष टन इतकी अन्नधान्याची गरज असून २०१५-१६ या वर्षी देशात २७० दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही आकडेवारी पाहाता वेळीच या अन्नधान्याच्या नासाडीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. अर्थात, इथे सगळी जबाबदारी सरकारवर न टाकता यासाठी भारतीय नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी अन्नाची नासाडी होणार नाही, याची सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे. घरातील प्रौढांनीही लहान मुलांना त्यांच्या पद्धतीने ही बाब समजावून सांगितली पाहिजे. म्हणजे, ताटातून अन्न फेकण्याची घाणेरडी सवय त्यांना लागणार नाही. तसेच कुठल्याही समारंभाला गरजेपेक्षा जास्त अन्न शिल्लक राहिल्यास अशा काही संस्था आहेत, त्या जास्तीचे अन्न गरजवंतांपर्यंत पोहोचवितात. अशा संस्थांची मदत घेऊन अन्ननासाडीवर नियंत्रण आणण्याच्या कार्यात सहभाग घ्यायला काहीच हरकत नाही.