सहकार भारतीची ३८ वर्षांची अविरत वाटचाल

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
  
 
‘बिना संस्कार नहीं सहकार’ हे ब्रीद घेऊन या चळवळीसाठी एका ध्येयाने काम करणार्‍या सहकार भारतीची स्थापना ११ जानेवारी, १९७९ रोजी झाली. सहकार चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून स्व. लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) यांनी या कामाची प्रेरणा दिली. स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे २०१६-१७ हे जन्मशताब्दी वर्ष सहकार भारती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे करीत आहे.
 
केंद्रीय कृषी व सहकारमंत्री ना. राधामोहन सिंह हे जन्मशताब्दी वर्षसमितीचे अध्यक्ष आहेत, तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे हे कार्याध्यक्ष आहेत. गेली ३८ वर्षे काम करणार्‍या सहकार भारतीने आता देशव्यापी संघटन उभे केले आहे.
 
राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्नात सहकार क्षेत्राचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ होण्यासाठी ‘सहकार भारती’ गेली ३८ वर्षे ‘बिना संस्कार नहीं सहकार’या ध्येयाने कार्य करून सेवाभावी सहकारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहकार भारतीची विधीवत नोंदणी ११ जानेवारी, १९७९ रोजी मुंबईत झाली. त्यापूर्वीच १९७८ मध्ये स्थापनेबाबतच्या हालचाली पुण्यातून सुरू झाल्या होत्या. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सहकार चळवळ रूजली आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाळगीळ, वैकुंठभाई मेहता, गुलाबराव पाटील, वसंत पाटील आदींच्या सहकारातील योगदानाचे महत्त्व आपण जाणतोच. सहकार भारतीचे संस्थापक राहिलेले सांगलीचे अण्णासाहेब गोडबोले, सातार्‍याचे लक्ष्मणराव इनामदार, औरंगाबादचे ना. हरिभाऊ बागडे, जळगावचे डॉ. अविनाश आचार्य, नागपूरचे वसंतराव देवपूजारी, नाशिकचे मधुकरराव कुलकर्णी आदींचे देखील सहकार चळवळीच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. आज सहकार भारतीच्या देशव्यापी कार्यात असंख्य सुसंस्कारित कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
 
सहकारी संस्थांमध्ये परस्पर समन्वय, परस्पर पूरकता, आपुलकीची भावना व्यक्त करून एक सुसंघटित सहकार शक्ती उदयास यावी व या शक्तीच्या बळावरच सहकारी क्षेत्रासमोरील प्रश्‍नांची सोडवणूक होऊ शकेल, असा ‘सहकार भारती’चा विश्वास आहे. ’सहकारातून ग्रामविकास’ ‘भारतीय अर्थनितीचा आधार व्हावा सहकार’, ‘स्वायत्त सहकार - स्वावलंबी भारत’, ‘मुक्त अर्थव्यवस्थेला पर्याय - सहकार’ ‘समृध्द सहकार - सशक्त सहकार’, अशा विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद, आयोजन करून ‘सहकार भारती’ने गेल्या ३८ वर्षांच्या कालावधीत सहकरी/आर्थिक क्षेत्रांत मन्वंतर घडविले आहे. सहकारी चळवळ स्वायत्त असली पाहिले; त्याचप्रमाणे सहकारी संस्थांच्या विकासात अडसर ठरत असलेला सहकारी कायदा बदलला पाहिजे, ही मागणी ‘सहकार भारती’ने सातत्याने केली. कायद्यातील काही तरतुदींचा सहकाराने पुनर्विचार केलेला आपण जाणताच. ‘पीक कर्ज विमा योजना’ अंमलात आणण्यासाठी ‘सहकार भारती’ने प्रयत्न केले आहेत. आपल्या रचनात्मक कार्याबरोबरच प्रकल्पात्मक कामांची उभारणीही ‘सहकार भारती’ने केली आहे. विविध सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी; त्याचप्रमाणे त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी ‘सहकार भारती’ नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सहकार भारतीच्या संस्थापकांपैकी एक असलेले सतीश मराठे हे सहकार भारतीचे संरक्षक असून सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्योतिंद्रभाई मेहता, राष्ट्रीय सरचिटणीसपदी डॉ. उदय जोशी आणि राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून विजय देवांगण हे सध्या काम पाहत आहेत. देशभरातून सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असलेली मोठी कार्यकारिणी सहकार भारतीची धुरा समर्थपणे वाहत आहेत.
 
सहकार चळवळ पक्षीय राजकारणापासून अलिप्त असली पाहिजे, असेही ‘सहकार भारती’चे आग्रही मत आहे. म्हणूनच ‘सहकार भारती’च्या आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांमधून/परिसंवादांमधून विविध राजकीय नेत्यांनी आणि सहकार - सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील याबाबत आपले स्पष्ट मत नोंदवले आहे. ज्येष्ठ तत्त्वचिंतक कै. दत्तोपंत ठेंगडी, रा. स्व. संघाचे भूतपूर्व सरसंघचालक कै. बाळासाहेब देवरस, कै. रज्जूभैय्या, ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. शंकरराव चव्हाण, कै. बाळासाहेब विखे पाटील, शिवाजीराव पाटील, अण्णासाहेब शिंदे, कै. गोपीनाथ मुंडे, कै. मोहन धारिया, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अर्थसल्लागार नीलकंठ रथ, पंजाब उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व झारखंड राज्याचे माजी राज्यपाल रामा जॉईस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णा हजारे इ. विविध पक्षांच्या नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी, ‘सहकार भारती’च्या व्यासपीठावरून मार्गदर्शन केले आहे.
 
‘सहकार भारती’चे कार्य आता देशभरातील २७ राज्यांमध्ये सुरू झाले असून सर्वच राज्यांमध्ये कार्यकारिणीची स्थापना व नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहकारी चळवळीची निकोप वाढ व्हावी, सहकारी चळवळीचा प्रचार-प्रसार व्हावा; याबरोबरच देशभरातील प्रत्येक जिल्हास्थानी नागरी सहकारी पतसंस्था गठीत व्हाव्यात, स्वायत्त सहकारी कायद्याची तसेच वैद्यनाथ समितीच्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी, ही उद्दिष्ट्ये निश्‍चित केली आहेत.
 
‘सहकार भारती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त डिसेंबर २००३ मध्ये मुंबईत पहिले राष्ट्रीय महाअधिवेशन झाले. या अधिवेशनास देशभरातून १० हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. सन २००६ मध्ये दुसरे अखिल भारतीय अधिवेशन दिल्ली येथे झाले. हे अधिवेशन ‘कार्यकर्ता अधिवेशन’ म्हणून गणले गेले. देशभरातून सुमारे २०० कार्यकर्ते या अधिवेशनास उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात गुजरातचे सहकारमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा, खा. सुरेश प्रभू व अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
सन २००९ मध्ये भोपाळ येथे सहकार भारतीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन झाले तर २०१२ मध्ये बंगलोर येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन लाभले होते. बंगलोर अधिवेशनापासूनच स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती पुरस्कार देण्याची योजना सुरू झाली. हा प्रथम पुरस्कर आसामचे दीपक बरठाकूर यांना प्रदान करण्यात आला. २०१५ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या पाचव्या राष्ट्रीय अधिवेशनात अमूलचे अध्यक्ष जेठाभाई पटेल यांना स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय कृषी आणि सहकारमंत्री राधामोहन सिंग यांनी सहकाराचे खासगीकरण कदापी होऊ देणार नाही, याची निःसंदिग्ध ग्वाहीच यावेळी दिली. संपूर्ण देशभरातील सर्व राज्यांमधून सहकारातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
 
महाराष्ट्रात देखील सहकार भारतीची अधिवेशने खूपच मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. सांगली (१९८१), राहुरी (१९८४), नागपूर (१९८६), डोंबिवली (१९९०), पुणे (१९९४), जळगाव (१९९७), पुणे (२०००), आळंदी (२०११), औरंगाबाद (२०११), नाशिक (२०१४) अशी कितीतरी अधिवेशने झाली आहेत. महाराष्ट्रात सहकार भारतीच्या कामामध्ये ज्येष्ठ संघ प्रचारक कै. तात्या इनामदारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कै. अण्णासाहेब गोडबोले यांच्या सहकारातील अद्वितीय कामाची आठवण रहावी, म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी सहकार भारतीला एक विशेष निधी दिला आणि त्यातून त्यांच्या नावाने सहकारातील कार्यकर्त्यांला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिला पुरस्कार कै. तात्या इनामदार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यानंतरच्या पुरस्कारात वसंतराव देवपूजारी, कै. डॉ. अविनाश आचार्य, कै. मधुकरराव कुलकर्णी यांचा समावेश होता.
 
सहकार भारतीने २०१२ च्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने भोपाळ येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये १३ देशांतील व भारतातील मिळून १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांमुळेच दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया आणि बोत्सावाना येथे दोन सहकारी बँकांची स्थापना झाली आहे. २००४ पासून सहकार भारतीने प्रशिक्षणाची देखील चांगली व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. ज्याला आता महाराष्ट्र सरकारने प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
 
स्व.लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने सहकार भारतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संपूर्ण देशभरातून २२ कार्यकर्ते पूर्णवेळ सहकार भारतीच्या कार्यासाठी बाहेर पडले आहेत. यापूर्वीच बंगलोर व गोवा येथे प्रशस्त कार्यालये सुरू झाली आहेत. संपूर्ण देशभराच्या कामासाठी या सर्वच कार्यालयांचा चांगला उपयोग सहकार भारतीच्या कामासाठी होणार आहे. लवकरच स्व.लक्ष्मणराव इनामदार गौरव ग्रंथाचे देखील प्रकाशन केले जाणार आहे.
 
उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आर्थिक क्षेत्राला सहकारी चळवळच पर्याय ठरू शकते. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सहकार हा एक समर्थ पर्याय आहे. याची पुनर्मांड करण्याची गरज आहे. परंतु आवश्यकता आहे ती सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची, सुसंस्कारित होण्याची आणि सहकार चळवळीची व्याप्ती व सक्षमता प्रदर्शित करण्याची. ज्यासाठी सहकार भारती अविरत कार्य करीत आहे. सहकारातील सर्वच कार्यकर्त्यांनी आता बिना संस्कार नही सहकार, या ध्येयाने या चळवळीत सक्रिय
झाले पाहिजे...
 
 
- संजय बिर्ला
अखिल भारतीय बँकींग प्रकोष्ट प्रमुख,
सहकार भारती
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.