सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तित्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 

 
 
एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून त्यात मोठे स्थान संपादन करते. मात्र, काही व्यक्ती अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवित असतात. अशा दुर्मीळ व्यक्तींमध्ये संघ परिवारातीलच सदस्य असलेल्या देवळाली कॅम्प भागातील रतन राजलदास चावला यांचा समावेश करावा लागेल. विशेष म्हणजे, त्यांचे औपचारिक शिक्षण अवघे दहावीपर्यंत झालेले. कॅम्प येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमध्ये सिंधी माध्यमातून त्यांनी दहावी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना उद्योगाची कास धरावी लागली. त्यातून त्यांनी भाजीपाला आणि भुसार मालाचा व्यवसाय करून रेल्वेच्या माध्यमातून भारतभर प्रवास केला.
 
१९९५ पासून ते शेती व्यवसायाकडे वळले. दलदल असलेल्या जमिनीत त्यांनी पेरू, नारळ, चिकू, शेवगा असे उत्पादन यशस्वी करून दाखविले. थोडीथोडकी नव्हे, तर सात हजारांवर झाडांची त्यांनी लागवड केली. त्यानंतर त्यांनी वाळू व्यवसायात पदार्पण केले. त्यानंतर २००५ मध्ये ’झुळूक’ या मराठी चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. यातील नायिका ऐश्‍वर्या नारकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पारितोषिक मिळाले. मात्र, गिरीश ओक, श्रेयस तळपदे यांसारखी दिग्गज नट मंडळी असूनही चित्रपट फारसा चालला नाही. मात्र, त्यांनी निराश न होता आपली वाटचाल सुरूच ठेवली. १९९८ च्या सुमारास त्यांनी छावणी परिषद देवळाली कॅम्प निवडणुकीत नशीब आजमावले. मात्र, त्यातही त्यांना यश मिळाले नाही.
 
त्यानंतर विविध सामाजिक कार्यातील सहभाग पाहून शंकर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीत रतनजींना स्थान देण्यात आले. शाळेचे सचिव म्हणून काम करताना शाळेची अवस्था बिकट होती. मोठ्या प्रमाणात देणी थकली होती. मात्र, उत्तम कामगिरी करीत त्यांनी शाळेची देणी शून्यावर आणली. इतकेच नव्हे तर परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिश वर्ग वार्षिक फक्त दीडशे रुपये शुल्क घेऊन सुरू केला आणि यशस्वीही करून दाखविला. तेव्हा दुसरीत असलेले हे विद्यार्थी आता चौथीत असून विद्यार्थी संख्यादेखील एक हजार वरून दीड हजार झाली आहे. २०१०-११ मध्ये स्वाईन फ्लूच्या लसी पाच हजार गोरगरीब रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठीदेखील त्यांनी संघर्ष केला. २०१३ मध्ये छावणी परिषदेने नागरिकांवर कचर्‍यावरही कर लावला. लोकांचा साहजिकच याला प्रचंड विरोध होता. या भावना लक्षात घेऊन रतनजी स्वतः उपोषणास बसले. अखेर हा कर प्रशासनाला कमी करावा लागला. सामाजिक कार्य करताना त्याला पावती मिळत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वे क्षेत्रीय उपभोक्ता समिती सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. विविध क्षेत्रांतील कार्य करताना सध्या त्यांनी शिक्षणक्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केले असून ते देश घडविणारे आयएएस, आयपीएस, नेव्ही, आर्मीतील अधिकारी, अभियंते डॉक्टर निर्माण व्हावेत, यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
- पद्माकर देशपांडे 
@@AUTHORINFO_V1@@